“तिरंग्यासाठी धावणारा – एका शेतकऱ्याच्या मुलाची जागतिक स्पर्धेपर्यंतची झुंज”
“तिरंग्यासाठी धावणारा – एका शेतकऱ्याच्या मुलाची जागतिक स्पर्धेपर्यंतची झुंज”
कधीकधी जीवन आपल्याला अशा वळणावर घेऊन येतं, जिथे संघर्ष आणि स्वप्नं एकाच वेळी चालत असतात. कुणी श्रीमंत घरात जन्म घेतो, तर कुणी गरिबीच्या छायेखाली वाढतो. पण काही व्यक्ती अशा असतात की, ज्या परिस्थिती समोर न झुकता तिला जिंकतात. अशाच धाडसी आणि प्रेरणादायी प्रवासाची ही कथा आहे. सीनियर ऑलिंपियन पराग पाटील यांची.
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक हे त्यांचं मूळ गाव. एका सामान्य शेतकऱ्याच्या पोटी जन्म. वडील पुण्यात वेल्डर म्हणून कामाला गेले आणि परागचं बालपण पुण्यातच घडलं. परिस्थिती बेताची होती, पण स्वप्नं मात्र आकाशाला भिडलेली होती.लहानपणापासूनच धावण्याची ओढ होती. धावणं हे त्याचं फक्त खेळ नव्हतं, ते त्याचं जीवन बनलं.
बसच्या मागे धावताना त्याच्या पायातील झपाट्याचा वेग शिक्षकांच्या नजरेत भरला. पांडुळे सर आणि महाजन सर यांनी त्याच्यातील प्रतिभा ओळखली आणि त्याला योग्य प्रशिक्षण दिलं. सहाव्या इयत्तेत मिळालेलं पहिलं सुवर्णपदक आणि एक छोटासा चषक त्यानेच परागच्या आयुष्याला कलाटणी दिली. शालेय, तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये तो सातत्याने चमकत राहिला.
परागच्या मनात सुरुवातीपासूनच देशसेवेचं स्वप्न होतं. त्यासाठी त्याला सैन्यात भरती व्हायचं होतं. पण ते शक्य झालं नाही. मात्र त्याच्या मनातील देशभक्तीची ज्वाला मावळली नाही. मग त्याने ठरवलं. खेळ हाच माझा देशसेवेचा मार्ग असेल.
बीएससी केमिस्ट्रीचं शिक्षण पुणे विद्यापीठातून प्रथम श्रेणीत पूर्ण केलं. घरची परिस्थिती पाहता नोकरी करावी लागली. एका कंपनीत हेल्पर म्हणून कामाची सुरुवात केली आणि पुढे परचेस मॅनेजरपर्यंतचा प्रवास केला. पण मन कुठेच स्थिरावत नव्हतं. ते खेळाच्या मैदानावर धावत होतं. शेवटी 2013 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला. कारण एकच देशासाठी पुन्हा मैदानावर उतरायचं होतं.
2010 साली बालेवाडीत झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करताना त्याला तीन सिल्व्हर मेडल्स मिळाली. तिथून त्याचा आंतरराष्ट्रीय प्रवास सुरू झाला. 2013 मध्ये इटली, 2015 आणि 2019 मध्ये ऑस्ट्रेलिया, 2017 मध्ये न्यूझीलंड, 2018 मध्ये मलेशिया या सर्व ठिकाणी भारतासाठी त्याने पदकं जिंकली. एकूण मिळवलेली पदकं 2 सुवर्ण, 15 रौप्य, आणि 3 कांस्य.
ही केवळ पदकं नाहीत, ती आहेत त्याच्या घामाची, मेहनतीची आणि देशप्रेमाच्या झळाळत्या निष्ठेची ओळख.
आजही पराग पाटील आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव उजळवत आहेत. ट्रिपल जंपमध्ये वर्ल्ड रँकिंग 26, लॉन्ग जंपमध्ये 32, 100 मीटरमध्ये वर्ल्ड रँकिंग 136 आणि आशियामध्ये 5वा क्रमांक. हे आकडे त्याच्या मेहनतीची आणि सातत्याची साक्ष आहेत.
पण आज ही तो मुंबईच्या रस्त्यांवर टॅक्सी चालवतो. कारण देशासाठी खेळणाऱ्या अनेक खेळाडूं प्रमाणेच त्याला ही आर्थिक आधार नाही.
आता येत्या 18 ते 25 ऑक्टोबर दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या मास्टर्स गेम्समध्ये सहभागी होण्यासाठी तो सज्ज आहे. त्याचं लक्ष्य स्पष्ट आहे. पुन्हा एकदा भारतासाठी चार पदकं जिंकायची. पण अडथळा आहे आर्थिक मदतीची.
या प्रवासासाठी लागणारा खर्च सुमारे 3.5 ते 4 लाख रुपये आहे. त्यात प्रवास, निवास, जेवण, रजिस्ट्रेशन, वीजा आणि इतर अनेक गरजा आहेत. टॅक्सी चालवून हा खर्च भागवणं अशक्यप्राय आहे.
पराग आज विनम्रपणे आपल्या सर्वांपुढे हात जोडून उभा आहे. तो म्हणतो.“एक रुपया का होईना, पण जर तुम्ही मनापासून मदत केलीत, तर ती मला तिरंग्याखाली उभं राहण्यासाठी बळ देईल.”
हा एक खेळाडू नाही.तो भारतासाठी धावणारा एक जीव आहे. आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या मातीचा, आपल्या संस्कृतीचा एक खरा प्रतिनिधी.
यंदाची दिवाळी आपण फटाक्यांच्या नव्हे, तर पदकांच्या झगमगाटात साजरी करूया. परागच्या पदकांमध्ये आपण ही आपला सहभाग नोंदवू या. त्याच्या धावण्यात, त्याच्या संघर्षात आणि त्याच्या प्रत्येक विजयात आपली सावली बनूया.
कारण हे स्वप्न केवळ परागचं नाही. हे आपल्या सगळ्यांचं आहे.त्याला मदत करण्यासाठी त्यांचा फोन नंबर आहे.. मो. 77984 44450
जय हिंद. जय महाराष्ट्र..
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा