शून्यातून विश्व निर्माण करणारे – मूलचंद महादू कोळी
शून्यातून विश्व निर्माण करणारे – मूलचंद महादू कोळी
एखाद्याचं आयुष्य म्हणजे संघर्षाचं जिवंत उदाहरण असतं. गरिबीच्या दलदलीतून मार्ग काढत, दररोजच्या जगण्यासाठी लढत, आपलं विश्व उभं करणाऱ्या व्यक्तींच्या कथा सदैव प्रेरणादायी ठरतात. मूलचंद महादू कोळी यांची जीवन कहाणी देखील अशाच असामान्य प्रवासाची साक्ष देत तही आहे. एका सामान्य माणसाची, पण असामान्य जिद्दीची कहाणी.
पारोळा परिसरातील अत्यंत साधारण कुटुंबात मूलचंदजींचा जन्म झाला. घरात प्रचंड आर्थिक हलाखीची होती. त्यांचे वडील हमालीचे काम करत असत. दोन वेळचे अन्न मिळवणं देखील नशिबावर अवलंबून असे. अशा परिस्थितीत अनेकांचं बालपण हरवतं, पण मूलचंदजी वेगळे होते. लहान वयातच त्यांनी मनाशी एक गोष्ट ठरवली. "शिक्षणाशिवाय पर्याय नाही."
त्यांनी बालपणी मिळेल ते काम करत, उन्हा-तान्हात खपून आपलं शिक्षण पूर्ण केलं. घरातील सर्वात मोठे असल्याने जबाबदारी लवकरच त्यांच्या खांद्यावर आली. चार भाऊ आणि चार बहिणींच्या या मोठ्या कुटुंबात प्रत्येकाचं स्वप्न ते स्वतःचं समजून त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले.
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी पाटबंधारे विभागात रोजंदारीवर मजूर म्हणून कामास सुरुवात केली. हा प्रवास अत्यंत कठीण होता. मात्र तक्रार न करता, खचून न जाता त्यांनी आपली नोकरी प्रामाणिकपणे केली. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेमुळे आणि सातत्यामुळे त्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळाली.
थोडंसं स्थैर्य लाभताच त्यांच्या आयुष्याने पुन्हा एक परीक्षा घेतली.दोन भावांचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना कोणाला ही कोसळवणारी होती. पण मूलचंदजींनी हिम्मत न हारता आपल्या भावांचे अपत्य आपल्या स्वतःच्या मुलांसारखे स्वीकारले. त्यांचं शिक्षण, लग्न आणि पुढचं संपूर्ण आयुष्य सावरण्याची जबाबदारी त्यांनी निभावली. त्याच वेळी आपल्या वृद्ध आई-वडिलांची सेवा आणि काळजी घेणं त्यांनी कधीच सोडलं नाही.
शिक्षणाचं मोल अनुभवलेलं असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना ही तेच शिकवलं. आपल्या मोठा मुलगा ज्ञानेश्वर याला त्यांनी इंजिनिअर बनवलं आणि आज तो महावितरण विभागात यंत्रचालक म्हणून कार्यरत आहे. हे केवळ एका पित्याचं स्वप्नपूर्ती नाही, तर संपूर्ण संघर्षाचं फळ आहे.
मूलचंद कोळी हे अत्यंत साधे, सच्चे आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना न प्रसिद्धीची हाव आहे, न मोठेपणाची. पण त्यांच्या हृदयात मात्र कुटुंबासाठी, समाजासाठी अथांग प्रेम आणि जबाबदारी आहे. त्यांनी केवळ स्वतःचं नाही, तर आपल्या आजूबाजूच्या अनेकांचे आयुष्य उजळवले आहे.
आज त्यांची मुले त्यांच्याच पावलावर चालत आहेत. कष्ट, प्रामाणिकपणा आणि माणुसकीचा वारसा जपत.
मूलचंद महादू कोळी हे नाव नव्हे, तर एका जिद्दी, निष्ठावान आणि जबाबदार जीवनाचं प्रतीक आहे. त्यांनी शून्यातून विश्व उभं केलं आणि त्या विश्वात प्रेम, त्याग, नात्यांची ऊब आणि माणुसकीचा सुगंध दरवळतो.
आज ही ते आपल्या साधेपणात शांतपणे जगत आहेत. मात्र त्यांच्या मागे उभा आहे एक कुटुंबरूपी वटवृक्ष जो त्यांच्या कष्टांमुळेच रुजला, वाढला आणि फुलला. त्यांच्या डोळ्यांत आहे केवळ समाधान “मोठं काही केलं नाही,पण कुणाला झुकवून ही ते जगले नाही.”
अशा माणसांची नोंद इतिहासात होईलच असं नाही, पण त्यांचं कर्तृत्व पिढ्यानपिढ्या जपलं जाईल आदराने, प्रेमाने आणि अभिमानाने एवढ मात्र खरं.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा