थांबा… बघा… समजा… आणि मग पुढे चला....!
थांबा… बघा… समजा… आणि मग पुढे चला....!
माणूस… एक सुंदर, पण गुंतागुंतीचा प्रवास. प्रत्येकाचं जीवन वेगळं असतं, तरी त्यात एक साम्य असतं सगळ्यांनाच सुख हवं असतं, समाधान हवं असतं, आणि आपली स्वप्नं पूर्ण व्हावीत, अशी तीव्र आकांक्षा असते. परंतु हे सर्व मिळवण्याच्या धावपळीत आपण एक महत्त्वाची गोष्ट विसरतो.प्रत्येक गोष्टीची एक ठरावीक वेळ असते, आणि नशिबाने दिलेल्या गोष्टींना ही एक मर्यादा असते.
माणसाच्या जीवनात निर्माण होणाऱ्या अनेक अडचणी, वेदना आणि अपेक्षाभंग यामागे मुख्यतः दोन गोष्टी कारणीभूत असतात.एक म्हणजे, माणसाला नशिबापेक्षा अधिक काही तरी हवं असतं.दुसरं म्हणजे, त्याला ते सर्व वेळेच्या आधीच मिळावं असं वाटतं.
आपल्याला जे मिळालं आहे, त्यात समाधान मानायला आपण शिकलेलो नसतो. एखादी गोष्ट मिळाली, की लगेच त्यापेक्षा मोठ्या गोष्टीची अपेक्षा मनात डोकावते. माणूस जेव्हा एखाद्या टेकडीवर पोहोचतो, तेव्हा तिथून त्याला आणखी उंच शिखरं दिसू लागतात आणि त्या चमकदार शिखरांकडे पाहताना तो पायाखालची जमीन विसरतो.
हीच अतृप्त इच्छा आणि हव्यास अनेकदा मनात अस्थिरता निर्माण करतो. मग ते नातं असो, संपत्ती असो, यश असो किंवा स्वप्नं "थोडं अधिक, थोडं पुढचं…" या विचारात आपण आयुष्याचा वर्तमानच गमावून बसतो. ज्याला आभाळच हवं असतं, त्याला क्षितिज मिळालं तरी समाधान लाभत नाही.
दुसरं कारण, म्हणजे वेळेपूर्वी सगळं मिळावं, ही अधीर अपेक्षा.जगण्याला ही एक नैसर्गिक गती असते. प्रत्येक फळाला पिकण्यासाठी एक योग्य काळ लागतो. पण माणसाला मात्र सर्व काही तात्काळ हवं असतं.प्रेम, यश, पैसा, स्थैर्य… सगळं काही लगेच मिळावं, असं वाटतं.
पण नियतीचं गणित थोडं वेगळं असतं. काही गोष्टी उशिरा मिळतात कारण त्या मिळवण्यासाठी आपलं मन, आपला अनुभव आणि आपली समजूत तयार होणं गरजेचं असतं. वेळेपूर्वी मिळालेली गोष्ट अनेकदा स्थिर राहत नाही, टिकत नाही.
एखाद्या नात्यात आपण इतकं लवकर गुंततो की त्याला फुलायला आवश्यक असलेली जागा आणि वेळ आपण देतच नाही. आणि मग नातं तुटतं.एखादं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून आपण लवकर यशाच्या शॉर्टकटचा शोध घेतो, पण त्यातून मिळालेल्या यशात नंतर समाधान नसतं फक्त थकवा आणि रिकामपणा.
हेच जीवनाचं सत्य आहे काही गोष्टी मिळतात, काही नाहीत. काही वेळेवर मिळतात, काही उशिरा.
पण या साऱ्या प्रवासात जर आपल्याकडे थोडा संयम असेल, थोडं स्वीकृतीचं भान असेल, तर प्रत्येक अनुभव आपल्याला अधिक समृद्ध करतो.
म्हणूनच,नशिबापेक्षा अधिक नको, पण जे मिळालं आहे त्यातलं सौंदर्य पाहायला शिका.वेळेपूर्वी काहीच नको, पण जेव्हा वेळ येईल तेव्हा त्याची किंमत ओळखा.
कारण समस्या नेहमी परिस्थितीमुळेच उद्भवत नाहीत; त्या आपल्या अतिआकांक्षांमध्ये, अतिआशेपासून निर्माण होतात.आणि ज्या दिवशी माणूस हे जाणतो, त्या दिवसापासून त्याचं जीवन अधिक समंजस, अधिक शहाणं, आणि खरंखुरं सुखकारक होऊ लागतं.
"मनाला समजावणं शिका…कारण आयुष्य समजून घेतल्यावरच खरं अर्थपूर्ण वाटू लागतं."
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा