"माणुसकीच्या वाटेवरील पायवाट"
"माणुसकीच्या वाटेवरील पायवाट"
धरणगावच्या मातीतून उगम पावलेल्या आणि समाजासाठी निःस्वार्थ झिजणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा उल्लेख जेव्हा होतो, तेव्हा एका नावाचा अत्यंत आपुलकीने आणि आदराने उल्लेख होतो — तो म्हणजे श्री. सुनिल भाऊ चौधरी.
चौधरी टेन्ट हाऊसचे यशस्वी उद्योजक, ‘कर्तव्य बहुउद्देशीय संस्था’चे कर्तबगार अध्यक्ष आणि तिळवणतेली समाजाचे मार्गदर्शक नेतृत्व अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत शांत, पण प्रभावी शैलीने पार पाडल्या आहेत. त्यांनी केवळ पद भूषवले नाहीत, तर त्या पदांना आपली प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे.
त्यांचा वाढदिवस म्हणजे एखाद्या व्यक्तीचा साजरा होणारा खास दिवस नसून, समाजहितासाठी समर्पित झालेल्या एका सेवाभावी जीवनाच्या प्रेरणादायी वाटचालीचा सन्मान करण्याची सुवर्णसंधी आहे. धरणगावसारख्या गावात राहून समाजाच्या प्रत्येक थरातील गरज ओळखून मदतीचा हात पुढे करणं, अत्यंत संयमी स्वभावाने कार्य करत राहणं, ही त्यांची खरी ओळख आहे.
‘कर्तव्य बहुउद्देशीय संस्था’ ही केवळ एका कागदावरील संस्था नाही, तर ती त्यांच्या अंत:करणातील सामाजिक जाणीवेचं सजीव रूप आहे. समाजातील वंचित, गरीब व गरजूंना सन्मानाने जगता यावं, विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी, महिलांमध्ये आरोग्याची जागरूकता निर्माण व्हावी आणि तरुणांना दिशा मिळावी, यासाठी त्यांनी अनेक उपक्रम प्रभावीपणे राबवले. त्यांच्या प्रत्येक उपक्रमामध्ये सामाजिक जाणिवांचा साक्षात्कार घडतो.
कोणताही सण असो, संकटांची वेळ असो वा एखादं कुटुंब दु:खात असो सुनिल भाऊ नेहमीच मदतीसाठी तयार असतात. त्यांच्या चेहऱ्यावर कधीही थकव्याची छाया दिसत नाही, कारण त्यांची सेवा ही स्वार्थापोटी नव्हे, तर माणुसकीच्या भावनेतून घडते. व्यवसायात यशस्वी असून ही त्यांनी सामाजिक बांधिलकीला कधीही विसरले नाही, उलट त्या दोहोंचा सुरेख समतोल साधत त्यांनी धरणगावमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
तिळवणतेली समाजाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी समाजबांधणी, नात्यांमधील सलोखा आणि परस्पर सन्मान यांना सदैव प्राधान्य दिलं. कोणत्या ही मतभेदात त्यांनी संयम राखला, प्रत्येक मताचं शांतपणे ऐकून योग्य मार्ग निवडण्याची शिस्त अंगी बाणवली. त्यांची संवादशैली सौम्य आहे, पण प्रभावी आहे.
त्यांचा स्वभाव इतका साधा आणि नम्र आहे की, मोठमोठ्या जबाबदाऱ्या ही ते अत्यंत सहजतेने हाताळतात. कोणत्याही गरजूला ‘नाही’ असं उत्तर त्यांच्याकडून आजवर मिळालं नाही. त्यांच्या मदतीमागे कधीच प्रसिद्धीची आस नव्हती, ना कोणता ही अहंकार. त्यांनी दिलेल्या मदतीत फक्त माणुसकीचा ओलावा होता.
अशा निस्वार्थी व्यक्तींच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्या कार्याचं स्मरण करावं, त्यांच्या जिद्दीचं कौतुक करावं आणि त्यांच्या जीवनातून काही शिकावं, हीच खरी आदरांजली ठरेल. श्री. सुनिल भाऊ चौधरी यांचं संपूर्ण जीवन हे माणुसकी, कर्तव्यभावना आणि समाजसेवा यांचं उत्कृष्ट उदाहरण आहे.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण धरणगाव व परिसरातील नागरिक त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत आहेत. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून आपणही समाजसेवेच्या मार्गावर चालण्याचा निर्धार करूया. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणं आणि कुणाचं ही जीवन थोडंसं अधिक सुंदर करणं, हीच खरी सेवा, आणि अशाच सेवेनेच त्यांच्या कार्याचा गौरव होईल.
श्री. सुनिल भाऊ चौधरी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांचं आरोग्य उत्तम राहो, आयुष्य दीर्घ व आनंददायी असो, आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा संपूर्ण समाजाला लाभो, हीच सदिच्छा.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा