प्रकाश यशोदा गणेश महाजन – जिद्दीची प्रेरणादायक कहाणी


प्रकाश यशोदा गणेश महाजन – जिद्दीची प्रेरणादायक कहाणी

"जिथे परिस्थितीची मर्यादा संपते, तिथे जिद्द सुरू होते."
ही ओळ ज्या व्यक्तीच्या जीवनावर अक्षरश: लागू पडते, ती व्यक्ती म्हणजे प्रकाश यशोदा गणेश महाजन.

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल या गावातील एका सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील टेलरिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती मर्यादित होती, पण जबाबदाऱ्या मोठ्या होत्या. अशा कठीण परिस्थितीत ही प्रकाश यांनी हार मानली नाही.

लहानपणापासूनच शिक्षणाची ओढ होती. पण गरिबीमुळे लवकरच त्यांना मजुरीच्या कामाकडे वळावं लागलं. पाचवी पर्यंतचं शिक्षण पूर्ण होत असतानाच त्यांनी विटभट्टीवर काम करण्यास सुरुवात केली. वय होतं कोवळं, पण खांद्यावर जबाबदाऱ्या मात्र प्रौढांसारख्या होत्या. दिवसभर विटा बनवण्याचं कष्टाचं काम आणि रात्री अभ्यास हाच त्यांचा जीवनक्रम झाला.

कधी गवंडी म्हणून, तर कधी पाव विक्री करत त्यांनी आपलं शिक्षण सुरू ठेवलं. विटभट्टीवर काम करत दहावी, गवंडी म्हणून काम करत असताना आय.टी.आय., पाव विक्री करताना बारावी आणि अखेर पदवी शिक्षण पूर्ण केलं. ही वाट सोपी नव्हती. प्रत्येक टप्प्यावर अडथळे होते. पण या अडथळ्यां पेक्षा मोठी होती त्यांची मनोबल, जिद्द आणि अपार मेहनत.

शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना एका खासगी कंपनीत नोकरी मिळाली. प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर त्यांनी कंपनीत आपलं स्थान निर्माण केलं.आज ते पुण्यातील एका नामवंत कंपनीत प्रोडक्शन मॅनेजर या जबाबदारीच्या पदावर कार्यरत आहेत. एकेकाळी विटभट्टीवर घाम गाळणारा मुलगा, आज महानगरात स्वतःचं अस्तित्व निर्माण करून यशस्वीपणे आयुष्य घडवत आहे.

प्रकाश यांचं हे यश केवळ त्यांच्या परिश्रमांचं फलित नाही, तर त्यांच्या जीवनातील खंबीर आधारस्तंभ त्यांच्या पत्नी प्रतिभा प्रकाश महाजन यांच्या निस्सीम साथीनं शक्य झालं आहे. प्रतिभा ताईंनी प्रत्येक अडचणीच्या क्षणी मानसिक आधार देत, घराची जबाबदारी समर्थपणे पेलली. किती ही संकटं आली, तरी त्या कधी ही डगमगळ्या नाहीत. उलट, त्या प्रकाश यांना नेहमीच पुढे जाण्यास प्रेरणा देत राहिल्या.

त्यांच्या यशयात्रेत आणखी एक अभिमानास्पद टप्पा म्हणजे त्यांचा मोठा मुलगा नवोदय विद्यालयासाठी निवडला गेला आहे. ही निवड केवळ मुलाची नाही, तर त्या पालकांच्या स्वप्नांची ही पूर्तता आहे, ज्यांनी जिद्द, त्याग आणि मेहनतीवर विश्वास ठेवला.

प्रकाश महाजन यांचं जीवन हे एका सामान्य माणसाचं असामान्य प्रवासाचं उत्कृष्ट उदाहरण आहे. आज ते अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. त्यांची कहाणी सांगते की "परिस्थिती किती ही प्रतिकूल असली, तरी जर मनोबल प्रबळ असेल आणि जिद्द असामान्य असेल, तर यश नक्कीच गवसतं."

आज प्रकाश आणि प्रतिभा महाजन यांचा विवाहवर्धापनदिन आहे.या खास आणि आनंददायी दिवशी त्यांना त्यांच्या आयुष्याच्या सुंदर सहप्रवासासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!ईश्वर त्यांच्या संसारात नेहमी आनंद, उत्तम आरोग्य आणि भरभरून यश लाभू दे, हीच सदिच्छा!

गावातील अनेक युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कंपनी क्षेत्रात नोकरी मिळवून देण्यात प्रकाश महाजन यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी अनेकांना योग्य मार्गदर्शन करून स्वतःच्या संपर्कातून संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. विशेष म्हणजे, आज ही जर कुणा युवकाला नोकरीची गरज भासली, तर प्रकाश महाजन शंभर टक्के प्रयत्न करून त्या तरुणाला योग्य संधी मिळवून देण्यासाठी तत्पर असतात. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे अनेक कुटुंबांचे आयुष्य साकारत आहे.

आज त्यांचा प्रवास शिकवतो की, यश म्हणजे केवळ आर्थिक स्थैर्य नव्हे, तर आत्मविश्वास, कुटुंबाचं पाठबळ, आणि कठीण प्रसंगी न खचता पुढे जाण्याची वृत्ती हेच खऱ्या अर्थाने यशाचं मर्म आहे.

प्रकाश महाजन यांचं जीवन म्हणजे जिद्दीचा जिवंत दस्त ऐवज आहे. त्यांची कथा प्रत्येक तरुणाने वाचावी, मनापासून समजून घ्यावी, आणि ठाम निर्धार करावा.
"माझं ही काही तरी नक्कीच होऊ शकतं."

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 
   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !