आदर्श गावासाठी आदर्श नागरिकाची गरज....!


आदर्श गावासाठी आदर्श नागरिकाची गरज....!


गावाचं सौंदर्य फक्त हिरवीगार शेतं, मंदिरांची शिखरं, किंवा नद्या-ओढ्यांमध्ये नसतं. गावाचं खरं सौंदर्य तिथल्या लोकांच्या वागण्या-बोलण्यात, परस्पर सहकार्याच्या भावनेत आणि जबाबदारीच्या जाणिवेत असतं. आपण नेहमी बोलतो “सरपंच असा असावा, तसा असावा.” पण कधी स्वतःला विचारलंय का “नागरिक कसा असावा?” कारण गावाचा खरा चेहरा हा नागरिकांच्या हाताने घडतो किंवा बिघडतो.

आज अनेक गावांत चित्र असं आहे की रस्त्यावर गुरं-ढोरं, शेळ्या बांधलेल्या असतात. खतासाठी खड्डे खोदून त्यात खत टाकलं जातं. घरातील सांडपाणी सरळ रस्त्यावर सोडलं जातं. मुख्य रस्त्यांवर किंवा गल्लीबोळात चारचाकी गाड्या उभ्या करून लोकांच्या ये-जा करण्याला अडथळा निर्माण केला जातो. काही जण मोटरसायकल एवढ्या सुसाट चालवतात की लहान-मोठ्या अपघाताची वेळ येते. हे सर्व केवळ गैरसोय निर्माण करत नाही, तर गावाच्या प्रतिमेला ही डाग लावते.

सरपंच निधी आणून देवळं बांधू शकतो, शाळा दुरुस्त करू शकतो, सभा घेऊ शकतो. पण तुमच्या अंगणातील स्वच्छता, तुमच्या घरातून बाहेर पडणारं सांडपाणी, रस्त्यावरचा कचरा हे कुणी तुमच्यासाठी हाताने उचलणार नाही. गाव चांगलं ठेवणं ही जबाबदारी सरपंचाची नाही, ती प्रत्येक घराघरातील व्यक्तीची आहे. पद हे तात्पुरतं असतं, पण नागरिकपद हे जन्मापासून मृत्यूपर्यंत टिकतं.

जर आपण बदलायला तयार नसू, तर इंद्रदेव ही सरपंच झाला तरी गाव बदलणार नाही. सुज्ञ नागरिक होणं म्हणजे केवळ स्वतःला स्वच्छ ठेवणं नाही, तर आपल्या कृतीमुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणं आहे. गावातील जेष्ठांचा सल्ला घेणं, वाद टाळणं, एकमेकांच्या मदतीला धावून जाणं, आणि विकासाच्या कामात सक्रिय सहभाग घेणं हाच आदर्श नागरिकतेचा मार्ग आहे.

आज गावागावात एक वेगळीच हवा आहे अहंकाराची. कुणी कुणाशी बोलत नाही, चांगल्या विचारांची देवाणघेवाण थांबली आहे. प्रत्येकाला वाटतं मला कोणाची गरज नाही. पण खरं सांगायचं झालं, तर विकास हा एकट्याने होत नाही. तो एकत्र येऊन, मनं जोडून होतो.

म्हणूनच गरज आहे ती आत्मपरीक्षणाची. स्वतःला विचारण्याची मी खरंच गावाच्या हितासाठी काम करतोय का? मी इतरांना त्रास न देता माझं आयुष्य जगतोय का? जर आपण स्वतः बदललो, तर आपल्या भोवतालचं जग आपोआप बदलून जाईल. गावाची शान ही त्याच्या रस्त्यांमध्ये नसते, ती त्याच्या नागरिकांच्या विचारांमध्ये असते.

शेवटी, बदलाची सुरुवात आरशात दिसणाऱ्या व्यक्तीकडूनच होते.
खुद्द बदलो ! दुनिया आपने आप बदल जायेगी!!

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !