अडचणींच्या काळोखात तेजस्वी तारा वैष्णवी अजय भाटिया....!
अडचणींच्या काळोखात तेजस्वी तारा वैष्णवी अजय भाटिया....!
प्रत्येक यशाच्या मागे एक कथा असते. काही कथा सोप्या, काही संघर्षांनी भरलेल्या असतात, पण काही कथा अशा असतात की त्या मनाला खोलवर भिडतात. अशाच एका प्रेरणादायी कथेची नायिका आहे. वैष्णवी अजय भाटिया.
CBSE South Zone-2 शूटिंग स्पर्धा 2025 मध्ये, अंडर-14 मुलींच्या गटात ३९३/४०० असा अविश्वसनीय स्कोअर करून वैष्णवीने द्वितीय स्थान पटकावले.
या आकड्यांमागे केवळ तिचं अचूक लक्ष्यच नाही, तर संघर्षातून मिळवलेलं आत्मविश्वास, संकटांना तोंड देण्याची क्षमता आणि मनोबल दडलेला आहे.
९९, ९९, ९८ आणि ९७ हे गुण फक्त अंक नसून तिच्या संयमाचे, एकाग्रतेचे आणि कसोटीच्या क्षणीही न डगमगणाऱ्या मानसिक शक्तीचे प्रतीक आहेत. मात्र या अंकांच्या मागे एक अशी घटना दडलेली आहे, जी तिच्या यशाला अधिक उंचीवर नेते.
स्पर्धेच्या अगोदरच्या दिवशी तिची स्वतःची रायफल खराब झाली. जणू एखाद्या शिल्पकाराच्या हातून छिन्नी काढल्यासारखे झाले.त्या रायफलवर तिने कित्येक तास मेहनत घेतली, तिला हाताळायला शिकली, पण ती रायफल तिचा सोबती सोडून गेली.
अशा वेळी अनेक जण खचून जातात, गोंधळून जातात किंवा माघार घेतात. पण वैष्णवीने कधीच हार मानली नाही. तिने एका मैत्रिणीकडून रायफल उधार घेतली आणि त्या अनोळखी साधनाने स्पर्धा दिली.
त्या वेळी तिच्या हातात भले ही वेगळी रायफल होती, तरी मनात तोच आत्मविश्वास होता.आपलं ध्येय पूर्ण करायचं. अनोळखी रायफल, वेगळा अनुभव, पण तिच्या मनाचा ठाव मुळीही न डगमगणारा.
या अपूर्व कामगिरी मागे तिच्या अथक मेहनती शिवाय तिच्या कुटुंबाचा, विशेषतः तिच्या आईचा आधार मोठ्या प्रमाणावर होता. संकटाच्या वेळी आईने दिलेला धीर, तिच्या डोळ्यांतून उमटलेला आत्मविश्वास आणि मनापासून दिलेला विश्वास हे सर्व वैष्णवीसाठी आधारस्तंभ ठरले.
खऱ्या अर्थाने, वैष्णवीने सिद्ध केले की
"शस्त्र तुटले तरी चालते, पण मनोधैर्य तुटू नये. कारण यश साधनांवर नाही, तर वृत्तीवर अवलंबून असते."
ती खरी चॅम्पियन आहे. केवळ गुणपत्रकावर नव्हे, तर चारित्र्याच्या परीक्षेत ही. तिचं हे यश फक्त पदक किंवा क्रमांकात मोजण्यासारखं नाही, तर अनेक तरुणांमध्ये विशेषतः नवोदित खेळाडूंमध्ये प्रेरणा जागृत करणाऱ्या गोष्टींपैकी एक आहे, जी शिकवते की अडचणी आल्या तरी न झुकता ठामपणे लढा द्यायला हवा.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा