धानोरा विद्यालय – स्वच्छतेच्या वाटेवरून यशाकडे वाटचाल
धानोरा विद्यालय – स्वच्छतेच्या वाटेवरून यशाकडे वाटचाल
धानोरा – एका छोट्याशा गावात वसलेली, पण मोठ्या स्वप्नांनी उजळलेली एक शाळा. शिक्षण ही केवळ पुस्तकी गोष्ट नसून, ती जीवनशैली असते हे आपल्या कार्यातून सिद्ध करणारी प्रेरणादायी कहाणी म्हणजे झि.तो. महाजन माध्यमिक विद्यालय व ना.भा. पाटील ज्युनिअर कॉलेज, धानोरा.
दि. २९ जून रोजी जैन हिल्स, जळगाव येथे गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या भव्य सोहळ्यात धानोरा विद्यालयाने आपल्या कर्तृत्वाचा एक सुवर्णक्षण गाठत राज्यस्तरीय विशेष पुरस्कार प्राप्त केला. हा पुरस्कार केवळ एक सन्मान नव्हता, तर शाळेच्या स्वच्छतेबाबत घेतलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची आणि सुसंस्कारित शिक्षणपद्धतीची अधिकृत पोचपावती होती.
या गौरवशाली पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी कस्तुरबा सभागृहात विद्यालयाचे चेअरमन प्रदीप महाजन, शालेय समिती सदस्य बी.एस. महाजन, योगेश पाटील, प्राचार्य के.एन. जमादार, पंकज महाजन, समन्वयक वासुदेव महाजन, प्रा. मिलिंद बडगुजर, डिगंबर सोनवणे आणि मच्छिंद्र महाजन उपस्थित होते. या सर्वांनी मिळून शाळेचा मान अभिमानाने उंचावला.
या सोहळ्यास सागर मित्र अभियानाचे संस्थापक विनोद बोधनकर, जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, शिक्षण विभागाच्या राज्य सल्लागार परिषदेचे सदस्य अनिल बोरनारे तसेच गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती लाभली, ज्यामुळे हा सन्मान अधिकच गौरवशाली ठरला.
या यशामागे केवळ चेअरमन किंवा प्राचार्य यांचेच नव्हे, तर शाळेतील प्रत्येक व्यक्तीच्या समर्पणाची आणि कठोर श्रमांची कहाणी दडलेली आहे. बी.एस. महाजन, वामनराव महाजन, योगेश पाटील, सागर चौधरी, व्ही.सी. पाटील, अनिल महाजन, प्रभारी पर्यवेक्षक एल.डी. पाटील, गांधी तीर्थ परीक्षा समन्वयक वासुदेव महाजन, प्रा. मिलिंद बडगुजर, डिगंबर सोनवणे, मच्छिंद्र महाजन तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनोभावे परीश्रम घेतले. ही स्पर्धा त्यांच्या श्वासात जिवंत होती, आणि म्हणूनच हे यश साकार झाले.
स्वच्छतेचा प्रचार हे केवळ भिंतीवर लिहिलेले वाक्य नसते, तर ती एक वृत्ती असते. ती विद्यार्थ्यांच्या मनात आणि वागणुकीत रुजवण्याचे जे कार्य या विद्यालयाने केले, त्याची राज्यस्तरीय स्तरावर दखल घेतली गेली, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. शाळेतील प्रत्येक कोपरा, विद्यार्थ्यांची शिस्त आणि शिक्षकांचे सकारात्मक दृष्टिकोन हेच या पुरस्कारामागचे खरे कारण ठरले.
हे यश म्हणजे स्वच्छतेच्या निमित्ताने संस्कृती, शिस्त आणि सुसंस्कारांचा विजय आहे. जेव्हा एका गावातील शाळा संपूर्ण महाराष्ट्राच्या नकाशावर उठून दिसते, तेव्हा केवळ त्या शाळेचाच नव्हे, तर संपूर्ण गावाचा गर्व वाढतो.
आज धानोरा गाव गर्वाने उभे आहे आपल्या विद्यालयाच्या या सुवर्णयशासह. या यशामागची ही सामूहिक प्रयत्नांची कहाणी इतर शाळांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरेल, यात तिळमात्र शंका नाही.
धानोरा विद्यालयाचे हे यश असेच निरंतर वृद्धिंगत होत राहो…
आणि स्वच्छतेसोबतच संस्कृतीचाही सुगंध शिक्षणाच्या प्रत्येक श्वासात दरवळत राहो!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा