रिमा देसले यांचा जिल्हास्तरीय मुकुट – एक शेतकरी महिलेची प्रेरणादायी वाटचाल
रिमा देसले यांचा जिल्हास्तरीय मुकुट – एक शेतकरी महिलेची प्रेरणादायी वाटचाल
जळगाव – जगाला अन्न पुरवणाऱ्या हातांना समाजात मान मिळतो, तेव्हाच खरी कृषीसंस्कृती फुलत असते. खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये मुग पीक उत्पादनाच्या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील रिमा किरण देसले या कष्टकरी शेतकरी महिलेने जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक पटकावून एक ऐतिहासिक क्षण निर्माण केला आहे.
ही केवळ एक स्पर्धा नव्हती, तर दररोज मातीला नमस्कार करणाऱ्या, जमिनीशी मनापासून नातं जपणाऱ्या एका स्त्रीच्या श्रद्धेची आणि निष्ठेची परीक्षा होती. ही परीक्षा रिमा ताईंनी आत्मविश्वास, समर्पण आणि स्पष्ट नियोजनाच्या बळावर यशस्वीपणे पार केली.
या विशेष कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी मा. आयुष प्रसाद यांच्या हस्ते रिमा देसले यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाला कृषी विभागाचे मा. जिल्हा कृषि अधिकारी तडवी साहेब व इतर मान्यवर आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिमा देसले यांचं शेतीशी असलेलं नातं केवळ व्यवसायापुरतं मर्यादित नाही, तर ते त्यांच्या श्वासात मिसळलेलं आहे. त्यांनी पारंपरिक अनुभवात आधुनिक ज्ञानाची जोड देत शेतीचा नवा आदर्श निर्माण केला. सेंद्रिय मार्गांचा अवलंब करत, जमिनीच्या गरजांचा अभ्यास करून, वेळेवर पेरणी केली. पाण्याचं काटेकोर नियोजन, नैसर्गिक कीड नियंत्रण, सातत्यपूर्ण निरीक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्या समन्वयातून त्यांनी मुग पिकात उच्च उत्पादन मिळवलं.
त्यांचा हा विजय म्हणजे सातत्यपूर्ण ध्येयधोरणांचा, अथक परिश्रमांचा आणि निसर्गाशी प्रामाणिक संवादाचा विजय आहे.
रिमा देसले यांचं यश केवळ वैयक्तिक नाही, तर ते शेतशिवारात झळकणाऱ्या स्त्रीशक्तीचं प्रतीक आहे. शेतात काम करणारी स्त्री फक्त कामगार नसते, तर ती विचार करणारी, निर्णय घेणारी आणि यशाचं नियोजन करणारी खरी व्यवस्थापक असते, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केलं आहे.
आजही ग्रामीण भागातील अनेक शेतकरी महिला सामाजिक प्रकाशझोतातून दूर आहेत. पण रिमा ताईंसारख्या महिलांचा अशा पातळीवर होणारा सन्मान हजारो स्त्रियांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरतो.
या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये नव्या उत्साहाची लहर निर्माण झाली आहे. पारंपरिक पद्धती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा समतोल राखला, तर कोणतीही अडथळ्यांची शर्यत जिंकता येऊ शकते, हे रिमा देसले यांनी आपल्या यशातून दाखवून दिलं.
त्यांच्या अनुभवातून अनेक युवक व महिला प्रेरणा घेऊन आता आधुनिक, सेंद्रिय व शाश्वत शेतीच्या वाटेवर निघाले आहेत.
रिमा देसले यांचं हे यश हे केवळ एका स्पर्धेतील यश नाही, तर ते हजारो महिलांच्या स्वप्नांना वाट देणारं तेजस्वी उदाहरण आहे. त्यांच्या हातात माती आहे, पण डोळ्यांत आभाळभर विश्वास. हेच आहे खऱ्या अर्थाने स्त्रीशक्तीचं शेतातलं स्वाभिमान.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा