संघर्षाच्या पायवाटेवरून तेजाच्या शिखराकडे - दगडू रामचंद्र मोरे
संघर्षाच्या पायवाटेवरून तेजाच्या शिखराकडे - दगडू रामचंद्र मोरे
दगडू रामचंद्र मोरे एक साधा, सरळ, कष्टाळू माणूस. त्यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील एरंडोल या गावात एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. गरिबी, मर्यादा, कष्ट यांना सामोरे जात त्यांनी आपले आयुष्य उभे केले. जीवनात कुठल्या ही गोष्टींची चैन नव्हती, पण मनात होते स्वप्न आपल्या कुटुंबासाठी काही तरी करून दाखवण्याचं.
त्यांचं ह.मु. बदलापूर (पू.) हे ठिकाण. त्यांनी वसंत सहकारी साखर कारखाना, कासोदा येथे सन १९७६ पासून मेंटेनन्स विभागात काम सुरू केलं. जबाबदारीनं आणि निष्ठेनं काम करत ते आपल्या संसाराची गाडी हळूहळू पुढं नेत होते. पण नियतीला कदाचित त्यांची परीक्षा घ्यायची होती.
दि. ३० ऑगस्ट १९९६ हा दिवस त्यांच्या आयुष्यात एक वज्राघात घेऊन आला. क्लिनिंगचं काम सुरू असताना, सुमारे सात ते साडेसात क्विंटल वजनाची रोलरची बेअरिंग त्यांच्या दोन्ही पायांवर घसरून पडली. त्या अपघातात त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. कारखाना थांबला, नोकरी गेली, आणि आयुष्य अंधारात बुडालं.
जळगाव येथे डॉ. अनिल खडके यांच्या कडे जवळपास दोन वर्षं उपचार सुरू राहिले. घरात आई-वडील, लहान मुलं, आणि भविष्याचं अनिश्चित अंधार. पण याच अंधारात त्यांना मिळाली आप्तेष्टांची साथ. भावंडं, नातेवाईक यांनी आधार दिला. आणि मग सुरू झाला संघर्षाचा नवीन अध्याय.
अपंगत्वाच्या सावलीत ही त्यांनी हार मानली नाही. आठ वर्षं त्यांनी एक छोटंसं स्टील भांड्यांचं दुकान चालवलं. यातून उदरनिर्वाह केला. मुलीचं लग्न केलं. पायांनी साथ दिली नाही, पण मनाने चालायचं थांबवलं नाही.
मोठा मुलगा प्रशांत सोनार कारागीर बनला. दगडू दादा देवरे यांच्या कडे त्याने हातात कलागुण घेतले. म्हसावद येथे एका सराफाकडे काम मिळालं. नंतर नागरिक बँकेकडून कर्ज काढून त्यांनी छोट्या स्वरूपात स्वतःचं दुकान सुरू केलं. पण तिथे अपयश आलं. अशा वेळी त्यांचे लहान भाऊ प्रमोद यांनी मदतीचा हात पुढे केला.
त्यांचा दुसरा मोठा मुलगा आणि लहान मुलगा – दोघांनी ही शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या मार्गावर पाऊल ठेवलं. लहान मुलाने B.Sc नंतर M.Sc आणि मग फार्मसी क्षेत्रात सात वर्षं बंगलोरमध्ये नोकरी केली. पुढे तो विवाहित झाला. त्या मुलाने शिक्षणाची अखेरची पायरी Ph.D पार केली आणि आज डॉ. पदवी मिळवून अहमदाबाद येथे एका प्रतिष्ठित कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत आहे.
या सर्व प्रवासात दगडू मोरे यांच्या दोन्ही पायांनी साथ दिली नाही, पण मुलांनी त्यांच्या जीवनाला नवी दिशा दिली. आईवडिलांच्या निधना नंतर मोठ्या मुलाने डिसेंबर २००८ मध्ये त्यांना डोंबिवली, मुंबई येथे आपल्या घरी आणले. तिथे त्यांचं नव्याने सुखाचं आयुष्य सुरू झालं.
आज ते एरंडोल मधील वडीलोपार्जित घर विकून बदलापूर (पू.) येथे स्थायिक झाले आहेत. कधी खांद्या वरून उचललेली भांड्यांची पोती, तर कधी जमिनीवर सरकणाऱ्या पायांवरचा ताण सर्व काही झेलून, आज ते आपल्या यशस्वी मुलांच्या संगतीने आनंदात आयुष्य जगत आहेत.
दगडू रामचंद्र मोरे हे नाव म्हणजे संकटांवर मात करणाऱ्या जिद्दीची, आईवडिलांच्या कर्तव्याशी प्रामाणिक राहणाऱ्या पित्याची आणि खंबीर मनाच्या माणसाची ओळख.
तसंच, दगडू रामचंद्र मोरे यांनी एरंडोल सुवर्णकार समाजाचे सलग अकरा वर्षे सचिव म्हणून अत्यंत जबाबदारीने कार्य केले आहे. समाजातील विविध प्रश्न, उपक्रम आणि एकात्मता वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. या शिवाय, विमा एजंट म्हणून ही त्यांनी दहा वर्षे कार्यरत राहत अनेक कुटुंबांना आर्थिक सुरक्षिततेची दिशा दाखवली आणि विश्वासार्हतेचा आदर्श निर्माण केला.
त्यांची ही जीवन कहाणी प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे .
"शरीर थकतं, पण स्वप्न थकत नाहीत. पाय थांबतात, पण मन चालत राहतं. आणि मनाची वाट जर खरी असेल, तर यश नक्कीच भेटतं."
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा