"शांततेच्या वाटेवरचा योद्धा – शालिग्रामभाऊ गायकवाड"


"शांततेच्या वाटेवरचा योद्धा – शालिग्रामभाऊ गायकवाड"

शांतपणे, कोणता ही गवगवा न करता समाजासाठी अखंडपणे कार्य करणारी काही माणसं आपल्या आजूबाजूला असतात. त्यांच्या कार्याचा आवाज कधी ढोल-ताशांतून ऐकू येत नाही, पण त्यांच्या कृतींचा ठसा समाजाच्या मनावर खोलवर उमटलेला असतो. एरंडोल शहरात गेली चार दशके सामाजिक सलोखा, धार्मिक शांतता आणि जनहितासाठी अविरत झटणारे असेच एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणजे माजी बाजार समितीचे सभापती तथा माजी उपनगराध्यक्ष श्री. शालिग्रामभाऊ गायकवाड.

त्यांच्या या अमूल्य योगदानाची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी साहेब यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देऊन विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नव्हता, तर त्यांच्या माध्यमातून उभ्या समाजसेवेच्या मूल्यांचा गौरव होता.

श्री. शालिग्रामभाऊ गायकवाड यांनी गेल्या चाळीसहून अधिक वर्षांपासून पोलीस प्रशासनाला अत्यंत संवेदनशील प्रसंगांमध्ये, विविध धार्मिक उत्सवांमध्ये आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या नेतृत्वाखाली एरंडोल शहराने अनेकदा शांततेत आणि समतेत विविध उत्सव यशस्वीरीत्या पार पाडले. हे केवळ प्रशासना सोबतचं सहकार्य नव्हतं, तर समाजात बंधुभाव निर्माण करणाऱ्या एका सजग नेतृत्वाचं जिवंत उदाहरण होतं.

शहरातील सर्व समाजांच्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले. यामध्ये सर्वांत भावनिक आणि मोलाचं कार्य म्हणजे त्यांनी दलित वस्तीत वास्तव करून तिथल्या समस्या प्रत्यक्ष अनुभवल्या आणि त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. दुःखाच्या क्षणी आधार देणं आणि सुखाच्या प्रसंगी सहभागी होणं हे त्यांच्या स्वभावातच आहे. म्हणूनच ते दलितांचे खरे नेते ठरले केवळ नावापुरते नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीने.

दलित बांधवांचे प्रश्न मांडणं, त्यांना आत्मसन्मानाने जगण्यास प्रवृत्त करणं आणि त्यांच्या पाठीशी सदैव उभं राहणं हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय राहिलं. त्यामुळेच आज ही दलित समाज त्यांना आपला आधारस्तंभ मानतो. त्यांच्या कार्यातून एकता, समता आणि न्याय या मूलभूत मूल्यांना नव्याने अर्थ प्राप्त झाला.

श्री. शालिग्रामभाऊ गायकवाड यांच्या कार्यकाळात एरंडोल शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. हे स्मारक केवळ एक मूर्ती नसून, दलित चळवळीच्या विचारांचा आणि आत्मसन्मानाचा प्रतीक बनलेलं एक प्रेरणास्थान आहे. शालिग्रामभाऊ गायकवाड यांचं हे कार्य केवळ एका शहरापुरतं मर्यादित राहिलं नाही, तर बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचारक म्हणून त्यांनी आपली जबाबदारी अत्यंत सचोटीने पार पाडली.

या सर्व कार्याची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी साहेब यांनी स्वतः त्यांच्या हस्ते त्यांना सन्मानित केले. या प्रसंगी चाळीसगाव विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते साहेब तसेच इतर अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. ही उपस्थिती केवळ औपचारिक नव्हती, तर त्यांच्या सामाजिक कार्याला दिलेला एक जाहीर सलाम होती.

श्री. शालिग्रामभाऊ गायकवाड यांचा हा सन्मान हे एक जिवंत उदाहरण आहे की, समाजासाठी मन:पूर्वक, प्रामाणिकपणे केलेले कार्य कधीच व्यर्थ जात नाही. त्यांच्या कार्यातून पुढच्या पिढ्यांना प्रेरणा मिळेल. शांततेने कार्य करा, इमाने इतबारे जगा, आणि समाजासाठी समर्पित राहा.

श्री. शालिग्रामभाऊ गायकवाड यांना मन:पूर्वक सलाम त्यांच्या सत्कारामागे उभं असलेलं चाळीस वर्षांचं नि:स्वार्थ योगदान हेच त्यांचं खरं गौरवपत्र आहे.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !