साधेपणातून उभा राहिलेला दीपस्तंभ : जयसिंग घनश्याम परदेशी


साधेपणातून उभा राहिलेला दीपस्तंभ : जयसिंग घनश्याम परदेशी

ज्यांच्या जीवनात काहीही सहजासहजी मिळालं नाही, परंतु जे काही मिळवलं, ते प्रामाणिक कष्ट आणि निष्ठेच्या बळावर मिळवलं, अशा व्यक्तींची नावं कदाचित इतिहासाच्या पुस्तकांत सापडणार नाहीत. मात्र, अशा व्यक्ती जनमानसाच्या हृदयात अढळ स्थान मिळवतात. अशाच एका तेजस्वी, पण सौम्य व्यक्तिमत्त्वाची ओळख म्हणजे श्री. जयसिंग घनश्याम परदेशी.

रायपूर (ता. जळगाव) या छोट्याशा गावात एका अत्यंत सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सालदारकी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत. घरात नेहमीच आर्थिक अडचणींचं सावट होतं. जेवढं मिळायचं, त्यातून घर चालवणं हेच मोठं आव्हान होतं. या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा जयसिंगजींच्या मनात एक ठाम संकल्प रुजला होता. “आपलं आयुष्य बदलायचं आहे आणि त्यासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे.”

ते केवळ ९ महिन्यांचे असताना त्यांच्या आईचं निधन झालं. लहानपणापासूनच त्यांच्या जीवनात दुःखाची रेषा उमटली होती. पुढे त्यांनी एका अपंग (अद्दू) महिलेशी विवाह केला आणि तब्बल ४० वर्षे तिची प्रामाणिक साथ दिली. त्यांच्या सहजीवनात त्यांनी कधी ही तिच्या अपंगत्वाची दया न करता, प्रेम आणि समतेनं सहजीवन निभावलं. आयुष्याच्या उत्तरार्धात ती ही त्यांना सोडून देवाघरी गेली.

बालपणापासूनच त्यांनी आई-वडिलांचे प्रचंड कष्ट पाहिले. त्यांच्या डोळ्यांतून ओघळणाऱ्या वेदनांनी त्यांच्या मनात संघर्षाची नवी जिद्द निर्माण केली. कोणती ही विशेष सोय नसताना, कोणताही आधार नसताना, त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर आपलं शिक्षण पूर्ण केलं. नशिबाला दोष न देता, तक्रार न करता त्यांनी चिकाटीने शिक्षणाची वाट चालत राहिले.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पाटबंधारे विभागात एक मजूर म्हणून नोकरीला सुरुवात केली. अनेकांना ही भूमिका सामान्य वाटेल, परंतु जयसिंगजींनी ती नोकरी अत्यंत प्रामाणिकपणे, मनापासून आणि निष्ठेने पार पाडली. सरकारी खात्यात काम करत असताना त्यांनी कधी ही निष्ठा, सचोटी, कर्तव्यपरायणता आणि माणुसकी यांचा त्याग केला नाही. अधिकारी असोत वा सहकारी, ते सगळ्यांशी सुसंवाद साधत आणि सर्वांना बरोबर घेऊन चालत असत.

नोकरी दरम्यान त्यांनी अनेक गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला. कुणाला सल्ला दिला, कुणाला योग्य दिशा दाखवली, तर कुणाच्या खांद्यावर हात ठेवून आश्वासक शब्द दिले. त्यांच्या या गुणांमुळे ते सर्वांच्या मनात आपलेपणाने घर करून गेले.

सेवानिवृत्ती नंतर ही त्यांनी स्वतःला विश्रांतीच्या गर्तेत झोकून दिलं नाही. उलट, त्यांनी आपला उर्वरित वेळ समाजासाठी अर्पण करण्याचा निर्णय घेतला. समाजातील विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन त्यांनी आपली सेवा सुरू ठेवली.

त्यांच्या साधेपणातच मोठेपण आहे. त्यांनी कधीही आपल्या कार्याचं प्रदर्शन केलं नाही, पण त्यांच्या कृतीतून त्यांचं मोठेपण सतत प्रकट होत राहिलं. समाजासाठी झिजण्याची त्यांची वृत्ती हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख ठरली.

आज त्यांच्या कार्याचा आणि संस्कारांचा वारसा त्यांची संतती समर्थपणे पुढे नेत आहे. त्यांचा मोठा मुलगा रामसिंग परदेशी हे एका वृत्तपत्राचे उपसंपादक असून रायपूर गावाचे पोलीस पाटील म्हणून ही कार्यरत आहेत. दुसरा मुलगा गजेंद्र परदेशी हे ‘मयुरेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल, रायपूर’ या शैक्षणिक संस्थेचे यशस्वी संचालक असून, सामाजिक कार्यामध्ये देखील सक्रिय आहेत. "त्यांची मुलगी व्यारा (सुरत) येथे सुखी संसारात रमली आहे. तिने ही वडिलांचे संस्कार मन:पूर्वक स्वीकारले आहेत."

एखाद्या वडिलांसाठी या पेक्षा मोठा गौरव काय असू शकतो, की त्यांच्या मूल्यांचा व नीतीचा वारसा पुढची पिढी गर्वाने जपत आहे?

जयसिंग घनश्याम परदेशी हे नाव केवळ एका व्यक्तीचं नाही, तर एका विचारधारेचं प्रतीक आहे – जिथे साधेपणा हेच वैभव मानलं जातं, जिथे कष्ट हेच यशाचं बीज ठरतात आणि जिथे समाजासाठी काही तरी देण्याची ओढ असते.

त्यांचा जीवन प्रवास ही एक प्रेरणादायी कहाणी आहे . जी आजच्या तरुण पिढीला शिकवते की, परिस्थिती किती ही प्रतिकूल असली, तरी प्रामाणिक कष्ट, निष्ठा आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर यशाची शिखरं गाठता येतात.

जयसिंगजींच्या या अलौकिक पण विनम्र वाटचालीला साश्रु नमन आणि मानाचा मुजरा!

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !