"चिखलओहोळचा सुपुत्र देशसेवेपासून जनसेवेकडे"


"चिखलओहोळचा सुपुत्र देशसेवेपासून जनसेवेकडे"

चिखलओहोळ हे गाव आकाराने लहान असले, तरी त्याच्या मातीतील देशप्रेमाची उब मात्र फार मोठी आहे. या पवित्र भूमीने अनेक कष्टकरी घडवले, पण काही थोर सुपुत्रांनी आपल्या कार्यातून या गावाचा माथा अभिमानाने उंच केला. अशाच दोन थोर सुपुत्रांची नावे अत्यंत सन्मानाने घ्यावी लागतील. आदरणीय श्री बी. के. चव्हाण (सेवानिवृत्त सुभेदार) आणि त्यांचे बंधू श्री राजेंद्र चव्हाण (सेवानिवृत्त हवालदार) साहेब.

या दोघा भावांनी तब्बल बावीस वर्षे भारतीय सैन्यदलात सेवा बजावून भारतमातेच्या रक्षणासाठी आपले आयुष्य समर्पित केले. सीमारेषेवर सजगपणे उभे राहणे, शत्रूच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवणे, आणि देशाच्या एकात्मतेसाठी आवश्यक त्या प्रत्येक गोष्टीसाठी सज्ज राहणे. ही त्यांच्यासाठी केवळ एक नोकरी नव्हे, तर ती एक तपस्याच होती.

आज ही त्यांच्या खाकी बूटांची आठवण गावकऱ्यांच्या मनात ताजी आहे. त्या पावलांनी देशाच्या सीमा सुरक्षित ठेवल्या, आणि गावाचे ही नाव उज्वल केले. मात्र आता एक नवा, तेजस्वी अध्याय सुरू झाला आहे. श्री राजेंद्र चव्हाण साहेबांची नुकतीच मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. ही निवड केवळ त्यांच्यासाठीच नाही, तर चिखलओहोळसारख्या छोट्याशा गावासाठी ही मोठा गौरव आहे.

सामान्यतः एखादा सैनिक निवृत्त झाल्यावर विश्रांतीच्या मार्गाला लागतो. परंतु राजेंद्र चव्हाण साहेबांनी मात्र निवृत्तीनंतर ही समाजासाठी काही तरी देण्याचा निर्धार केला. आता ते मुंबईसारख्या महानगरातील लाखो नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस वर्दीतील रक्षक बनणार आहेत.

त्यांचा हा निर्णय त्याग, सेवा आणि समर्पण या मूल्यांची अखंड परंपरा जपणारा आहे. त्यांच्या या कार्यामागे त्यांच्या थोरल्या भावाचे, सुभेदार बी. के. चव्हाण यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा यांचे मोलाचे योगदान आहे. ज्या प्रमाणे त्यांनी निष्ठेने भारतमातेची सेवा केली, त्याच आदर्शावर वाटचाल करत राजेंद्र चव्हाण यांचे हे पुढील पाऊल निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

आज चिखलओहोळच्या प्रत्येक गल्लीत एकच आनंदाची चर्चा ऐकू येते. "आपला राजेंद्र आता मुंबई पोलिस झाला!" प्रत्येक घरात, प्रत्येक वयोगटातील माणसाच्या चेहऱ्यावर हसरा आनंद आणि डोळ्यांत अभिमानाने उभे राहणारे अश्रू दिसून येतात.
हे अश्रू केवळ भावनेचे नव्हेत, तर गावातील संस्कार, मेहनत आणि त्याग यांचा सन्मान करणारे आहेत.

देशासाठी २२ वर्षे झिजल्यानंतरदेखील “आपण अजून समाजासाठी काही करू शकतो,” या विचाराने पुन्हा एकदा समाजसेवेच्या क्षेत्रात सक्रिय होणारे राजेंद्र चव्हाण साहेब हे खरेखुरे प्रेरणास्तंभ आहेत. त्यांच्या या नव्या भूमिकेसाठी त्यांना कोटी कोटी शुभेच्छा!

खान्देश माझाच्या वतीने, मनःपूर्वक अभिनंदन!
“सैन्यातील बूटांपासून ते पोलिस वर्दीपर्यंतचा हा प्रवास तुमचे कर्तृत्व आणि आमचे सौभाग्य आहे!”
राजेंद्र चव्हाण साहेबांना मन:पूर्वक सलाम!

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 
   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !