दिलदार मनाचा दिलदार माणूस दादासाहेब चंद्रशेखर अत्तरदे...!


दिलदार मनाचा दिलदार माणूस दादासाहेब चंद्रशेखर अत्तरदे...!

काही व्यक्ती आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या तेजाने लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करतात. त्यांचं बोलणं, त्यांची वागणूक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं माणुसकीनं ओथंबलेलं हृदय... यामुळेच त्या समाजात एक वेगळी, उठावदार ओळख निर्माण करतात. अशीच एक मनाला भिडणारी, हृदयात स्थान घेणारी, आणि सदैव प्रेरणा देणारी व्यक्ती म्हणजे दादासाहेब चंद्रशेखर अत्तरदे.

आज त्यांचा वाढदिवस एक विशेष दिवस. हा दिवस केवळ त्यांच्या जन्माचा आनंद साजरा करण्यापुरता मर्यादित नाही, तर तो त्यांच्या आयुष्याच्या संघर्षमय, समर्पणशील प्रवासाची आठवण करून देणारा आहे. साध्या घरात जन्मलेला हा मुलगा, पुढे भुसावळ नगरीत आपल्या कार्यकर्तृत्वाने, सेवाभावाने आणि
मनमिळावूपणाने जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवतो, ही बाब स्वतःतच खूप काही सांगून जाते.

त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते म्हणून झाली. मात्र, राजकारण हे त्यांचं केवळ एक माध्यम होतं. लोकांच्या सेवा करण्याचं. भुसावळ नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून कार्य करताना त्यांनी नेहमी जनतेच्या अडचणी स्वतःच्या अडचणी मानल्या. मग ते रस्त्यांचे प्रश्न असोत, गटारांची कामं, शिक्षणातील अडथळे, की आरोग्यविषयक समस्या  दादासाहेब नेहमीच अग्रस्थानी दिसले.

त्यांच्या कामगिरीत कधीच गाजावाजा नव्हता, पण त्यांच्या कृतींतून लोकांच्या मनात खोलवर विश्वास आणि आदर निर्माण झाला. त्यांचा स्वभाव त्यांच्या पदापेक्षा ही मोठा होता. हसतमुख चेहरा, आपुलकीने केलेलं बोलणं, आणि कोणत्या ही अडचणीत माणसाच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याची वृत्ती  यामुळेच लोक त्यांना "नगरसेवक" म्हणून नव्हे, तर "आपला माणूस" म्हणून ओळखू लागले.

त्यांच्या मदतीला कुठला ही काळ, वेळ वा अडथळा कधीच आड आला नाही. रात्रीची वेळ असो वा एखादं दुर्गम गाव  कुणीही हाक मारली, की दादासाहेब तत्काळ हजर!

आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मागे वळून पाहिलं, तर दिसतं की त्यांनी आपल्या माणुसकीच्या बळावर असंख्य लोक जोडले आहेत. त्यांचं आयुष्य म्हणजे प्रेरणेचा अखंड झरा आहे. जिथून समाजासाठी काहीतरी करण्याची उमेद, नवा उत्साह, आणि नवी दिशा मिळते. त्यांचं दिलदार मन कोणावरही आकस धरत नाही हीच त्यांची खासियत.

कधी आपल्या शब्दातून, तर कधी आपल्या कृतीतून  त्यांनी आपलं मोठं मन जनतेसमोर सदैव उघडं ठेवलं.

दादासाहेब त्या व्यक्तींपैकी एक आहेत ज्यांचं अस्तित्व केवळ एखाद्या पदापुरतं मर्यादित राहत नाही. ते जिथे असतात तिथे विश्वास असतो, आधार असतो आणि माणुसकीचा उबदार स्पर्श असतो. त्यांच्या एका हाकीत आश्वासकता असते, त्यांच्या स्मितामध्ये समाधान असतं, आणि त्यांच्या उपस्थितीत आपुलकीचा आधार असतो.

आज त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देताना मनापासून एकच गोष्ट वाटते. तुमच्यासारख्या माणसांमुळेच समाज आजही जिवंत आहे. तुमचं कार्य, तुमचा विचार आणि तुमचं माणूसपण याला साश्रू नतमस्तक प्रणाम.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !