नानासाहेब – शिक्षणाच्या मशालीचा तेजस्वी ज्योत !


नानासाहेब–शिक्षणाच्या मशालीचा तेजस्वी ज्योत !

धरणगाव तालुक्यातील बिलखेडा या छोट्याशा गावातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले देविदास वामन भदाणे हे आज संपूर्ण परिसरात "नानासाहेब" या स्नेहपूर्ण आणि सन्माननीय नावाने ओळखले जातात. हे नाव केवळ एका व्यक्तीचे प्रतिनिधित्व करत नाही, तर ते नाव आहे एका प्रेरणादायी जीवनप्रवासाचे, अथक कष्टांचे आणि समाजासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाचे.

नानासाहेबांचे वडील शेतकरी होते. शेतात राबून ही कधी पोटभर अन्न मिळायचे नाही. गरिबीच्या छायेखाली गेलेले त्यांचे बालपण, आई-वडिलांचे रात्रंदिवसाचे कष्ट आणि अन्नासाठीची धडपड – हेच त्यांच्या शालेय जीवनाचे पहिले धडे ठरले – "शिक्षणाशिवाय पर्याय नाही."

धुळे येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. परिस्थिती अतिशय प्रतिकूल होती, परंतु नानासाहेबांचे मन मात्र जिद्दी आणि ध्येयवेडे होते. शिक्षक होऊन समाजपरिवर्तन घडवायचे, हेच त्यांचे स्वप्न होते. शिक्षण घेत असताना त्यांनी अनेक छोटी-मोठी कामे केली – कधी पेपर वाटप, कधी किराणा दुकानात काम – परंतु अभ्यासापासून कधीच दूर गेले नाहीत. शिक्षण हेच त्यांच्या जीवनाचे साधन, शक्ती आणि समाधान बनले.

शिक्षक म्हणून त्यांची पहिली नेमणूक मालेगाव तालुक्यातील सोनज व टाकळी या गावात झाली. तब्बल २८ वर्षे ते या गावात शिक्षक ते मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांचा प्रवास केवळ पदोन्नतीचा नव्हता, तर तो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आमूलाग्र परिवर्तन घडवणारा होता. त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान दिले नाही, तर त्यांना माणूस बनवले.विचारशील, सजग आणि सुसंस्कृत.

त्यांच्या मार्गदर्शनातून घडलेले अनेक विद्यार्थी आज डॉक्टर, इंजिनीयर, प्रशासकीय अधिकारी अशा विविध क्षेत्रांत उत्तुंग भरारी घेत आहेत. हेच त्यांच्या कार्याचे खरे यश त्यांच्या वर्गातून घडलेली नवभारताची पिढी.

सेवानिवृत्ती नंतर नानासाहेब आपल्या मूळगावी बिलखेडा येथे परतले. शिक्षणाच्या क्षेत्रातून सामाजिक कार्याकडे वळत, त्यांनी गावाच्या विकासासाठी उपसरपंचपदाची जबाबदारी स्वीकारली. गावातील पाणी योजना, रस्त्यांचे काम, स्वच्छता अभियान, शाळा सुधारणा आणि विविध सामाजिक उपक्रम – या सर्वांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. गावातील प्रत्येक समस्येकडे ते आपल्या माणसाच्या दृष्टिकोनातून पाहतात आणि सामोपचाराने उपाय शोधतात.

त्यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे त्यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा सन्मान त्यांच्या सेवाभावाची अधिकृत पोचपावती आहे. आजही गावातील लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण त्यांना "नानासाहेब" या प्रेमळ नावानेच संबोधतात – आणि तेच त्यांच्या आयुष्याचे खरे यश आहे.

नानासाहेब हे मा. गुलाबरावजी पाटील (पालकमंत्री, जळगाव जिल्हा) यांचे कट्टर समर्थक आहेत. मात्र ही निष्ठा केवळ राजकीय नसून, विकासाच्या विचारांशी प्रामाणिकपणे बांधिलकी जपणारी आहे. त्यांनी नेहमीच आपल्या नेतृत्वाचा उपयोग समाजाच्या हितासाठी केला आहे.

नानासाहेबांचे जीवन म्हणजे एक जिवंत प्रेरणा आहे – संघर्षातून उभे राहिलेल्या त्या माणसाची, ज्याने स्वतःच्या कष्टांतून इतरांना उज्वल भविष्याची दिशा दाखवली. त्यांनी शिकवले की, परिस्थिती किती ही कठीण असली, तरी मनात ध्येय आणि हातात मेहनत असेल, तर माणूस काहीही साध्य करू शकतो.

आज बिलखेडा गाव त्यांना केवळ माजी मुख्याध्यापक म्हणून नव्हे, तर मार्गदर्शक, समाजसेवक आणि आपुलकीचा आधारवड म्हणून पाहतो. त्यांच्या साधेपणात मोठेपणा, कणखरपणात माणुसकी आणि नेहमी दुसऱ्यांसाठी झिजण्याची वृत्ती हीच त्यांची खरी ओळख आहे.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त नानासाहेबांना मनःपूर्वक शुभेच्छा!
आपले आयुष्य हेच एक प्रेरणादायी पुस्तक आहे – ज्यातून प्रत्येकाने शिकण्यास हवे.
आपण खरंच आदराचे, सन्मानाचे आणि अभिमानाचे पात्र आहात!

“वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, नानासाहेब!”

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 
  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !