"बा, तथागता!" - बोलीच्या स्पर्शानं पुन्हा जन्मलेली कविता
"बा, तथागता!" - बोलीच्या स्पर्शानं पुन्हा जन्मलेली कविता
साहित्य हे केवळ शब्दांचं नव्हे, तर आत्म्याचं आणि संस्कृतीचं प्रतिबिंब असतं. आणि जेव्हा एका कवीच्या अंतरंगातून जन्मलेली कविता सव्वा दोनशे पानांची गगनभेदी प्रतिभा घेऊन येते, तेव्हा ती केवळ साहित्यकृती राहत नाही.ती समाजाच्या शुद्ध आत्म्याची साक्ष बनते.
“बा, तथागता!” ही कविता म्हणजे डॉ. म.सु. पगारे यांच्या हृदयातून साकारलेली एक शाश्वत अनुभूती आहे. बुद्धाच्या करुणेचा, आईच्या वात्सल्याचा आणि जीवनाच्या खोल अर्थाचा एकत्रित संगम. ही कविता केवळ बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित नाही, तर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून ही माणूस, त्याचं अस्तित्व, त्याचे संघर्ष आणि त्याचं उध्वस्त होत चाललेलं माणूसपण याचा अत्यंत संवेदनशील व जिवंत विचार करते.
आणि या कवितेला जेव्हा खान्देशच्या मातीचा, शब्दांचा आणि भावनांचा स्पर्श होतो, तेव्हा ती नव्याने फुलते नव्याने उमलते. हे शक्य झालं सुप्रसिद्ध कवी प्रा. वा. ना. आंधळे यांच्या अहिराणी अनुवादामुळे. त्यांच्या भाषांतरातून केवळ ओळींचा नाही, तर भावनांचा, गंधाचा, नात्यांचा आणि संस्कृतीच्या लयींचा अनुवाद झाला आहे.
अहिराणी बोली ही खान्देशच्या जनतेच्या हृदयातून येणारी भाषा आहे. ती शहरी भाषेसारखी कधी स्पष्ट, नीटनेटकी वाटत नाही, पण तिचं एक वेगळंच सौंदर्य आहे. ती ओलसर माती सारखी आहे, जिच्यात आपले पाय रुततात आणि मन खोल खोल झिरपत जातं. “बा, तथागता!” जेव्हा या भाषेत साकारते, तेव्हा ती गावातल्या आईच्या हुंदक्यासारखी वाटते, रानातल्या पावलवाटे सारखी चालते आणि आकाशातल्या चांदण्यां इतकी शांत वाटते.
प्रशांत पब्लिकेशन, जळगाव यांनी हे अनुवादित पुस्तक मूळ कवी आणि अनुवादकाच्या हाती सुपूर्त केलं, तेव्हा केवळ एक प्रकाशन नव्हतं ते, ते एका संस्कृतीचा, एका भाषेचा आणि एका विचारांचा संगम होता. विद्यापीठे ज्या बोलीभाषेवर अभ्यास करत आहेत, चिंतन करत आहेत, त्याच बोलीत ही कविता येते, हे बोलीवाङ्मयासाठी एक सन्मानच म्हणावा लागेल.
या कवितेवर समीक्षक प्रा. डॉ. रमेश माने यांनी नामवंत समीक्षकांचे विवेचन एकत्रित करून समीक्षेचा एक स्वतंत्र ग्रंथ तयार केला. हे या काव्याच्या गहिराईचं, व्यापकतेचं आणि कलात्मकतेचं सर्वोच्च उदाहरण आहे. इंग्रजी, हिंदी आणि आता अहिराणी अशा विविध भाषांमधून झालेलं या कवितेचं भाषांतर ही एक सांस्कृतिक ऐतिहासिक नोंद बनून राहील.
अशा कविता सहसा केवळ लिहिल्या जात नाहीत, त्या अनुभवल्या जातात. त्या मनावर, संवेदनांवर आणि विचारांवर उमटतात. आणि त्या कवितेचं सौंदर्य हेच आहे. ती जशी आहे, तशीच हृदयात झिरपत जाते.
मूळ कवी डॉ. म.सु. पगारे यांचा विचारशील, वैचारिक आणि करुणेला स्पर्श करणारा लेखन प्रवास आणि प्रा. वा. ना. आंधळे यांची बोलीतील अस्सल पकड या दोघांच्या कलासंवादातून “बा, तथागता!” एक नवीन जीवन घेऊन पुढं आली आहे.
आज पुस्तक प्रकाशना आधीच ज्या प्रकारे साहित्यिक विश्वातून या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय, तो या काव्याच्या आत्म्याला ही साक्ष देणारा आहे. की ही कविता आपली आहे, आपल्या भावविश्वाची आहे.
खरंच, काव्याचं जेव्हा अशा प्रकारे भाषांतर होतं, तेव्हा ते भाषांतर नसतं ती भाषेची आत्मा-परिवर्तना असते.
“बा, तथागता!” आज खान्देशच्या बोलीत बोलते आहे. तिचा स्वर आता गावांच्या घराघरांत ऐकू येतो आहे. तिचा स्पर्श हृदयांना भिजवत आहे. आणि म्हणूनच ही कविता अजरामर ठरणार आहे.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा