संघर्षातून तेजाकडे : राजू श्रीराम पाटील यांची प्रेरणादायी जीवनगाथा
संघर्षातून तेजाकडे : राजू श्रीराम पाटील यांची प्रेरणादायी जीवनगाथा
गरिबी, अपंगत्व, अडचणी व मर्यादा या साऱ्या गोष्टी काहींना खचवून टाकतात; तर काहींना अधिक झळाळून निघण्याचं बळ देतात. बिलखेडा या छोट्याशा गावात जन्मलेले श्री. राजू श्रीराम पाटील हे अशाच दुर्मीळ जिद्द, कष्ट आणि ध्येयवेड्या वृत्तीचे उत्तम उदाहरण आहेत.
शेतकरी कुटुंबात जन्मलेले राजू पाटील लहानपणापासूनच गरिबीच्या सावटात वाढले. त्यांच्या वडिलांची शेती हीच उपजीविकेचे एकमेव साधन होते, तर त्यांची मातोश्री शेतात खांद्याला खांदा लावून मेहनत करत असत. त्यांचा घरात आर्थिक चणचण होती, मात्र माणुसकी, आपुलकी आणि प्रेमाचा अमूल्य ठेवा नशिबी होता.
बालपणीच त्यांनी आपल्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावरच्या घामाच्या थेंबांतून एक गोष्ट शिकली “घर सावरणं असेल, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही.”
शिक्षणाच्या प्रवासात राजूंचं जीवन म्हणजे शाळा आणि शेत यांचं दुहेरी गणित होतं. सकाळी शाळा, संध्याकाळी शेतकाम अशा जीवनशैलीत एका हाताने अपंगत्व असून ही दुसऱ्या हातात भविष्यासाठीची उमेद त्यांनी घट्ट धरली होती. त्यांच्यात असलेली जिद्द, आत्मविश्वास, आणि अपार मेहनत यामुळेच त्यांनी अपंगत्वाला ही अडथळा न बनवता प्रेरणादायी उंची गाठली.
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये सचिवपदाची जबाबदारी स्वीकारली. अपंग असून ही त्यांनी आपल्या कामात एक ही त्रुटी येऊ दिली नाही. उलट, प्रामाणिकपणे, समर्पितपणे आणि अत्यंत निष्ठेने त्यांनी कार्यभार सांभाळला. त्यांच्या साधेपणात एक वेगळाच तेज आहे, जो प्रत्येकाच्या मनात आदराचे स्थान निर्माण करतो.
श्री. राजू पाटील यांचे व्यक्तिमत्त्व हे अत्यंत विनम्र, संयमी आणि दिलखुलास आहे. त्यांनी कधीच कोणाचे मन दुखावले नाही, ना कधी कोणावर अन्याय केला. त्यांच्या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यातील अपेक्षा, चेहऱ्यावरील चिंता ते सहज ओळखतात. म्हणूनच ते शेतकऱ्यांचे केवळ सचिव नाहीत, तर “आपलं माणूस” म्हणून ओळखले जातात.
शेतकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती देणे, कागदपत्रांतील अडचणी सोडवणे, आणि वेळ लागेल तितका वेळ देऊन त्यांना मार्गदर्शन करणे हे ते कुठल्या ही अहंभावा शिवाय, अत्यंत सेवाभावाने करतात. त्यांनी पदाचा उपयोग प्रतिष्ठेसाठी न करता, जनतेच्या हितासाठी केला. त्यामुळेच आज ते गावकऱ्यांसाठी एक विश्वासाचा आधारस्तंभ ठरले आहेत.
त्यांचं अपंगत्व हे त्यांच्यासाठी कधीच दुर्बलता ठरली नाही; उलट, त्यांनी तेच सामर्थ्यात रूपांतरित केलं. समाजाला त्यांनी हे दाखवून दिलं.
“शरीर अपूर्ण असलं तरी मन मोठं असेल, तर कोणती ही मर्यादा यशाच्या वाटेला अडथळा ठरू शकत नाही.”
त्यांचं संपूर्ण जीवन हे एक जिवंत प्रेरणागाथा आहे.
संकटांना सामोरं जाणं, अडचणींवर मात करणं, आणि सतत प्रामाणिकपणे पुढे जात राहणं. आजच्या तरुण पिढीने त्यांच्या जीवनाकडे प्रेरणास्थान म्हणून पाहायला हवं. कारण, परिस्थिती कितीही कठीण असली तरी चिकाटी आणि सत्यनिष्ठा असेल, तर यश निश्चितच गवसतं.
आज जरी ते सचिवपदावर कार्यरत असले, तरी खऱ्या अर्थाने ते समाजासाठी एक सजग सेवक आहेत. ते केवळ सरकारी कर्मचारी नाहीत; तर शेतकऱ्यांच्या दुःखाचा, अडचणींचा आणि अपेक्षांचा एक विश्वासार्ह आधार आहेत.
त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यामागे दडलेला संघर्ष जितका खोल आहे, तितकाच त्यांचा माणुसकीचा झरा खोल आणि विशाल आहे. त्यांच्या आयुष्यातून समाजाने एकच गोष्ट शिकावी.
राजू पाटील यांच्याशी संवाद साधताना त्यांनी आपल्या यशस्वी जीवनप्रवासाचे संपूर्ण श्रेय आपल्या आई-वडिलांना, शिक्षणात मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांना तसेच कष्टकरी शेतकरी बांधवांना दिले आहे. त्यांच्या मते, आई-वडिलांनी दिलेले संस्कार, शिक्षकांनी केलेले योग्य मार्गदर्शन आणि शेतकरी बांधवांचे सातत्यपूर्ण परिश्रम यांमुळेच आज ते समाजात एक सुजाण आणि जबाबदार व्यक्ती म्हणून ओळखले जात आहेत. त्यांच्या या नम्रतेतून त्यांच्या मनातील ऋणनिर्देशाची जाणीव आणि त्यांच्या विचारांची सुसंस्कृतता स्पष्टपणे दिसून येते.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा