उमेद... स्वप्नांची वाटचाल – सौ.आशाताई अंबालाल पाटील यांची प्रेरणादायी कहाणी
उमेद... स्वप्नांची वाटचाल – सौ.आशाताई अंबालाल पाटील यांची प्रेरणादायी कहाणी
"आयुष्याने दिलेली परिस्थिती ही शेवट नसते, तर ती स्वतःला सिद्ध करण्याची सुरुवात असते."
ही सत्यता कृतीत उतरवणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील बोराळा गावातील सौ. आशाताई अंबालाल पाटील या एक प्रेरणादायी उदाहरण ठरल्या आहेत.
गरिबीच्या सावटाखाली गेलेले बालपण, जबाबदाऱ्यांनी भारलेले आयुष्य आणि त्यावर स्वाभिमानाने उभा असलेला त्यांचा व्यक्तिमत्व – हे त्यांच्या संघर्षाचे मूळ कारण होते. अनेक महिलां प्रमाणे त्या देखील आयुष्याच्या आर्थिक अडचणींशी लढत होत्या. परंतु त्या खचल्या नाहीत. कारण त्यांच्या मनात "उमेद" होती.
होय, ‘उमेद’ – ही फक्त एक शासकीय योजना नसून, अनेकांच्या आयुष्यात नवचैतन्याची सुरुवात करणारा प्रकाशकिरण ठरली आहे. आशाताईंसाठी ती योजना नव्हे, तर अंधारातून वाट दाखवणारा दीप झाला.
पाच पापडांची सुरुवात आणि ‘सक्षम’ होण्याचा प्रवास
घरखर्च भागवण्याची चिंता, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आणि त्याचवेळी स्वाभिमान जपण्याची जाणीव– या सगळ्याचा भार एकटीने पेलताना त्यांनी घराच्या एका कोपऱ्यातून व्यवसायाची सुरुवात केली. केवळ पाच पापडांपासून.
शेजाऱ्यांकडे संकोचाने, पण आत्मविश्वासाने त्या पापड विकायला गेल्या. आशाताईंच्या हाताला केवळ चवच नव्हती, तर त्यात होती मेहनत, प्रामाणिकपणा आणि कळकळ. त्यामुळे त्यांच्या पापडांनी ग्राहकांच्या मनात हळूहळू आपलं स्थान निर्माण केलं.
या यशातून प्रेरणा घेत त्यांनी भाकरवडी बनवायला सुरुवात केली. पारंपरिक चव, स्वच्छता, सात्त्विकता आणि प्रेम – या साऱ्यांची जाणीव असलेल्या त्यांच्या उत्पादनांनी एक वेगळी ओळख निर्माण केली. आज त्यांचा गृहउद्योग "सक्षम" या नावाने नंदुरबार जिल्ह्यात सर्वदूर पोहोचला आहे.
‘उमेद’ अभियानाचे योगदान
या प्रवासात त्यांना दिशा आणि धैर्य मिळाले ते ‘उमेद’ अभियानामधून. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सुरू झालेल्या या योजनेने आशाताईंसारख्या ग्रामीण महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी सक्षम केले.
बचत गट, कौशल्य प्रशिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन आणि आर्थिक साक्षरता यामुळे त्यांना नव्याने वाट सापडली.
त्यांच्याच शब्दांत सांगायचं झालं, तर –
"उमेद नसती, तर मी आज ही फक्त जगत राहिले असते. पण आज मी इतरांना जगण्याची उमेद देते आहे."
सामूहिक प्रगतीचा मंत्र
आशाताईंनी आपल्या यशात इतर महिलांना ही सामावून घेतलं. चुलीपाशी राहणाऱ्या महिलांना त्यांनी उद्योगात सामील केलं.
आज त्यांच्या "सक्षम" गृहउद्योगात दहा ते पंधरा महिलांना नियमित रोजगार मिळतो. त्यांच्या हातात काम आणि मनात आत्मसन्मान भरला गेला आहे.
त्यांचं तत्त्वज्ञान साधं, पण प्रभावी –
"माझ्या घरात दिवा लागला, हे महत्त्वाचं आहेच; पण माझ्यामुळे अजून काही घरांत ही दिवा लागला पाहिजे."
स्वप्नांच्या पलीकडचा प्रकाश
आज सौ. आशाताई अंबालाल पाटील या फक्त एक उद्योजिका नाहीत, तर त्या एक आदर्श आहेत. त्यांच्या भाकरवडीत मेहनतीचा स्वाद आहे, पापडात आत्मसन्मानाची चव आहे, आणि त्यांच्या डोळ्यांत ‘मी करू शकते’ ही चमक आहे.
त्या आपल्याला शिकवून जातात –
की परिस्थिती अडथळा ठरली, तरी उमेद तोड शोधते.
की जिद्दीने काम करणाऱ्या स्त्रीच्या हातात केवळ चूलच नसते, तर समाज घडवण्याची ताकद ही असते.
शेवटचं मनापासूनचं वाक्य...
‘उमेद’ ही फक्त योजना नाही, ती एक भावना आहे – जिचा स्वाद सौ. आशाताईंनी आपल्या आयुष्यातून सर्वांसमोर ठेवला आहे.
त्यांचा जीवनप्रवास हे सांगून जातो –
"स्वप्नं मोठी असावीत, पण त्यासाठी झटणं त्याहून मोठं असावं."
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा