माणुसकीच्या वाटेवरचा एक दीपस्तंभ !
माणुसकीच्या वाटेवरचा एक दीपस्तंभ !
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा परिसरातल्या एका छोट्याशा गावात, मध्यमवर्गीय पण विचारांनी श्रीमंत अशा कुटुंबात पारसमल राजमल जैन यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचा शेतीसोबतच व्यापार ही होता. त्या काळी त्यांच्या कुटुंबाला गावाचा ‘नगरसेठ’ म्हणून ओळख मिळालेली होती. मात्र या प्रतिष्ठेच्या मागे होते. साधेपणाचे, सज्जनतेचे आणि माणुसकीचे ठसठशीत संस्कार. त्यांच्या आजोबांचे शांत, निगर्वी जीवन आणि त्यांच्या वागणुकीतून उमटणारा माणुसकीचा गंध याचं गहिरं प्रभाव त्यांच्या बालमनावर पडला. आणि त्याच क्षणी त्यांच्या मनात एक संकल्प ठसठसून रुजला "आपल्याला शिक्षकच व्हायचं आहे!"
बालपण म्हणजे स्वप्नांची मखमली झुला. शिक्षणाची ओढ आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जाणीव यामुळे ते झुल्यावर बसल्यासारखे शिक्षणाच्या दिशेने झोके घेत गेले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९८२ साली त्यांची शिक्षक म्हणून पहिली नियुक्ती शिरपूर तालुक्यातील विखरण गावात झाली. ही केवळ नोकरी नव्हती, तर विद्यार्थ्यांच्या मनावर प्रेमाने, ज्ञानाने आणि सुसंस्कारांनी कोरली जाणारी एक सुंदर व शाश्वत शिकवण होती.
त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ विषय शिकवले नाहीत, तर त्यांना उत्तम माणूस बनवले. त्यांच्या प्रत्येक तासामध्ये ज्ञानासोबतच प्रेम, काळजी आणि समर्पणाचा अंश असायचा. त्यांच्या शिकवण्याने अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याची दिशा बदलली. त्यांची खरी कमाई म्हणजे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील कृतज्ञतेची ओल आणि हृदयातील आदरभाव.
पंधरा वर्षे त्यांनी बोरकुंड या गावात सेवा बजावली. त्या शाळेतील दारातील प्रत्येक दगडाशी, वर्गखोल्यांतील प्रत्येक बाकाशी त्यांचं आत्मीय नातं तयार झालं. त्यानंतर त्यांची बदली शिरूड येथे झाली, आणि तेथेच त्यांनी आपल्या प्रदीर्घ व्रतासारख्या सेवा-कार्याचा समारोप केला. परंतु निवृत्तीनंतर जिथे अनेकजण विश्रांतीची वाट निवडतात, तिथे त्यांनी सेवा हीच खरी उर्जा मानत आपली वाटचाल समाजकार्यासाठी सुरू ठेवली.
त्यांनी सेवानिवृत्तीनंतर केलेली समाजसेवा हे त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वाचे उत्तम उदाहरण आहे. पिंप्री गावातील कामधेनु गोशाळेत, मुक्या जनावरांची काळजी घेतली जाते. त्या गोशाळेसाठी त्यांनी लोकसहभागातून गाईंसाठी मजबूत शेड उभारून दिले. इतकंच नव्हे, तर वेळोवेळी चाऱ्यासाठी ही गोशाळेचे संचालक प्रमोदभाऊ चौधरी यांना त्यांनी न विचारता, मनापासून मदत केली. त्यांच्या मते, मदत ही मागणीवर आधारित नसते, ती भावना ओळखून दिली जाते.
पारसमल जैन सर फक्त शिक्षक किंवा समाजसेवक नाही तर एक बहुआयामी कलावंत देखील आहेत. त्यांना बासरी वाजवण्याचा गाढा छंद आहे.ती बासरी जणू त्यांच्या आत्म्याची निःशब्द अभिव्यक्ती असते. गावातील नवरात्र, गणपती यांसारख्या उत्सवांमध्ये ते हसवणारे विनोदी चुटकुले, सुरेल गीतं आणि शब्दांच्या खेळाने सादर होणारे कार्यक्रम साकारतात. त्यांचं सूत्रसंचालन म्हणजेच कार्यक्रमात उत्साही जीव ओतण्यासारखं असतं.
ते केवळ कलाकारच नाहीत, तर एक उत्कृष्ट गीतकार आणि भावस्पर्शी लेखक ही आहेत. त्यांच्या लेखणीतून उमटणाऱ्या कविता आणि लेख हे समाजाच्या अंतःकरणाला भिडणारे असतात. त्यांनी कधीही प्रसिद्धीचा ध्यास घेतलेला नाही. त्यांच्या लेखणीतून उमटलेले प्रत्येक शब्द हे समाजप्रेम आणि माणुसकीने ओतप्रोत भरलेले असतात.
त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या आदर्शाचं अनुकरण केलं आहे. एक मुलगा प्रामाणिकपणे प्रॉपर्टी व्यवसायात कार्यरत आहे, तर दुसरा मुलगा मुंबईच्या मंत्रालयात क्लास वन अधिकाऱ्याच्या पदावर कार्यरत आहे. वडिलांच्या संस्कारांनी त्यांनाही समाजसेवेसाठी झुकाव दिला आहे.
आज ही पारसमल जैन हे अनाथालय, आश्रमशाळा, गोशाळा यांसारख्या विविध सामाजिक कार्यांमध्ये आपलं योगदान देत आहेत. त्यांची मदत ही केवळ आर्थिक स्वरूपात नसते, ती ह्रदयातून, प्रेमातून आणि जबाबदारीतून दिलेली असते.
त्यांचं आयुष्य म्हणजे एक झगमगता दीपस्तंभ आहे. जो स्वतः सतत जळत राहतो आणि इतरांच्या वाटा उजळवत राहतो. त्यांनी हेच शिकवलं मोठेपणा ही पदव्या किंवा संपत्तीने मोजली जात नाही; तो इतरांच्या जीवनात किती उजळवण देतो, त्यावरच त्याची खरी किंमत ठरते.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा