"अखेरचा सलाम जयगुरु व्यायाम शाळेच्या उस्तादांना"
"अखेरचा सलाम जयगुरु व्यायाम शाळेच्या उस्तादांना"
आज एरंडोलच्या कुस्तीप्रेमी मातीत गहिरं मूक शोक पसरले आहे. ही तीच माती, जिने असंख्य मर्दानी पैलवान घडवले, शौर्य, कर्तृत्व आणि परंपरेचं संगोपन केलं. पण आज तीच माती अश्रूंनी ओलावलेली आहे. कारण तिचा एक कर्तृत्ववान पुत्र, एक अखंड तपश्चर्या करणारा पैलवान, आणि एक निष्ठावान उस्ताद स्वर्गीय पांडुरंग महाले हे आज आपल्यातून निघून गेले आहेत.
त्यांच्या निधनामुळे केवळ एक व्यक्ती हरवलेली नाही, तर एरंडोलच्या कुस्ती क्षेत्रातील एक अख्खं युगच समाप्त झालं आहे. त्यांनी घडवलेली शिस्त, रुजवलेली संस्कारांची बीजं आणि जोपासलेली मातीशी निष्ठा हे सर्व आज काळाच्या कुशीत विसावलं आहे.
पांडुरंग महाले हे केवळ शारीरिक दृष्ट्या बळकट नव्हते, तर त्यांच्या डोळ्यांत तेज, हृदयात प्रामाणिकपणा आणि विचारांत स्पष्टता होती. कुस्ती हे त्यांच्या दृष्टीने केवळ एक खेळ नव्हते ती होती आराधना. माती ही त्यांच्यासाठी दैवत होती. तिच्या कुशीत त्यांनी केवळ घाम सांडला नाही, तर आयुष्य अर्पण केलं.
जयगुरु व्यायामशाळेचे उस्ताद या नात्याने त्यांनी शेकडो तरुणांना घडवलं. त्यांचं मार्गदर्शन म्हणजे केवळ कुस्तीचे डाव नव्हते, तर जीवनाचे पाठ होते. त्यांची हाक कानावर पडली की, प्रत्येक शिष्याच्या छातीत नवचैतन्य संचारायचं. त्यांनी घडवलेले शिष्य हे केवळ कुस्तीच्या मैदानातच नव्हे, तर जीवनाच्या रणांगणात ही विजयी झाले.
त्यांनी शिष्यांना केवळ कौशल्य शिकवलं नाही, तर नम्रता, शिस्त, परिश्रमाची गरिमा आणि पराभवात ही आत्मसन्मान जपण्याची शिकवण दिली. त्यांच्या जीवनातील प्रत्येक कृतीतून एक संदेश मिळायचा “खरा पैलवान तोच, जो स्वतःला जिंकतो.”
त्यांच्या कुस्ती क्षेत्रातील योगदाना बद्दल त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले. मात्र, त्यांनी कधी ही त्याचा अभिमान मिरवला नाही. त्यांच्या डोळ्यांत खरा आनंद तेव्हा दिसायचा, जेव्हा त्यांच्या शिष्यांनी एखाद्या फडात यश संपादन केलं असायचं.
आज ते आपल्या सोबत नाहीत. पण जयगुरु व्यायामशाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात, त्या मातीच्या सुगंधात, घामाच्या प्रत्येक थेंबात, आणि हुंकाराच्या प्रत्येक लयीत ते अजून ही जिवंत आहेत. त्यांची शिकवण, त्यांचं अस्तित्व, त्यांची कर्तृत्वगाथा ही आज ही प्रत्येक शिष्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.
स्वर्गीय पांडुरंग महाले हे परीट धोबी महासंघ सर्व भाषिक संघटना, जळगाव जिल्ह्याचे उपजिल्हाध्यक्ष प्रकाश भाऊ महाले यांचे वडील होते. ही त्यांची वेगळीच सामाजिक ओळख, ज्यातूनच त्यांचं माणूस घडवण्याचं कार्य घराघरात पोहोचलेलं आहे.
आज त्यांच्या आठवणीपुढे नतमस्तक होताना एकच भावना मनात ठस ठसते.“असे उस्ताद पुन्हा होणे नाही. त्यांनी घडवलेली शिस्त, दिलेली शिकवण, रुजवलेली संस्कृती ही जपणं हीच त्यांच्या प्रति खरी आदरांजली.”
उस्ताद, आपण आमच्या हृदयात सदैव अमर राहाल.एरंडोलची माती आपल्याला कधी ही विसरणार नाही.
© दीपक पवार (संपादक)खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा