शिवसेनेच्या सावलीत उमललेला वाघ

शिवसेनेच्या सावलीत उमललेला वाघ

"एकच नेता, एकच झेंडा, एकच पक्ष आणि एकच मैदान" ही घोषणा केवळ शब्दांची रचना नव्हे, तर ती आहे एका विचारधारेची, निष्ठेची आणि संघर्षातून निर्माण झालेल्या कार्यकर्त्याच्या जीवनाचे प्रतीक. ही कहाणी आहे गुलाबराव वाघ या जिद्दी, कणखर आणि तळमळीच्या शिवसैनिकाची, ज्यांनी १९८४ साली अवघ्या ११वीत शिकत असताना विद्यार्थी सेनेची स्थापना करून आपले संपूर्ण आयुष्य शिवसेनेच्या विचारांना वाहिले.

त्या काळात इतक्या लहान वयात भगव्या झेंड्याखाली उभं राहण्याचं आणि पक्षासाठी प्रामाणिकपणे झटण्याचं धाडस फार थोड्या माणसांमध्ये दिसून येत होतं. गुलाबराव वाघ हे त्यातलेच एक. कार्यालय प्रमुख या अत्यंत सामान्य पदावरून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. त्या छोट्याशा पायरीवरून शहरप्रमुख, उपतालुकाप्रमुख, तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख, एस.टी. कामगार सेनेचे जिल्हा प्रमुख, शिवसेना सहसंपर्कप्रमुख अशी पदांची शिडी चढत, अखेर त्यांनी शिवसेनेच्या उपनेत्यापदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास पूर्ण केला. ही फक्त पदोन्नती नव्हे, तर त्यांच्या चार दशके चाललेल्या निष्ठावान, संयमी आणि कार्यतत्पर जीवनप्रवासाची ही प्रत्यक्ष पावती आहे.

त्यांच्या नेतृत्वगुणांची बीजे लहानपणापासूनच दिसून येत होती. कामगारांचे प्रश्‍न समजून घेऊन रस्त्यावर उतरून संघर्ष करणं त्यांनी कधी टाळलं नाही. पण, याच संघर्षाचा उपयोग त्यांनी कधी ही वैयक्तिक स्वार्थासाठी केला नाही. पदं ही त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची नव्हे, तर जबाबदारीची पातळी होती. त्यांनी प्रत्येक पदाला कामाची संधी मानत, कार्यकर्त्यांमध्ये विश्वास आणि विश्वासार्हता निर्माण केली.

आज त्यांच्या नावासमोर "शिवसेना उपनेते" ही पदवी जोडली गेली असली, तरी त्यांच्या मनात आणि हृदयात ते आज ही १९८४ सालचे विद्यार्थी सेना प्रमुखच आहेत. त्या काळी अंगावर भगवा घेऊन कार्यकर्त्यांमध्ये वावरणारे वाघ साहेब, आज ही कार्याच्या अगदी पहिल्या रांगेतच दिसतात. त्यांची कृती हीच त्यांची ओळख आहे. ते भाषणांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवतात. त्यांच्या डोळ्यांत आक्रमकता नसते, पण त्यांच्या मनगटात कामगिरी करण्याची कणखरता असते. हेच त्यांना सामान्यांपासून खास बनवतं.

शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची त्यांनी मातोश्री निवासस्थानी घेतलेली सदिच्छा भेट ही औपचारिक ते पलीकडची होती. ती भेट एका निष्ठावंत शिवसैनिकाच्या पाठीवर ठेवलेला विश्वासाचा हात होती. साहेबांच्या डोळ्यांत उमटलेली समाधानाची छटा आणि गुलाबराव वाघ साहेबांच्या डोळ्यांतून झळकणारी निष्ठा हे दृश्य प्रत्येक शिवसैनिकाच्या हृदयाला भावणारं होतं.

त्या ऐतिहासिक भेटीप्रसंगी उत्तर महाराष्ट्राचे नेते संजयजी राऊत, शिवसेना सचिव व आमदार मिलिंदजी नार्वेकर, जिल्हा संपर्कप्रमुख संजयजी सावंत, सुरेश नाना चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लकी अण्णा, पंचायत समितीचे सभापती दीपकभाऊ सोनवणे, भगवान धनगर यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. त्यामध्ये नेते होते, पण त्याहून अधिक महत्वाचे म्हणजे गुलाबराव वाघ साहेबां सोबत खांद्याला खांदा लावून काम केलेले कार्यकर्ते होते. त्यांच्या डोळ्यांत ओसंडून वाहणारा अभिमान आणि कृतज्ञता, हा त्या क्षणाचा आत्मा होता.

आज गुलाबराव वाघ साहेबांना रावेर लोकसभा व नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. ही जबाबदारी म्हणजे पक्षाची, कार्यकर्त्यांची आणि जनतेची त्यांच्यावर ठेवलेली विश्वासाची मोहर आहे. शिवसैनिकांच्या मनात एकच भावना आहे "आपलं माणूस आपल्या सोबत आहे." वाघ साहेब जेव्हा कामाचं सूत्र हातात घेतात, तेव्हा संपूर्ण जिल्हा निश्चिंत असतो. कारण ते फक्त आदेश देत नाहीत, तर त्यांची अंमलबजावणी करत स्वतः मैदानात उतरणारे नेते आहेत.

शिवसेना अनेक वादळांना तोंड देत आज या टप्प्यावर पोहोचली आहे. पण या वादळात ही काही वाघ शांतपणे उभे राहतात न डगमगता, न ढळता. गुलाबराव वाघ साहेब हे त्यातलेच. त्यांनी कधी ही निष्ठा सोडली नाही, पक्ष बदलला नाही, विचारांशी प्रतारणा केली नाही. म्हणूनच आज त्यांचं नाव शिवसैनिकांच्या हृदयात कोरलेलं आहे.

ते नेहमी सौम्य, संयमी आणि सुसंवाद साधणारे असले तरी, त्यांच्या निर्णयांमध्ये नेहमी दूरदृष्टी असते. एकीकडे कार्यकर्त्यांशी स्नेहाने वागताना दिसणारे वाघ साहेब, दुसरीकडे राजकीय डावपेचात नेमकी चाल खेळण्याचे कसब ही बाळगतात. हे संतुलन फार थोड्या नेत्यांमध्ये दिसतं.

गुलाबराव वाघ साहेब हे केवळ राजकीय व्यक्तिमत्त्व नाहीत, तर ते एका विचारधारेचा, निष्ठेचा आणि सेवा भावनेचा साक्षात प्रतिरूप आहेत. त्यांनी सिद्ध केलं की, नेतृत्व हे पदावरून सिद्ध होत नाही; ते कृतीतून, निष्ठेतून आणि जनतेच्या सुख-दुःखात सामील होण्याच्या वृत्तीमधून घडतं.

शिवसेना म्हणजे फक्त पक्ष नव्हे, तर ती एक चळवळ आहे, एक ज्वालामुखी आहे, आणि त्या ज्वालामुखीत स्वतःला होम करणाऱ्या योद्ध्यांपैकी एक म्हणजे गुलाबराव वाघ साहेब.

त्यांच्या पुढील वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा! त्यांनी सुरू केलेला निष्ठेचा हा वटवृक्ष अधिक बहरो, त्यांच्या सावलीत नवशिवसैनिक घडोत, आणि भगवा झेंडा अधिक जोमाने फडकत राहो हीच मनःपूर्वक भावना.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 
  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !