"शाळेच्या पायऱ्यांवर उमललेली माणुसकीची फुलं…"
"शाळेच्या पायऱ्यांवर उमललेली माणुसकीची फुलं…"
धरणगावच्या मातीला शिक्षणाच्या सुगंधाने पुन्हा एकदा नवा गंध लाभला… महात्मा फुले हायस्कूलच्या पवित्र आवारात आज आनंदाचा, समाधानाचा आणि माणुसकीच्या प्रेमाचा वसंत फुलला.
महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना परिवाराने जे शैक्षणिक साहित्य वाटपाचं पवित्र कार्य केलं, ते केवळ कागदावरचे कार्यक्रम नव्हते… ते होती आयुष्य घडवण्याची एक शांत, पण ठाम सुरावट!
पी.डी. पाटील यांच्या सुरेल शब्दांनी या कार्यक्रमाची सुरूवात झाली आणि एका साध्या शाळेच्या कट्ट्यावर शिक्षणाच्या आशेचा दिवा उजळून निघाला. शाळेचे मुख्याध्यापक जे.एस. पवार अध्यक्षस्थानी बसले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं, त्या मदतीचा भारावलेला अभिमान.
कार्यक्रमात उपस्थित शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पी.एम. पाटील, गटनेते पप्पूदादा भावे, शहर प्रमुख विलास महाजन, राष्ट्रीय चर्मकार संघाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास विसावे, माजी उपनगराध्यक्ष विजय महाजन, धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे शहराध्यक्ष बाळू जाधव, महेंद्र (बुटा) पाटील, संजय चौधरी, धिरेंद्र पुरभे, हेमंत चौधरी, वाल्मिक पाटील, तौसिफ पटेल, संजय पवार, सोनु महाजन, अहमद पठाण, आणि उपस्थित सर्व शिवसेना सैनिकांचे प्रेम शाळेच्या प्रत्येक भिंतींना जाणवत होतं.
शाळेच्या वतीने या प्रत्येक माणुसकीच्या पुतळ्याचं पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत केलं गेलं.
पी.एम. पाटील आणि भानुदास विसावे यांनी आपल्या भाषणात शिवसेनेच्या कार्याला न्याय दिला . "८०% समाजकारण आणि २०% राजकारण". हे केवळ वाक्य नव्हतं… ते त्या क्षणी त्यांच्या कृतीतून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं होतं.
माजी उपनगराध्यक्ष विजय महाजन यांनी शाळेच्या पुस्तक पेढीसाठी थेट ११,००० रुपयांचं योगदान जाहीर करून शैक्षणिक भविष्याचा मजबूत पाया रचला.
तेवढ्यात गटनेते पप्पू भावे पुढे आले आणि १०० विद्यार्थ्यांना बुट देण्याचं आश्वासन दिलं… त्यांच्या या शब्दांत केवळ मदतीचं आश्वासन नव्हतं… तर गरिबीच्या काटेरी वाटेवर प्रेमाने घालून दिलेलं मखमली पायघोळ होतं.
कार्यक्रमात १५०० वह्या वाटप झाल्या, प्रत्येक वहीत आशेचा शाईने लिहिलेला नवा अध्याय होता… शिकून मोठं होण्याचं स्वप्न होतं… आई-बाबांच्या डोळ्यात नव्या सकाळीचा उजेड होता.
मुख्याध्यापक जे.एस. पवार यांनी कृतज्ञतेच्या शब्दांत म्हणाले “शिवसेना परिवाराचं हे प्रेम आम्हा सर्वांसाठी प्रेरणा आहे. ही मदत केवळ वह्यांची, पुस्तकांची नाही… ही मुलांच्या भविष्याची मशाल आहे.”
एस.एन. कोळी यांनी मृदू पण उत्साही शब्दांत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं आणि व्ही.टी. माळी यांनी शब्दशः मनाच्या कोपऱ्यातून आभार मानले.
हा दिवस महात्मा फुले हायस्कूलच्या इतिहासात केवळ "साहित्य वाटपाचा दिवस" म्हणून नव्हे, तर "माणुसकीच्या प्रेमाचा दिवस" म्हणून नोंदला गेला. कोणी म्हणतं शिक्षण बदल घडवतं… पण आज त्या छोट्या वहीतून आणि पुस्तकांमधून धरणगावच्या मातीवरच माणुसकीचा इतिहास लिहिला गेला.
आज त्या मुलांच्या नजरेत एक नवा आत्मविश्वास दिसला… आणि उद्या तेच विद्यार्थी आपल्या शिक्षणाच्या बळावर जग जिंकल्यावर, कधीतरी आपल्या शाळेच्या पटांगणात उभं राहून म्हणतील “कधीकाळी कोणीतरी आमच्या पाठीवर मायेचा हात ठेवला होता…!”
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा