"मित्र गोड शब्दांचा मुखवटा की कडू सत्याचा आरसा?"


"मित्र गोड शब्दांचा मुखवटा की कडू सत्याचा आरसा?"

मैत्री… ही फक्त दोन माणसांची ओळख नसते, ती दोन हृदयांची नाळ असते. ती नाळ रक्ताची नसते, पण न तुटणाऱ्या विश्वासाची असते. आपल्याला जीवनात अनेक लोक भेटतात काही हसवतात, काही रडवतात, काही विसरले जातात, आणि काही मनाच्या पायऱ्यांवर कायमचे कोरले जातात. पण या सगळ्यांमध्ये असा प्रश्न कायम राहतो.मित्र कसा हवा? गोड बोलून आपल्या भोवती गोडीचा जाळ विणणारा, की कडू बोलून आपले डोळे उघडणारा?

गोड बोलणारा मित्र… त्याची वाणी म्हणजे साखरेच्या पाकात बुडवलेलं पान. त्याचं बोलणं ऐकलं की मनाला हलकं वाटतं, चेहऱ्यावर हसू येतं. पण काही वेळा हीच गोडी मनाला फसवत असते. तो आपल्या मनात काही वेगळं ठेवून तोंडावर गोड बोलतो, आणि आपण त्या गोडीत हरवून जातो. नंतर लक्षात येतं आपली चूक त्याने कधी दाखवलीच नाही, आपलं नुकसान होत असतानाही तो शांत राहिला, कदाचित गुपचूप काड्या कोरत राहिला. अशा गोडव्याची चव पहिल्यांदा गोड लागते, पण शेवटी तोंडात कडूपणा उरवते.

आणि मग येतो कडू बोलणारा मित्र. त्याच्याकडे शब्द गोड नसतात, पण मनात खोटेपणा नसतो. तो आपल्या चुकांवर पांघरूण घालत नाही, तर डोळ्यात डोळे घालून “हे चुकीचं आहे” म्हणतो. त्याचे शब्द त्या क्षणी मनाला टोचतात, कधी कधी राग येतो, पण काळ सरल्यावर जाणवतं त्याच्या त्या कडवट बोलण्याने आपला जीव वाचला. तो आपल्याला दुखवतो, पण तो जखम प्रेमाच्या सुरीने करतो, जी आपल्याला सुधारणारी असते.

खरी मैत्री म्हणजे गोड आणि कडू यांचा एक सुंदर समतोल. प्रसंगी मिठासारखी विरघळणारी गोडी, आणि प्रसंगी औषधासारखं लागणारं कडूपणं दोन्ही आवश्यक असतं. गोडवा मनाला शांत करतो, पण कडूपणा आपल्याला मजबूत करतो. गोड बोलणारा मित्र तुम्हाला हसवेल, पण कडू बोलणारा मित्र तुम्हाला वाचवेल.

जीवनाच्या प्रवासात, अशा मित्राला ओळखा जो तुमच्याशी मनापासून प्रामाणिक असेल. जो तुमच्या यशाचं कौतुक करेल, पण तुमच्या चुकांवर निडरपणे बोट ठेवेल. कारण शेवटी, फसवे गोड शब्द नव्हे, तर प्रेमाने सांगितलेलं कडू सत्यच आपल्याला खऱ्या अर्थाने जगायला शिकवतं.

खरी मैत्री ही फक्त हसण्यात नसते, ती कधी डोळ्यात पाणी आणण्यातही असते… आणि तो अश्रू ज्या मित्रामुळे येतो, तोच मित्र आयुष्यभर सोबत राहतो.

© दीपक पवार(संपादक)खान्देश माझा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !