"शब्दांच्या पलीकडले शिक्षक – संभाजी इंगळे सर"


"शब्दांच्या पलीकडले शिक्षक – संभाजी इंगळे सर"

गावाकडच्या मातीचा सुगंध असलेल्या अनेक व्यक्ती आपल्याला आयुष्यात भेटतात. काहीजण त्या मातीशी इतकं नातं जपतात की तीच माती त्यांच्या जीवनाची घडण घडवत जाते. अशाच मातीतील एक तेजस्वी दीपस्तंभ म्हणजे संभाजी अभिमन इंगळे – एक शिक्षक, एक मार्गदर्शक आणि माणुसकीचा जिवंत मूर्तिमंत आदर्श.

ताडे (ता. एरंडोल) या छोट्याशा खेड्यात त्यांचा जन्म एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला. घरात साधेपणा, कष्ट आणि परिस्थितीची मर्यादा होती. बालवयातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि घराची संपूर्ण जबाबदारी आईवर येऊन पडली. त्या काळात बालक संभाजी यांनी आईच्या कष्टांतून जीवनाचं खडतर वास्तव पाहिलं आणि मनाशी पक्कं ठरवलं – “आपलं आयुष्य घडवायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही.”

आई शेतात काबाडकष्ट करत असे आणि संभाजी शाळेत शिक्षण घेत असताना तिला हातभार लावत. शिक्षणाची ओढ आणि आईच्या स्वप्नांची प्रेरणा त्यांना सतत पुढे नेत राहिली. लहानपणापासूनच त्यांच्या मनात एक ध्यास होता.शिक्षक बनण्याचा.

त्यांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नांद्रे (ता. पाचोरा) येथून आपली अध्यापनाची कारकीर्द सुरू केली. फळ्यावर खडूने लिहिलेलं पहिलं अक्षर म्हणजे त्यांच्या स्वप्नांचा पहिला अंकुर होता. त्यानंतर काही काळ त्यांनी कर्जत येथे सेवा बजावली.

परंतु त्यांच्या आयुष्यात खऱ्या वळणाचा क्षण आला, जेव्हा त्यांचे जिवलग मित्र डॉ. एस. ओ. पवार यांच्या आग्रहाने त्यांनी एरंडोल येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू होण्याचा निर्णय घेतला.

महात्मा फुले हायस्कूलमध्ये ते केवळ शिक्षक म्हणून नव्हे तर विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, सखा आणि आधारस्तंभ बनले. वर्गात ते केवळ पुस्तकी ज्ञान देत नसत, तर जीवनाचे मूलभूत धडे शिकवत.
त्यांचं एकच तत्त्वज्ञान होतं – “शिकवणं म्हणजे फक्त अध्यापन नव्हे, तर विद्यार्थ्याच्या आत्म्याशी जोडणं.”

वर्गात त्यांचं शिक्षण प्रेमपूर्वक आणि सहृदय होतं. विद्यार्थ्यांनी कधी भीतीने नव्हे, तर प्रेमाने त्यांच्या जवळ यावं, ही त्यांची नेहमीची इच्छा असे. कुठला ही विद्यार्थी त्यांच्यासाठी ‘सामान्य’ नव्हता. प्रत्येकामध्ये असलेल्या सुप्त गुणवत्तेला ते ओळखून, जपून, फुलवून त्याला यशस्वी करत.

त्यांच्या प्रामाणिक कर्तव्यनिष्ठेची दखल घेत त्यांची पदोन्नती होऊन ते त्याच शाळेचे मुख्याध्यापक झाले. मात्र पद, अधिकार किंवा प्रतिष्ठा यामुळे त्यांच्यात कधी ही अहंकार आला नाही. त्यांनी नेहमी सहकाऱ्यांना सोबत घेत, विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी कार्य केले. त्यांच्या कार्यकाळात महात्मा फुले हायस्कूल ही केवळ एक शाळा नव्हती, ती एक संस्कारांची कार्यशाळा बनली होती.

वयाच्या ५८व्या वर्षी ते सेवानिवृत्त झाले. पण शिक्षक ही केवळ त्यांची नोकरी नव्हती – ती त्यांच्या श्वासात होती. म्हणूनच आज वयाच्या ७४व्या वर्षी ही, जेव्हा कोणी विद्यार्थी भेटतो तेव्हा त्यांच्या डोळ्यांत नेहमीच ओळखीचा उबदार झराच दिसतो.
“बरा आहेस ना? काय करतोस?” हा प्रश्न त्यांच्या कडून आल्यावर विद्यार्थ्यांना वाटते, आजही आपल्याला कोणी तरी आपलंसं समजतं.

संभाजी इंगळे सर म्हणजे नम्रता, सच्चेपणा, आणि शिक्षणावर असलेला निखळ विश्वास. त्यांनी केवळ वर्गात शिकवलं नाही, तर अनेकांच्या जीवनप्रवासात उजेड टाकणारा दीपस्तंभ ठरले.

आज ही त्यांच्या आठवणी विद्यार्थ्यांच्या मनात जिवंत आहेत. कुणाचं जीवन त्यांनी दिशा दिली, कुणाला आत्मविश्वास, तर कुणाला प्रेरणा. त्यांच्या शब्दांनी केवळ अभ्यासक्रम नव्हे, तर आयुष्य घडवलं.

संभाजी सर हे एक केवळ नाव नाही, ते एका संपूर्ण पिढीच्या विचारांचं, संस्कारांचं आणि माणुसकीच्या मूळभावाचं मूर्त रूप आहे.
ते निवृत्त झाले, पण त्यांचं शिक्षण आज ही चालू आहे – प्रत्येकाच्या आठवणीत, मनामनात, आणि जीवनाच्या प्रत्येक वळणावर एक प्रेरणा बनून.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 
   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !