"शब्दापेक्षा कृती मोठी – आदर्शवत जीवन जगणारे आबासाहेब"
"शब्दापेक्षा कृती मोठी – आदर्शवत जीवन जगणारे आबासाहेब"
धरणगाव तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात एक अत्यंत आदरणीय नाव म्हणजे आदरणीय आबासाहेब सी.के. पाटील. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या दिलदारपणाचा आठवणींनी भरलेला एक भावनिक क्षण अनुभवतो आहोत.
विचारांनी स्पष्ट, मनाने विशाल आणि कृतीत नेहमी सजग असलेले आबासाहेब म्हणजे एका शांत, संयमी, अभ्यासू आणि कधीही कोणावरही रागावणार नाहीत अशा सहृदय व्यक्तिमत्त्वाचं दर्शन. त्यांचं जीवन म्हणजे एका शिस्तबद्ध प्रवासाची गाथा. कुठला ही गाजावाजा न करता, कुठलाही दिखावा न करता ते आपल्या कर्तृत्वातून समाजाला दिशा देत आले आहेत.
त्यांचं शिक्षणातील योगदान केवळ संस्थाचालक म्हणून मर्यादित नाही, तर ते एक वैचारिक मार्गदर्शक आहेत. प्रा. तात्यासाहेब व्ही. जी. प्राथमिक विद्यालय, इंदिरा गांधी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय आणि आदर्श शिक्षण संस्था यामधून हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवताना त्यांनी शिक्षणाचं खरं स्वरूप जगासमोर मांडलं. शिक्षक लोकशाही आघाडीचे सचिव म्हणून त्यांचं कार्य शिक्षकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या एका सजग आणि प्रगल्भ नेतृत्वाचे प्रतिक बनलं आहे.
राजकीय क्षेत्रात इंदिरा काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी जे नेतृत्व दिलं, ते नेहमी कार्यकर्त्यांसोबत खांद्याला खांदा लावून चालणारं आणि मार्गदर्शन करत करत पुढे नेणारं होतं. त्यांनी नेहमी कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास दिला आणि त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं बळ दिलं. त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे एक स्पष्ट विचारसरणी असते.समाजहित, शिक्षणहित आणि मानवी मूल्यांची जपणूक.
त्यांचं बोलणं नेहमी सौम्य, पण ठाम असतं. त्यांचं हास्य निर्मळ असतं आणि डोळ्यातून माणुसकी झळकते. जेव्हा ते विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात सहभागी होतात, तेव्हा एक शिक्षक, एक पालक, एक मार्गदर्शक आणि एक मित्र अशा साऱ्या भूमिका ते सहजतेने निभावतात.
ते केवळ समाजाचे नेतृत्व करत नाहीत, तर माणसांच्या मनात घर करून राहिले आहेत. त्यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे एक विशाल सावली, जिथे प्रत्येकाला आश्रय, आधार आणि प्रेरणा मिळते. त्यांचा प्रत्येक क्षण कार्यमग्न आणि समाजाभिमुख असतो. त्यांच्या साधेपणात भव्यता आहे, आणि त्यांच्या शांततेत गूढ प्रेरणा आहे.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण तालुक्याच्या मनात एकच भावना आहे. कृतज्ञतेची. त्यांच्या योगदानाबद्दल, त्यांच्या सेवाभावाबद्दल, आणि त्यांच्या माणुसकीच्या नात्याबद्दल.
आबासाहेब, तुमचं हे शांत, संयमी, अभ्यासू आणि दिलदार मन असंच पुढेही हजारो लोकांना प्रेरणा देत राहो. तुमच्या विचारांनी, मार्गदर्शनाने आणि प्रेमळ सहवासाने धरणगावच्या मातीत एक नवा उजेड फुलत राहो.
आपल्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
आरोग्य, आनंद, आणि कार्यसिद्धीची भरभराट तुमचं आयुष्य सदैव व्यापून राहो, हीच अंतःकरणातून प्रार्थना.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा