गावात 'तंटामुक्ती' की 'तंटावाढ' ?
गावात 'तंटामुक्ती' की 'तंटावाढ' ?
गाव म्हणजे माणसांचा जीव असतो. कुणाच्या घरात सण असो की दुःख, शेजाऱ्याच्या ओसरीवर हाक मारली की मदतीचा हात पुढं येत असे. गाव म्हणजे नात्यांचं झाड. कोणी कुणाचं नसलं तरी सगळे एकमेकांचे असायचे. पण हल्ली गाव बदललंय… माती तीच आहे, रस्ते ही काहीसे पक्के झालेत, पण माणसांचं मन मात्र फुटकं झालंय.
एकेकाळी गावात कुठे ही वाद झाला, तर वडीलधारी लोक चावडीवर बोलावायचे, एकत्र बसायचे, चहा-साखरेच्या घोटांतून समजुतीचा सूर उमटायचा. कुणी झुकायचं, कुणी समजून घ्यायचं, आणि भांडण मिटायचं. तंटामुक्त गाव म्हणजे त्यावेळी फक्त संकल्पना नव्हती, तर जिवंत आचारधर्म होता.
पण आज… गावातल्या शाळेच्या भिंतीवर 'तंटामुक्ती समिती' असते, आणि गावाच्या गल्ल्यांमध्ये वाढती तंटावाढ दिसते. वाद हे आता नुसते व्यक्तिगत नसतात. त्यात पक्ष, जाती, भावकी, आणि राजकारण यांचा कडवट मिसळ झालेला असतो. वाद मिटवणाऱ्यांच्या मागे झेंडे असतात, आणि वाद लावणाऱ्यांच्या मागे टोळ्या असतात.
एकाच बोअरिंग वरून दोन शेजाऱ्यांत तणाव निर्माण होतो, पाणी नकोसं होतं पण भांडण ओसंडून वाहतं. एकाच शाळेत शिकलेली मुलं आज एकमेकांकडे संशयाने पाहतात, कारण त्यांचे पालक दोन वेगळ्या राजकीय गटांमध्ये विभागले गेलेले असतात.
तंटामुक्तीचं खोटं मुखवटा लावून, खऱ्या माणुसकीची हत्या होत चालली आहे. आज तंटा मिटवायला पंच लागतो, आणि पंच ठरवायला राजकीय आदेश. तंटा मिटत नाही, तो सरकतो पुढच्या निवडणुकीच्या प्रचारात पुन्हा उभा राहायला.
या सगळ्यांत हरवली आहे ती गावाची खरी ओळख जिथं भांडणं मिटवण्यासाठी हाक मारली की चावडीवर सगळे आपलेपणाने गोळा व्हायचे. आज हाक मारली की लोक मोबाईलवर रेकॉर्डिंग सुरु करतात. समजुतीची जागा 'पुरावे गोळा करण्याच्या' स्पर्धेने घेतली आहे.
गावाला खरंच तंटामुक्त व्हायचं असेल, तर फक्त समिती नव्हे मनं, विचार, आणि दृष्टिकोन बदलायला हवेत. जुन्या लोकांकडून शिकलेली ती समजूत, ती विनम्रता, तो संयम पुन्हा गावात रुजवावा लागेल.
कारण शेवटी गाव म्हणजे फक्त घरांची रचना नव्हे, ती माणसांची भावनिक रचना असते. जिथं 'आपण' हा शब्द 'मी' पेक्षा मोठा असतो. आणि त्या 'आपण'च्या भावनेनं गाव खरंच तंटामुक्त होऊ शकते.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा