"गरिबीच्या धुरातून उगम पावलेला आशेचा उजेड - अ‍ॅड. विजय संतोष चौधरी"


"गरिबीच्या धुरातून उगम पावलेला आशेचा उजेड - अ‍ॅड. विजय संतोष चौधरी"

पाळधीसारख्या एका छोट्याशा गावात, मातीच्या घरात आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत एका बालकाचा जन्म झाला. त्या मुलाचं नाव होतं विजय संतोष चौधरी. 'विजय' हे त्यांचं केवळ नाव नव्हतं, तर त्यांनी आपल्या आयुष्यात प्रतिकूल परिस्थितीवर मिळवलेला खरा विजयच होता.

त्यांचे वडील रोजंदारीवर मजुरी करणारे होते. रोजच्या दोन वेळच्या जेवणाची ही चिंता असलेल्या या घरात शिक्षण केवळ स्वप्नवत होतं. मात्र लहानपणापासूनच विजयने आपल्या मनाशी एक गोष्ट ठाम ठरवली होती. "घरची परिस्थिती बदलायची असेल, आयुष्य घडवायचं असेल, तर काम करून शिक्षणाशिवाय दुसरा कोणता ही पर्याय नाही."

आई-वडिलांची रोजची धडपड, घाम आणि त्याग त्यांनी अगदी जवळून अनुभवले. त्याच सोबत समाजात पदोपदी जाणवणारा अन्याय आणि विषमता यामुळे त्यांच्या मनात लहानपणापासूनच सामाजिक जाण निर्माण झाली. शिक्षण घेत असतानाच ते पाळधी येथील दलित मित्र व्ही.आर. पाटील यांच्या ‘राकेश स्टोन क्रेशर’ या ठिकाणी व्यवस्थापक म्हणून काम करत होते. हे केवळ एक नोकरीचं माध्यम नव्हतं, तर त्यांच्या स्वप्नांचा एक भाग होता. पोलीस विभागात पी एस आय मध्ये भरती होऊन अन्यायाविरुद्ध लढण्याचं.

पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. पी .एस .आय होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं, मात्र त्या ऐवजी ते बनले वकील. वकिली ही त्यांनी केवळ व्यवसाय म्हणून न स्वीकारता, सामाजिक बांधिलकी म्हणूनच उचलून धरली. त्यांनी वकिलीच्या माध्यमातून शोषित, गरजू, आदिवासी आणि वंचित घटकांसाठी आपली उभी हयात अर्पण केली.

आज अ‍ॅड. विजय संतोष चौधरी हे केवळ कायद्याचे जाणकार नाहीत, तर खऱ्या अर्थाने माणुसकीचे सच्चे शिलेदार आहेत. त्यांनी अनाथ, बेघर, गरजू व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अनेक वेळा मदतीचा हात पुढे केला आहे. अनाथालयांमध्ये जाऊन विविध उपक्रम राबवणे, गरजूंना आधार देणे, ही त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक भागच बनलेला आहे. आणि हे सर्व ते कोणता ही दिखावा न करता, अत्यंत निस्वार्थ भावनेने करतात.

ते तीन भाऊ आणि एक बहिणींच्या कुटुंबातील सदस्य असून अत्यंत मनमिळावू आणि दिलखुलास स्वभावाचे आहेत. मित्रमंडळीत ते प्रेमळ, आपुलकीने वागणारे, विश्वासू आणि साथ न सोडणारे म्हणून ओळखले जातात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असलेला साधेपणा, प्रामाणिकपणा आणि दिलदारी यामुळे ते सर्वांच्याच हृदयात आपलेपणाने स्थान निर्माण करतात.

गरिबी काय असते, ती कशी आतून पोखरते, ही वेदना त्यांनी स्वतः अनुभवलेली आहे. त्यामुळेच आज ते गरीब विद्यार्थ्यांप्रती अधिक संवेदनशील आहेत. त्यांची स्वप्नं, त्यांचे अडथळे, त्यांची अस्वस्थता त्यांना समजते, जाणवते आणि म्हणूनच ते त्यांच्यासाठी झटतात.

त्यांचं वकिलीचं व्यासपीठ हे केवळ न्याय मिळवण्यासाठीच नाही, तर माणसांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश देण्यासाठी वापरलं जातं.

अशा या अ‍ॅड. विजय संतोष चौधरी यांचं जीवन म्हणजे एक जिद्दीचा, प्रेरणेचा आणि माणुसकीचा झरा आहे.
ते खरंच दिलदार मनाचे, समाजासाठी झिजणारे, आणि माणसांसाठी जगणारे असामान्य व्यक्तिमत्त्व आहेत!

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 
    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !