मित्र......!
मित्र......!
मित्र म्हणजे नुसता एक शब्द नाही… तो एक भाव आहे, एक नातं आहे, जे शब्दांपेक्षा गहिरं, आणि रक्ताच्या नात्यांपेक्षा खास असतं. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, जेव्हा वाट चुकते, धैर्य सुटतं, किंवा एकटेपणा गडद होतो तेव्हा हळूच कुठून तरी तो एक आवाज येतो, "अरे, मी आहे ना!" आणि सगळं काही पुन्हा सावरायला लागत.
मित्र हे असं नातं आहे जे मागून मिळत नाही, कुणाच्या सांगण्यावरून तयार होत नाही. ते हळूहळू, मनाच्या खोल कप्यात, एखाद्या नाजूक फुलासारखं उमलतं. कधी एका सहज हास्यातून, कधी एका गुपिताच्या वाटणीने, कधी एकमेकांच्या सोबतीने अनुभवलेल्या दुःखांतून. हसत-खेळत निर्माण झालेली ही नाती इतकी अनमोल असतात की ती वेळेच्या कसोटीत ही अबाधित राहतात.
मित्र म्हणजे तो, जो तुझं बोलणं न ऐकता तुझ्या मनातलं समजतो. जो तू काहीही गोंधळ केला असलास, तरी तुझ्या पाठीशी उभा राहतो. कधी हसवतो, कधी चिडवतो, पण कधीच एकटं वाटू देत नाही. आयुष्यात हजारो चेहरे भेटतात, पण मनात घर करणारे अगदी थोडेच असतात. आणि हेच असते खरं भाग्य असा एक तरी जीव असावा, जो नात्याला नाव न देता आयुष्यभर साथ देईल.
कधी एखाद्या कोपऱ्यात बसून झालेला तासभराचा संवाद, तर कधी रात्री उशिरा आलेला “भारी आहेस रे” असा एक साधा मेसेज हेच ते क्षण असतात जे मैत्रीच्या नात्याला घट्ट करतात. आयुष्यभरासाठी. कारण मैत्री ही मोठमोठ्या गिफ्ट्समध्ये नाही, ती लपलेली असते अशा छोट्या छोट्या ओलाव्यात, जिथं अपेक्षा नसतात, पण आपुलकी असते.
काही मित्र आयुष्यात क्षणभर येतात आणि आयुष्यभर रेंगाळतात. त्यांच्या आठवणी, त्यांची शब्दं, त्यांचं असणं हे सगळं मनाच्या एका खास कोपऱ्यात जपून ठेवलं जातं. त्या कोपऱ्याला काळही गाठू शकत नाही. आणि जिथं काळ हरतो, तिथंच खरं नातं जिंकतं.
मित्र हा आपल्या जीवनातील तो भाग असतो, जो आपण निवडतो.काळजीपूर्वक, प्रेमाने, आणि पूर्ण विश्वासाने. त्यामुळेच कधीकधी आई-वडिलांनी न समजलेलं, भावंडांनी न जाणलेलं काही, एखादा मित्र नकळत ओळखतो. आणि कधी आरशात स्वतःलाही न दिसलेला चेहरा, तो सहज आपल्या बोलण्यात दाखवतो.
असे मित्र फार भाग्याने मिळतात. आणि जर मिळाले, तर आयुष्य कितीही कठीण असलं, तरी चालून जातं. कारण खऱ्या मित्रासोबत चाललेली वाट, ही कधीच एकट्याची वाट नसते.ती असते दोन मनांची, दोन आत्म्यांची जी एकमेकांना सांभाळत, समजावत, आणि जपताना आयुष्याला खराखुरा अर्थ देतात.
मित्र म्हणजे शेवटी काय?
तो एक भावना आहे, जो हृदयाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात कायमचा थांबलेला असतो.आपुलकीने, प्रेमाने… आणि खूप शांतपणे.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा