"सुरांच्या रिक्षातून स्वप्नांची वाट"

 "सुरांच्या रिक्षातून स्वप्नांची वाट"

धरणगाव या छोट्याशा गावात, एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले देविदास खंडू महाजन गावकरी ज्यांना प्रेमाने "देवा भाऊ" म्हणून ओळखतात हे नाव आज घराघरात ओळखलं जातं. पण ही ओळख त्यांना सहजासहजी मिळालेली नाही. ही आहे मेहनतीची, जिद्दीची आणि संगीतावर असलेल्या अपार प्रेमाची गोष्ट.

देवा भाऊंचं रोजचं जीवन एका साध्या रिक्षाचालकाचं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत रस्त्यांवरून प्रवाशांना त्यांच्या ठिकाणी पोहोचवायचं आणि मग दिवसभराचा थकवा घेऊन घरी परतायचं. पण या रोजच्या धकाधकीत ही त्यांच्या मनात एक वेगळीच लय वाजत असते. गाण्याची लय. त्यांच्या जीवनातली खरी उर्जा ही त्यांच्या सुरांत दडलेली आहे.

त्यांना गाण्याची लहानपणापासूनच आवड होती. पण परिस्थितीमुळे ते कधी कुठल्याही शाळेत किंवा प्रशिक्षणात जाऊ शकले नाहीत. तरी ही, त्यांनी हार मानली नाही. ते गात राहिले रिक्षा चालवता नाही, मोकळ्या वेळात ही, मनात आणि हृदयात ही.

आजच्या डिजिटल युगात, त्यांनी स्टार मेकर सारख्या मोबाइल ॲपच्या माध्यमातून स्वतःचा आवाज जगापर्यंत पोहोचवायला सुरुवात केली. कुठला ही दिखावा न करता, फक्त आपल्या आवाजाच्या जोरावर त्यांनी लोकांच्या मनात जागा मिळवली. त्यांच्या आवाजात जणू काही एक सच्चेपणा, एक हळुवार स्पर्श आहे. जो थेट अंतःकरणाला भिडतो.

केवळ स्टार मेकरपुरतेच ते थांबले नाहीत. स्थानिक आर्केस्ट्रांमध्ये त्यांनी आपल्या गायनकलेला सादर करण्याची संधी घेतली. गावोगावच्या कार्यक्रमांत, उत्सवांत त्यांचा आवाज गाजू लागला. त्यांचं गाणं म्हणजे केवळ संगीत नव्हे, तर अनुभवांची, भावना आणि आठवणींची एक सुरेल माळ असते.

आज देवा भाऊ अजून ही रिक्षा चालवतात. ते तितकेच साधे आहेत, तितकेच प्रेमळ आणि जमिनीवरचे. पण त्यांच्या आवाजाची उंची मात्र कितीतरी माणसांच्या हृदयाला गवसणी घालते. त्यांनी हे सिद्ध केलं की मोठं होण्यासाठी मोठ्या मंचाची गरज नसते, तर मोठ्या मनाची आणि न थकणाऱ्या जिद्दीची गरज असते.

देवा भाऊंची ही सुरेल वाटचाल अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्याला शिकवलं की, आपला छंद जर मनापासून जोपासला, तर कोणतंही स्वप्न दूर नाही.

त्यांचा आवाज आज घरा-घरात पोहोचला आहे, पण त्यांची गोष्ट मनामनात ठसली आहे. हृदयाला स्पर्श करणारी, खरं जीवन जगणारी आणि सुरांच्या रिक्षातून स्वप्नं उंच नेणारी.

© दीपक पवार (संपादक)खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !