एक शिक्षक, एक उपासक, एक समाज सुधारक – मधुकर रामजी चौधरी


एक शिक्षक, एक उपासक, एक समाज सुधारक – मधुकर रामजी चौधरी

काही व्यक्ती आपल्या आयुष्यात अशा येतात की त्यांचे संपूर्ण जीवनच एक जिवंत प्रेरणाग्रंथ होऊन जाते. त्यांची चालण्याची ढब, बोलण्याची शैली, जगण्याची साधी पण सच्ची पद्धत... सगळंच मनाला भिडणारं आणि अंतःकरण हलवणारं असतं. मधुकर रामजी चौधरी हे असंच एक विलक्षण, तेजस्वी व्यक्तिमत्त्व.

ना प्रसिद्धीची धडपड, ना गाजावाजा... पण त्यांच्या साध्या वागण्यातून ही एक विलक्षण तेज प्रकट होतं – आत्म्याचं, विचारांचं आणि निष्कलंक कर्माचं.

धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द व हनुमंत खेडे खुर्द ही त्यांची पाळमुळे. एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील राबणारे शेतकरी, आणि आईच्या पदराखालून वाहणारे श्रमांचे थेंब त्यांच्या बालपणाला संस्कारांची उब देऊन गेले.

लहानपणापासूनच त्यांनी गरिबी, अडचणी व जबाबदाऱ्या यांचा सामना केला. पण या संघर्षांनीच त्यांच्या मनात एक विचार खोलवर रुजवला – "शिक्षणाशिवाय उध्दार नाही."

ते शाळेत नेहमीच उजळत असत. अभ्यासात अग्रक्रमी होते. पण त्यांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक असायची – जेव्हा ते आपल्या शिक्षकांकडे पाहायचे. त्याचं कारण म्हणजे त्यांनी लहान वयातच ठरवलं होतं – "आपण शिक्षक व्हायचं!" पण केवळ नोकरी म्हणून नव्हे, तर समाज घडवण्यासाठी, विचार पेरण्यासाठी, आणि भविष्यास आकार देण्यासाठी!

शिक्षक म्हणून कामाची सुरुवात त्यांनी केली, पण ती केवळ काळ्या फळ्यावर आकडेमोड शिकवणारी नव्हती. त्यांनी शिक्षणाला चार भिंतीबाहेर नेलं. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागवला आणि पालकांमध्ये नव्या विचारांची पालव फुलवली.

याच प्रवासात त्यांच्या जीवनात अध्यात्माची पाऊलवाट उमटू लागली. गायत्री मातेची उपासना त्यांच्या जीवनाचा गाभा ठरली. उपासना ही केवळ धार्मिक कर्मकांड न राहता, समाजसुधारणेचं एक प्रभावी साधन कसं होऊ शकतं, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं.

गावागावात जिथे जिथे ते शिक्षक म्हणून गेले, तिथे त्यांनी केवळ ज्ञानच नव्हे तर विचार ही दिले. अंधश्रद्धेवर घाव घातला, जुनाट रूढी-परंपरांना प्रश्न विचारायला शिकवलं. आणि हाच विचार पुढे वेदमाता गायत्री बहुउद्देशीय संस्थेच्या स्थापनेचं बीज ठरला.

या संस्थेमार्फत त्यांनी "मनातील गुरुकुल" साकारले– जिथे ना जात, ना वर्ग, ना श्रीमंत-गरीब अशी भिंत. फक्त एकच उद्देश – "माणूस घडवणं!"

आज ही, वयाच्या ८०व्या वर्षी, जेव्हा ते एखाद्या व्यासपीठावर उभे राहतात, तेव्हा सभागृहात शांततेचा पवित्र गारवा पसरतो. त्यांच्या आवाजात अनुभवाची खोली, ज्ञानाची थोरवी आणि अंतःकरण हलवणारी प्रामाणिकता असते. आणि मग ते एखादं साधं पण अर्थपूर्ण वाक्य बोलतात – "समाज बदलायचा असेल, तर सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे!"

...आणि क्षणात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होतो!

मधुकरराव अजून ही तितक्याच साधेपणाने, निःस्वार्थ भावनेने जगतात. ना सत्तेची हाव, ना संपत्तीचा मोह. त्यांच्या लेखी – "कार्य हाच सर्वोच्च धर्म!" त्यांचं जीवन म्हणजे एक वाहिलेलं यज्ञकुंड – समाजासाठी, माणुसकीसाठी, मूल्यांसाठी वाहून दिलेल.

ते केवळ शिक्षक नाहीत, ते मार्गदर्शक आहेत. त्यांनी शाळा उभारली नाही, तर विचारांची विद्यापीठं उभी केली. त्यांनी उपासना केली नाही, तर श्रद्धेला कृतीची जोड दिली.

त्यांचं आयुष्य शिकवतं – "साधेपणाने, सातत्याने आणि समर्पणाने चालत राहिलं, तर काळ ही थांबून वंदन करतो."

आज जेव्हा समाज अनेक दिशांनी भरकटत आहे, तेव्हा मधुकर रामजी चौधरी यांचं आयुष्य म्हणजे एक दिवट्या प्रमाणे आहे – जो संथ प्रकाशाने मार्ग दाखवत राहतो, कोणता ही गाजावाजा न करता, पण खोलवर प्रभाव टाकत राहतो.

शतशः वंदन या शिक्षकाला,
ज्यांनी केवळ वर्गात शिकवलं नाही,
तर माणसाच्या अंतःकरणात प्रकाश नेला.
ते केवळ 'गुरुजी' नाहीत –
ते 'समाज सुधारक' आहेत!

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 
   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !