स्व.वैजंताताई शिवदास भोलाणे - गेली माऊली, मागे राहिल्या आठवणी !


स्व.वैजंताताई शिवदास भोलाणे - गेली माऊली, मागे राहिल्या आठवणी !


धरणगाव या पवित्र मातीमध्ये, १ जून १९३७ रोजी जन्मलेल्या स्वर्गीय वैजंताताई शिवदास भोलाणे या एक अत्यंत साध्या, शिस्तप्रिय, शांत स्वभावाच्या आणि अंतःकरणाने समृद्ध अशा मातृरूप होत्या. त्या काळात मुलींसाठी शिक्षणाची संधी मर्यादित असताना ही त्यांनी सातवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून केवळ अक्षर ओळखच नव्हे, तर आयुष्याचे मर्म समजून घेतले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक सुसंस्कृत मृदुता होती. जी त्यांना भेटणाऱ्या प्रत्येकाला सहज अनुभवता येई.

त्यांचे माहेर आणि सासर दोन्ही धरणगाव या गावी असल्यामुळे त्या गावाच्या मातीशी घट्टपणे जोडलेल्या होत्या. त्या नात्याला त्यांनी आपल्या कर्तव्यपरायणतेने, संयमाने, प्रेमाने आणि मायेच्या अपार सागराने अधिकच पवित्र करून टाकले.

संसाराची सुरुवात आर्थिक चणचणीमध्ये झाली. त्यांचा  पतींची परिस्थिती गरिबीची  होती. परंतु, त्या परिस्थितीकडे त्यांनी कधी ही तक्रारीच्या नजरेने पाहिले नाही. उलट, त्या परिस्थितीत ही त्यांनी प्रत्येक दिवस मायेने, कष्टाने, आणि समाधानी वृत्तीने फुलवला. त्यांच्या सहवासात उभा राहिलेला ७२ वर्षांचा प्रदीर्घ संसार हा प्रेम, समर्पण आणि सहनशीलतेचा एक आदर्श होता.

वैजंताताई आजन्म कोणत्या ही गंभीर आजाराने त्रस्त झाल्या नाहीत. शेवटच्या क्षणा पर्यंत त्या हसत-खिदळत, बोलत-चालत होत्या. आणि एका शांत, अनाहूत क्षणी काळाच्या कुशीत विलीन झाल्या. त्यांच्या जाण्यानं केवळ घर नव्हे, तर अख्खं आयुष्यच काही क्षणांसाठी स्तब्ध झालं.

त्यांच्या पाठीमागे एक कर्तव्यनिष्ठ, सुसंस्कारित आणि प्रेमळ कुटुंब उभं आहे. त्यांचे चार सुपुत्र आणि एक कन्या ज्यांनी त्यांच्या संस्कारांची शिदोरी हृदयाशी बाळगून स्वतःचं आयुष्य यशस्वीपणे घडवलं. जेष्ठ पुत्राने पाटबंधारे विभागात नोकरी केली असून सध्या वकिली व्यवसायात कार्यरत आहे. दुसऱ्या पुत्राने समाजकल्याण विभागात सेवा बजावली, तिसरा पुत्र एस.टी. महामंडळात जबाबदारीने कार्यरत होता."त्यांचा सर्वात लहान मुलगा आता वडिलांचा व्यवसाय सांभाळत आहे."
त्यांची कन्या पुण्यात स्थायिक असून तिचे पती अभियंता म्हणून कार्यरत आहेत. ही सर्व संतती आज ही परस्पर प्रेम, सन्मान आणि सुख समाधानात जीवन व्यतीत करत आहे.हाच त्यांच्या आयुष्याचा खरा परिपाक आहे.

आज त्यांच्या कुशीत फुललेली ११ नातवंडे, आणि पुढील पिढीतले तीन पणतू व तीन पणती  ही त्यांच्याच मायेची आणि संस्कारांची जीवरूपं आहेत. त्यातील एक पणती पनवेल येथे अकरावी इयत्तेत शिक्षण घेत आहे.  त्यांच्या शिक्षण प्रेमाची ही साक्ष आहे.

आज ही त्यांचे पती श्री. शिवदास भोलाणे १६ ऑक्टोबर १९३२ रोजी जन्मलेले असून उत्तम आरोग्यानिशी जीवन जगत आहेत. मात्र, त्यांच्या डोळ्यांमधून आज ही सहजीवनाची आठवण आणि वैजंताताईंची अनुपस्थिती हळुवारपणे ओसंडून वाहताना दिसते. एवढा प्रदीर्घ सहवास अचानक हरवतो तेव्हा रिकामेपण किती खोल असतं, हे फक्त अनुभवता येतं.

वैजंताताई हे मातेचं एक मूर्तिमंत, पण अल्पशब्दांत व्यक्त होणारं तेजस्वी रूप होतं. त्या जरी शरीररूपाने आज जरी आपल्यात नसल्या, तरी त्यांचा गंध अजून ही घराच्या प्रत्येक भिंतीत दरवळतो. स्वयंपाक घरातील ओट्यावर, देवघरातील दिव्यात, आणि वाऱ्याच्या प्रत्येक झुळुकीत त्यांच्या मायेचा स्पर्श जाणवत राहतो.

त्यांचं जीवन केवळ एका गृहिणी पुरतं मर्यादित नव्हतं. ते एका युगप्रवर्तक, शांत, संयमी, आणि कुटुंबप्रिय माऊलीचं जीवन होतं. त्यांनी कधी मोठमोठ्या गोष्टी बोलून दाखवल्या नाहीत, पण आपल्या कृतीतून आयुष्य जगून दाखवलं. त्यांनी कधीही स्वतःसाठी काही मागितलं नाही, मात्र आयुष्यभर केवळ दिलं… दिलं, आणि संपूर्ण कुटुंबाला घडवलं.

आई… तुझं शरीर जरी या भौतिक जगातून हरवलं असलं, तरी तू आम्हाला कधीच सोडलंस नाहीस. तू तर आज ही प्रत्येक श्वासात, प्रत्येक आठवणीत आणि प्रत्येक प्रेमाच्या स्पंदनात साक्षात जगते आहेस.

ईश्वर त्यांचा पवित्र आत्म्याला परमशांती देवो ही प्रभू चरणी प्रार्थना.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 
  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !