"एक उजळलेली वाट – प्रीतीलाल पवार"
"एक उजळलेली वाट – प्रीतीलाल पवार"
काही माणसं फक्त स्वतःचं आयुष्य जगत नाहीत, तर त्यांच्या जीवनातून एक विचार, एक प्रेरणा सतत जागी राहते. संघर्ष, चिकाटी आणि समाजकार्याच्या मूल्यासोबत ज्यांनी आपला जीवनप्रवास घडवला, अशा आदरणीय उपप्राचार्य प्रीतीलाल निंबा पवार यांचं कार्य आणि व्यक्तिमत्त्व हे सर्वांसाठी आदर्शवत आहे.
सन २०१८ मध्ये ते जिल्हा परिषद विद्यानिकेतन आणि कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव येथून उपप्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाले. मात्र, त्यांच्या सेवानिवृत्तीचा अर्थ "विश्रांती" असा नव्हता. कारण त्यांनी सुरू केलेला संघर्षाचा, जिद्दीचा आणि समाजासाठी झिजण्याचा प्रवास अजून ही तितक्याच जोमाने सुरू आहे.
प्रीतीलाल पवार हे मूळचे बहादरपूर (ता. पारोळा) येथील असून, सारवे (ता. धरणगाव) हे त्यांचे वास्तव्याचे व कर्मभूमीचे ठिकाण. सारवे गावातून शासकीय सेवेत भरती होणारे ते त्या काळातील एकमेव व्यक्ति होते, ही गोष्टच त्यांच्या कर्तृत्वाची महत्त्वाची साक्ष देणारी आहे.
त्यांची बालपणीची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. घरात वीज नव्हती, झोपडीचं निवासस्थान होतं, आणि गरिबी हेच रोजचं वास्तव होतं. अशा कठीण परिस्थितीत ही त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून शिक्षणाची ज्योत मनात पेटवली.
गावातच पहिली ते नववी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्या नंतर त्यांनी तारखेडा (ता. पाचोरा) येथील वस्तीगृहात प्रवेश घेतला. तिथे शिक्षण घेत असताना दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला. पुढे त्यांनी मिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद येथे शिकत बी.ए., बी.एड., एम.ए., बी.पी.एड. अशी उच्च शिक्षण पदवी प्राप्त केली.
त्यांनी शिकत असताना अनेक प्रकारची कामं केली. झोपडीतून महाविद्यालया पर्यंतचा प्रवास हे फक्त अंतर नव्हतं, तर तो ध्येयाकडे नेणारा आत्मसंघर्ष होता. वस्तीगृहात राहून त्यांनी शिक्षणा सोबतच विचारांनी स्वतःला घडवलं.
महाविद्यालयीन जीवनात त्यांनी विद्यार्थी संघटनेचं नेतृत्व केलं आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नामांतर आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. या आंदोलनामुळे त्यांना कारागृहवास भोगावा लागला, तरी ही त्यांनी कधीही आपल्या विचारांशी तडजोड केली नाही.
त्यांच्या अध्यापन कार्याची फळं समाजात आज ही दिसतात. त्यांच्या हातून घडवले गेलेले विद्यार्थी आज डॉक्टर, अभियंते, वकील, प्राध्यापक, शिक्षक आणि उच्च पदस्थ अधिकारी झाले आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकांचं ज्ञान दिलं नाही, तर जीवनमूल्यांची आणि संघर्षाची शिकवण दिली.
गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्यांच्या मनात खोलवर रुजलेले आहेत. त्यामुळेच ते आज ही समाजातील दुर्बल, शोषित आणि अशिक्षित घटकांसाठी काम करत आहेत. त्यांच्यासाठी आवाज उठवतात, अन्याया विरुद्ध संघर्ष करतात आणि समाज प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृतीचं कार्य अखंडपणे करत आहेत.
ते नेहमी म्हणतात “समाज प्रबोधनातूनच खरा आनंद मिळतो.”हे केवळ त्यांचे विचार नाहीत, तर त्यांच्या आयुष्याचं सार आहे.
त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहिलं तर सहज समजतं यश ही एखादी पदवी नसून, तो एक झगळण्याचा प्रवास असतो. एक असा प्रवास, जो झोपडीतून सुरू होतो, संघर्षाच्या वादळांतून मार्ग काढतो आणि शेवटी समाजाला प्रकाश देतो.
प्रीतीलाल पवार हे नाव म्हणजे झोपडीतून उठून प्रकाशमान झालेल्या जीवनज्योतीची कथा आहे आणि आज ही ज्योत समाजात नवे दिवे पेटवत आहे.
या उजळलेल्या जीवन दिपास शतशः नमन.
ही प्रेरणाज्योत अखंड तेवत राहो, हीच मन:पूर्वक शुभेच्छा…
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा