शब्दांपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे विश्वास....!


शब्दांपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे विश्वास....!

मानवी नातेसंबंध हे विश्वासाच्या नाजूक धाग्यांनी विणलेले असतात. त्या धाग्याला जर एखाद्याने सहज हात लावला तर तो तुटायला वेळ लागत नाही. आजच्या काळात आपण अनेकदा पाहतो. कोणी काही सांगितले, अफवा कानावर येताच लगेच शंका घ्यावीशी वाटते. पण खरंच, हे कितपत योग्य आहे?

आपण एखाद्या व्यक्तीला वर्षानुवर्षे ओळखत असतो. त्या व्यक्तीचे स्वभाव, त्याची छोटी मोठी सवय, आनंद दुःखातील त्याची साथ हे सगळं आपल्याला माहित असतं. पण तरी सुद्धा जेव्हा एखाद्या बद्दल दुसऱ्याकडून एखादी नकारात्मक गोष्ट ऐकू येते, तेव्हा आपण का डळमळतो? आपण का त्या आपल्या अनुभवां पेक्षा परक्या शब्दांना जास्त वजन देतो?

शंका ही नात्याची शत्रू आहे. ज्यावेळी आपण शंका घेतो, त्या क्षणी विश्वास तुटायला सुरुवात होते. आणि विश्वास जपण्यासाठी जी वर्षे लागतात, तो तुटण्यासाठी मात्र क्षणभर पुरेसा असतो. म्हणूनच “कोणी सांगितले म्हणून” आपण आपल्या माणसांवर संशय घेणे म्हणजे स्वतःच्या हृदयाचेच नुकसान करणे होय.

आपण विसरतो की प्रत्येकजण आपआपल्या नजरेतून, स्वार्थातून, रागातून किंवा कधीकधी फक्त गैरसमजातून बोलत असतो. एखाद्या व्यक्तीच्या मनाची पूर्ण खोली दुसऱ्या कुणालाच कधीही उमजलेली नसते. खरे तर, ज्याला आपण जवळून ओळखतो, त्याच्या बद्दल दुसऱ्याची केलेली टिप्पणी सहज का मान्य करावी?

नात्यांचा गाभा विश्वासामध्येच आहे. जर कोणी काही बोलले तर ते ऐकावे, पण त्या ऐकलेल्या गोष्टीला अंतिम सत्य मानून माणसाला दोष देणे टाळावे. त्या ऐवजी संवाद साधावा, त्या व्यक्तीशी स्पष्ट बोलावे, त्याचे म्हणणे ही ऐकावे. खरी ताकद म्हणजे दुसऱ्याच्या बाजूने उभे राहण्याची क्षमता.

आठवा ज्या वेळी सर्वजण संशय घेतात, तेव्हा एकाने जरी विश्वास दाखवला तरी ते मनाला आधार देतं, जिव्हाळ्याला बळ देतं.

म्हणूनच, “कोणी म्हणाले म्हणून” संशय करणे चूक आणि “स्वतःच्या अनुभवावर” नाते टिकविणे योग्य.
कारण माणूस शब्दांवर नाही, तर विश्वासावर जगतो.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !