साधेपणाचा आदर्श, जिद्दीचा महामेरू – दाढीवाले गुरुजी
साधेपणाचा आदर्श, जिद्दीचा महामेरू – दाढीवाले गुरुजी
काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात जी आपला साधेपणा, जिद्द आणि कष्टाच्या जोरावरच इतिहास घडवून जातात. अशाच महान शिक्षकाचा, आदर्श गुरूंचा आणि सायकलस्वार शिक्षकाचा वारसा आहे दाढीवाले गुरुजी म्हणून पंचक्रोशीत ओळखले जाणारे स्व.धनराज गुलाबराव सोनवणे ऊर्फ नानासाहेब.
२७ जानेवारी १९४७ रोजी जळगाव तालुक्यातील रायपूर कंडारी या साध्या सरळ गावात जन्म घेतलेल्या नानासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया कष्ट, साधेपणा, जिद्द आणि स्वाभिमान या मूल्यातूनच घडला. सहा भावंडांच्या कुटुंबात, आईवडील आणि आजींच्या सहवासात घडलेले त्यांचे बालपणच त्यांना साधेपणाचा आदर्श घडवून गेले. महात्मा गांधींचे अनुयायी श्री. मणीभाई देसाई यांच्या शेती फार्मवर काम करणारे त्यांचे वडील गुलाबराव सोनवणे ऊर्फ जिभाऊ यांच्या सहवासातच त्यांच्या मनात जनसंपर्क, कष्ट आणि जाणीव या संस्कारांची बीजे रुजली.
लहानपणापासूनच जिद्दीने घडलेल्या नानासाहेबांनी पहाटेच चिंचोली ते जळगाव दूध पोहोचविण्याचे काम करून आपले शिक्षण पूर्ण केले. या जिद्दीतूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया घडवून दिला त्यांच्या वडीलबंधू विश्वासराव ऊर्फ दादांनी, ज्यांच्या सहकार्यानेच त्यांच्या शिक्षक होण्याच्या स्वप्नाला आधार मिळाला. कष्टाच्या जोरावरच त्यांनी शिक्षक म्हणून आपला प्रवास सुरू केला.
१९७० साली रायगड जिल्ह्यातील आमशेत, सांदोशी या गावांतून त्यांच्या समर्पणाचा आणि कर्तव्यनिष्ठेचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर १९७५ साली ते जळगाव जिल्ह्यात दाखल झाले, जिथे त्यांच्या सेवाकाळाचा मोठा हिस्सा धरणगाव, जांभोरे, पळसखेडे आणि रोटवद या गावांत गेला. साधेपणाचा आणि कष्टाचा समतोल साधणाऱ्या या गुरुजींचा साधा पोशाखच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळेपणा जपून राहिला. पांढरा शुभ्र कुर्ता-पायजमा, डोक्यावर गांधी टोपी आणि दाढीमिशांची हटके शैली यांनी पंचक्रोशीत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळा ठसा उमटविला. सायकलच त्यांच्या जिद्दीचे प्रतीक बनली. कडक उन्हात, थंडीत किंवा पावसाच्या सरीत ही आपली सायकलच त्यांच्या समर्पणाचा साक्षीदार राहिली.
विद्यार्थ्यांच्या जीवनात आपुलकीचे स्थान मिळवणारे हे गुरुजी पहिली–दुसरीच्या चिमुकल्यांच्या विश्वात लहान होऊन रमायचे. शाळेतील वृक्षजतन असो किंवा गावातील जनसंपर्क प्रत्येक गोष्टीत त्यांनी आपली छाप सोडली. उन्हाळ्याच्या सुट्टीत ही शाळेतील झाडांची निगा राखण्यासाठी दुसऱ्यागावी जाणे टाळणारे, योग-व्यायामाच्या माध्यमातून मुलांच्या जीवनाचा पाया घडवणारे नानासाहेब गावकऱ्यांच्या हृदयाचा हिस्सा झाले.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या शिस्तबद्धतेकडे, व्यसनमुक्तीकडे लक्ष देणाऱ्या या गुरूंचे कार्य अतुलनीय आहे. रोटवद गावात घडलेल्या एका विद्यार्थ्याच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला योग्य आर्थिक आधार मिळवून देण्यासाठी त्यांनी घेतलेली पुढाकार त्यांच्या सहृदयी वृत्तीचंच जिवंत उदाहरण आहे.
विद्यार्थ्यांच्या हृदयात आपुलकीचं स्थान मिळवणारे, साधेपणा जपणारे, कष्टाचा आदर्श घालून देणारे हे दाढीवाले गुरुजी निवृत्ती नंतर लगेचच दुर्धर आजाराने ग्रासले गेले. तरी देखील त्यांच्या जिद्दीने त्यांनी मृत्यूशी सामना केला. वयाच्या ६९व्या वर्षी या थोर गुरुजींनी जगाचा निरोप घेतला.
आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांच्या साधेपणाचा आदर्श, कष्टाचा महामेरू, जिद्दीचा वारसा आणि आपुलकीचं स्मरण त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आणि गावकऱ्यांच्या मनात कायमच जपले जात आहे. दाढीवाले गुरुजी ऊर्फ नानासाहेब साधनेचा आदर्श, कष्टाचा महामेरू, सायकलस्वार शिक्षक म्हणून कायमच स्मरणात राहतील. त्यांच्या साधनेने, त्यांच्या जिद्दीने आणि त्यांच्या विद्यार्थीप्रिय वृत्तीने आम्हा साऱ्यांना आज ही प्रेरणा मिळत आहे.
अशा थोर गुरुजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
© दीपक पवार (संपादक), खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा