पडद्याच्या जाळ्यात अडकलेलं निरागस बालपण...!
पडद्याच्या जाळ्यात अडकलेलं निरागस बालपण...!
बालपण… जिथं वेळ मोजला जायचा चेंडूच्या उड्यांमध्ये, काचांच्या गोळ्यांच्या खेळांमध्ये, झाडावरच्या पाखरांच्या किलबिलाटात, आणि मातीच्या गंधात. शाळा सुटली की गल्लीतल्या कोपऱ्यावर सगळ्यांचा थवा जमायचा, एकमेकांचे हसरे चेहरे आणि मोकळे आकाश एवढंच पुरेसं होतं आनंदासाठी.
पण आजचं बालपण… अंगणात पाळणा आहे, पण त्यावर मुलं झुलत नाहीत. गल्लीत क्रिकेटचा आवाज नाही, गोष्टी सांगणारे आजीआजोबा नाहीत, आणि झाडाच्या सावलीत उन्हाळा घालवणारी मुलंही नाहीत. त्यांच्या हातात आहे मोबाईल छोट्याशा पडद्यावरचं एक बनावट जग, जे हळूहळू त्यांचा खरा आनंद हिसकावून घेतंय.
कधीकाळी संध्याकाळी घराघरांतून “जेवायला या” अशा हाका यायच्या, आणि तरीही मुलं खेळात रंगून त्या हाका ऐकायच्या उशीराने. आज संध्याकाळी मात्र शांतता असते. प्रत्येक घरात, प्रत्येक खोलीत, एक चमकता पडदा आणि त्यावर एकाकी नजर.
मोबाईलच्या आभासी दुनियेनं मुलांना खेळातून, निसर्गातून, आणि नात्यांतून दूर केलंय. पावसाळ्यातल्या चिखलात भिजण्याचा आनंद, उन्हाळ्यातल्या आंब्याचा गोडवा, किंवा शाळेच्या पायऱ्यांवर झालेल्या
छोट्या-छोट्या गप्पा हे सगळं आता आठवणींच्या पेटीत बंद झालंय. मोबाईलच्या गेम्समध्ये जिंकणं सोपं आहे, पण आयुष्यात जिंकण्यासाठी लागणारी खरी मेहनत, सहकार्य, आणि सहानुभूती हे गुण शिकायला मुलं मागं पडतायत.
आईवडीलही कधीकधी या पडद्याच्या मोहात अडकून जातात. मुलांसोबत बसून गोष्ट सांगण्याऐवजी, शांत राहावं म्हणून त्यांच्याच हातात मोबाईल देतात. न बोलता, न विचारता, न हसता घरात एकाच छताखाली सगळे वेगळे होत चाललेत.
हरवतंय ते फक्त बालपण नाही, तर पुढच्या पिढीचं हसू, त्यांची कल्पनाशक्ती, त्यांचा आत्मविश्वास. मोबाईल वाईट नाही, पण त्याचं व्यसन म्हणजे जणू एका रंगीबेरंगी बागेच्या फुलांना हळूहळू वाळवणं.
बालपणाला पुन्हा हसवायचं असेल, तर मोबाईलचा पडदा थोडा बाजूला ठेवावा लागेल. मुलांच्या हातात पुन्हा चेंडू, काचांच्या गोळ्या, रंगीत पतंग यावेत. त्यांच्या डोळ्यांत पुन्हा आभाळभर स्वप्नं आणि चेहऱ्यावर खऱ्या खेळाचा थकवा दिसावा. कारण मोबाईलमध्ये हजारो व्हिडिओ असतील, पण आईच्या गोष्टींची ऊब आणि मित्रांच्या संगतीचं हसू ते फक्त खऱ्या आयुष्यातच मिळतं.
© दीपक पवार(संपादक)खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा