एकतेतून उभे राहिलेले साम्राज्य – वसंतभाऊ महाजन यांची प्रेरणादायक कहाणी
एकतेतून उभे राहिलेले साम्राज्य – वसंतभाऊ महाजन यांची प्रेरणादायक कहाणी
धानोरा (ता. चोपडा) या छोट्याशा गावात जन्मलेले वसंतभाऊ महाजन यांचा जीवन प्रवास हा संघर्ष, कष्ट, आत्मविश्वास आणि कुटुंबातील एकतेचे ज्वलंत उदाहरण आहे. मातीशी नाळ जोडलेल्या, अतिशय सामान्य आणि हलाखीच्या परिस्थितीत त्यांचा जन्म झाला. वडील शेती करत असत, त्या सोबत पावविक्रीचा ही छोटासा व्यवसाय होता. घरात आर्थिक अडचणी होत्या, पण आई-वडिलांची जिद्द, मेहनत, आणि कधी ही तक्रार न करणारी सकारात्मक वृत्ती पाहून वसंतभाऊंच्या मनात लहानपणापासूनच एक गोष्ट खोलवर रूजली “घर उभारायचं असेल, तर कष्टाशिवाय पर्याय नाही.”
घरातील मोठे अपत्य असल्याने लवकरच जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर आल्या. शिक्षण घेत असतानाच त्यांनी आई-वडिलांना कामात मदत करण्यास सुरुवात केली. घरातील छोट्या-मोठ्या कामांमध्ये सहभाग घेणे हे त्यांच्या दिनचर्येचा भाग बनला. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी ब्रहानपूर येथे पाण्याच्या बोअर मशीनवर काम करण्यास सुरुवात केली.
हाच टप्पा त्यांच्या आयुष्यातील निर्णायक वळण ठरला. त्यानंतर त्यांनी जळगाव येथे 'अशोक बेकरी'त काम केले आणि पुढे जीवनाचा नवा अध्याय लिहिण्यासाठी एक अनोळखी शहर सुरत गाठले. हाती पैसा नव्हता, ओळखीचं कोणी नव्हतं, पण मनात होता निर्धार आणि स्वप्नं पूर्ण करण्याचं प्रबळ इच्छाशक्ती. प्रारंभी मिळेल ते काम केले. बेकरीत काम, मजुरी, दिवसभर कष्ट आणि रात्री फुटपाथवरची झोप.
या संघर्षाने त्यांना मानसिक आणि शारीरिक पातळीवर झिजवलं, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांच्या मनात ठसलेली ती एकच भावना होती “हीच खरी सुरुवात आहे.” काही काळा नंतर त्यांच्याकडे थोडे पैसे आले. त्यांनी एक खोली भाड्याने घेतली आणि तिथूनच सुरू झाला आपल्या कुटुंबाला हाताशी घेण्याचा प्रवास.
एकेक भावाला त्यांनी सुरतला बोलावले. त्यांना काम दिलं, त्यांच्या पाठीशी उभं राहिले. हीच एकतेची ताकद त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी पाठिशी राहिली. याच एकतेच्या आधारावर त्यांनी "सचिन वस्त्रालय" या नावाने एक दुकान सुरू केले. सुरुवातीला अतिशय साध्या स्वरूपात सुरू झालेलं हे दुकान अल्पावधीतच सुरत शहरात सर्वदूर ओळखलं जाऊ लागलं.
ग्राहकांशी प्रामाणिक व्यवहार, दर्जेदार सेवा, आणि माणुसकीने वागणं – या त्रिसूत्रीवर त्यांनी आपला व्यवसाय उभा केला. म्हणूनच आज सचिन वस्त्रालय हे नाव सुरतच्या कानाकोपऱ्यात विश्वासाचं प्रतीक बनलं आहे.
या यशामागे कोणती ही शासकीय मदत नव्हती, ना मोठी गुंतवणूक होती ती केवळ मेहनत, निष्ठा आणि कुटुंबाची बंधुत्वभावना. वसंतभाऊ आज ही तेवढेच नम्र, साधे आणि सर्वांना आपले मानणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. कोणावर ही आकस नाही, गर्व नाही. सर्वांना घेऊन चालणं हीच त्यांची ओळख आहे.
आज त्यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र, प्रेमाने, गुण्यागोविंदाने राहात आहे. ही केवळ व्यवसायिक यशोगाथा नाही, तर एकत्र कुटुंबपद्धतीचं आणि माणुसकीच्या मूल्यांचं मूर्त स्वरूप आहे. त्यांनी सिद्ध केलं आहे की “एकजूट, निष्ठा आणि सातत्यपूर्ण श्रम यांच्या बळावर कोणती ही उंची सहज गाठता येते.”
वसंतभाऊ महाजन यांची ही कहाणी नव्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायक ठरते. जीवनात अडचणी असतातच, पण जर ध्येय ठरवलेलं असेल आणि आपल्या पाठीशी आपले माणसं असतील, तर कोणतं ही स्वप्न अपूर्ण राहत नाही.
आजचं सचिन वस्त्रालय हे केवळ एक दुकान नाही, तर एका स्वप्नवेड्या माणसाची आणि त्याच्या कुटुंबाच्या एकतेची जिवंत मूर्ती आहे.
© दीपक पवार (संपादक)खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा