अंजनी प्रकल्पाच्या पूर्णतेत गावकऱ्यांच्या स्वप्नांना मिळाली नवी उधाण..!


अंजनी प्रकल्पाच्या पूर्णतेत गावकऱ्यांच्या स्वप्नांना मिळाली नवी उधाण..!



अंजनी प्रकल्प… पंचवीस वर्षांपासून अर्धवट अवस्थेत उभा असलेला हा प्रकल्प जणू एरंडोल आणि धरणगाव तालुक्याच्या जनतेच्या मनातील एक अपूर्ण स्वप्नच होता. शेतकऱ्यांच्या डोळ्यांत हिरव्या शिवाराची आस होती, गावोगावी उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासत होती, आणि पिण्याच्या पाण्यासाठी लांबवर जावे लागत होते. पण आता, या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आशेचा किरण पुन्हा दिसू लागला आहे.

दिनांक ५ ऑगस्ट रोजी मंत्रालयात जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली तापी खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची बैठक संपन्न झाली. या महत्त्वपूर्ण बैठकीत जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव माननीय श्री. डी.एल. कपूर, सचिव श्री. बेलसरे, तापी महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. बोरकर, अधीक्षक अभियंता श्री. गोकुळ महाजन, तसेच जळगाव व एरंडोलचे मा. आ. महेंद्रसिंह बापू पाटील उपस्थित होते.

या बैठकीत माजी आमदार महेंद्रसिंग पाटील यांनी अंजनी धरणाच्या पाण्याच्या उपलब्धतेअभावी रद्द झालेल्या वाढीव (दुसरा टप्पा) प्रकल्पाचा मुद्दा ठामपणे मांडला. नार–पार तापी प्रकल्पात आता गिरणा धरणासाठी १०.६ टीएमसी पाणी मंजूर झाले असून, त्यापैकी १ टीएमसी पाणी अंजनीच्या वाढीव दुसऱ्या टप्प्यास उपलब्ध करून द्यावे, अशी त्यांची आग्रही मागणी होती. या मागणीवर साधक–बाधक चर्चा झाली आणि शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत पाटबंधारे मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी महेंद्रबापूंचा मुद्दा मान्य केला. त्यांनी प्रकल्पाचा नवीन सविस्तर प्रकल्प अहवाल त्वरित सादर करण्याचे आदेश महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना दिले.

महेंद्रसिंह बापू हे या प्रकल्पासाठी सतत वेगवेगळ्या पातळ्यांवर पाठपुरावा करीत आले आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आता पंचवीस वर्षांपासून अर्धवट अवस्थेत असलेला हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच ३२ कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पावर झाला असून वाढीव क्षमतेची भिंतही पूर्ण झाली आहे.

युती सरकारच्या काळात अत्यंत कमी कालावधीत हा प्रकल्प महेंद्रबापूंच्या कठोर परिश्रमातून साकारला गेला होता. मात्र त्यांच्या नंतर या प्रकल्पाकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले. आता त्यांच्या भाजपा प्रवेशानंतर आणि सततच्या पाठपुराव्यामुळे अंजनी प्रकल्प पूर्णत्वास येण्याच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यास एरंडोल व धरणगाव तालुक्यातील शेकडो एकर शेतीला पाणी मिळेल, अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात हिरवाईचा नवा अध्याय सुरू होईल. अंजनीच्या पाण्यात आता केवळ जल नाही, तर ती आहे शेतकऱ्यांच्या संघर्षाची, संयमाची आणि स्वप्नपूर्तीची कहाणी.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !