मैत्रीचं मूर्तिमंत रूप सोनूभाऊ महाजन...!
मैत्रीचं मूर्तिमंत रूप सोनूभाऊ महाजन...!
धरणगावची माती ही केवळ सुपीक नसून ती माणुसकीच्या, नात्यांच्या आणि निष्ठेच्या बीजांनी समृद्ध झालेली आहे. याच मातीतून एक असे व्यक्तिमत्त्व उदयास आले आहे, ज्याचे वर्णन शब्दांत करता येणे कठीण आहे. ते म्हणजे सोनू राजेंद्र महाजन.
सोनूभाऊंचे नाव घेताच डोळ्यांसमोर एक प्रसन्न, सदा हसतमुख, निरपेक्ष वृत्तीचा आणि सतत इतरांसाठी धावपळ करणारा चेहरा उभा राहतो. प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी असा मित्र असतो, जो फार बोलत नाही, पण त्याच्या उपस्थितीमुळे आपल्याला सुरक्षिततेची, आधाराची जाणीव होते. “मी आहे तुमच्या सोबत” हे न सांगता ही जाणवणारा तो मित्र म्हणजे सोनूभाऊ.
त्यांच्या स्वभावातील सौम्यपणा त्यांच्या कृतीत ही स्पष्टपणे दिसून येतो. कोणाला अडचण आहे हे कळताच ते तत्काळ मदतीसाठी धाव घेतात. ‘काय हवे?’ असे विचारण्या ऐवजी, ‘मी आहे’ हे कृतीतून दाखवणं त्यांना अधिक सोयीचं वाटतं. म्हणूनच त्यांची मैत्री ही केवळ सोयीपुरती नसून, ती एक जीवनशैली आहे.
धरणगावच्या रस्त्यांवर त्यांना पाहताना जाणवतं की, माणूस पदावर मोठा होतो, पण खरा मोठेपणा हा मनात असावा लागतो. सोनूभाऊंचं मन खूप विशाल आहे. जिथे जात, धर्म, मतभेद किंवा सामाजिक भिंती नाहीत आहे फक्त आपुलकी, प्रेम, आणि निस्वार्थ आधार.
सोनूभाऊंच्या या दिलखुलास स्वभावामागे त्यांच्या घडवणाऱ्या संस्कारांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या वडिलांचे स्वर्गीय श्री.राजूभाऊ महाजन यांचे स्मरण यावेळी आवर्जून होते. शिवसेनेचे शहरप्रमुख म्हणून कार्य करताना त्यांनी दाखवलेली विचारांची खंबीरता आणि जनसेवेची निष्ठा, आज ही सोनूभाऊंच्या
वागण्या-बोलण्यातून प्रकट होते.
पण त्यांना खास ओळख मिळवून देणारी गोष्ट म्हणजे, माननीय नामदार श्री. गुलाबरावजी पाटील साहेबां प्रती असलेली त्यांची निष्ठा. गुलाबरावजी पाटील साहेबांचे विचार, त्यांच्या सेवेची दिशा, आणि जनतेशी असलेले आत्मीय नाते हे सर्व सोनूभाऊंच्या प्रत्येक कृतीत प्रतिबिंबित होते. ते फक्त अनुयायी नाहीत, तर त्या विचारांचे जिवंत उदाहरण आहेत.
धरणगावातील तरुण नेतृत्व म्हणून ओळख असली, तरी सोनूभाऊ ही केवळ एक ओळख नाही. ती एक भावना आहे. अशा भावना, ज्या काळाच्या ओघात ही हृदयात कायम राहतात.
आज अनेकजण मोठमोठ्या स्वप्नांची चर्चा करतात. काही त्यासाठी घोषणा करतात, तर काही प्रचारात रमतात. पण सोनूभाऊ त्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवतात आपल्या माणसांसाठी, आपल्या गावासाठी आणि आपल्या संस्कारांप्रती असलेल्या निष्ठेसाठी.
कधी एखाद्या वृद्ध आजीच्या औषधासाठी धावताना, कधी एखाद्या गरीब विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी शाळेच्या दारात उभे राहताना, तर कधी एखाद्या निराश तरुणाच्या खांद्यावर हात ठेवून त्याला जगण्याची प्रेरणा देताना. सोनूभाऊ नेहमी ‘नेता’ म्हणून नाही, तर ‘आपला माणूस’ म्हणूनच ओळखले जातात.
‘सोनू राजेंद्र महाजन’ हे केवळ एक नाव नाही, ती एक जिवंत जाणीव आहे. प्रेमळ मनाचा राजा आणि माणुसकीचा झरा, अशा स्वरूपात ते ओळखले जातात.
मैत्री म्हणजे काय, हे शब्दांनी नाही तर अनुभवांनी समजतं. आणि सोनूभाऊंसारखा मित्र आयुष्यात एकदाच भेटतो. पण तो भेटला, की मग जीवनात कधीही पोकळी वाटत नाही. एवढं मात्र खर....
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा