शांततेतून उगम होतो नवजीवनाचा....!


शांततेतून उगम होतो नवजीवनाचा....!

प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं, पण एक गोष्ट मात्र सारखीच असते. सगळ्यांच्या वाट्याला येणारी वादळं. कधी ती दिसतात, कधी शांतपणे मनात घोंगावतात… पण त्या क्षणांना कोणीही चुकवू शकत नाही. काही वेळा आयुष्य इतकं कोसळतं, की आपल्याला वाटतं सगळं संपलं… पण अशा काळातच माणसाच्या खऱ्या ताकदीची ओळख होते.

वादळं येणं हे चुकत नाही, पण त्यांना सामोरं जाण्याची पद्धत मात्र आपल्या हातात असते. काही क्षण असतात जेव्हा आपणही कोसळतो.मनाने, भावनांनी, विचारांनी… पण त्या कोसळण्याला थांबवायचं असेल, तर डोकं शांत ठेवणं, मन स्थिर करणं आणि परिस्थितीकडे एक पाऊल मागे घेऊन बघणं आवश्यक असतं.

कारण कोणत्या ही संकटावर मात करणं म्हणजे मोठमोठ्या गोष्टी करणं नाही, तर छोट्या छोट्या प्रसंगात स्वतःचं संयम टिकवणं असतं.

जीवनात वाद असतील, मतभेद असतील, दुःख असतील. पण त्याच वेळी त्यांच्यातून समजून घेण्याची कला शिकली, तर प्रत्येक वाद एक संवाद बनतो. मतभेद माणसांमध्ये अंतर निर्माण करतात, पण जर त्या मतभेदांमध्ये समजूत आणि शहाणपणा असेल, तर तेच संबंध अधिक मजबूत करतात.

खूप वेळा एखादं नातं क्षणात तुटतं.एक कटू शब्द, एक चुकीची कृती, किंवा न सांगता आलेलं दुःख. तोडणं सोपं असतं, कारण त्याला वेळ लागत नाही. पण जोडण्यासाठी लागतो संयम, माया, समजूत आणि सर्वात महत्त्वाचं आपलं मन मोकळं ठेवणं.

जीवन हे अशा जोडण्याच्या क्षणांनीच सुंदर होतं.

पण आपण फार वेळा जुन्या गोष्टी मनात ठेवतो. काही न सावरणारे प्रसंग, काही जखमा, काही अपुरे संवाद. आणि मग त्या जुन्या आठवणींच्या साखळीत गुंतून पडतो. पुढचं काही दिसेनासं होतं. आपण जगतच नाही, फक्त श्वास घेत राहतो.

अहंकार, अपमान, आणि उद्याची अनिश्चितता हे सगळं जर मनात घर करून राहिलं, तर मनातला प्रकाश मावळतो. आणि एकदा का मन अंधारात गेलं, की कोणतीही दिशा दिसेनाशी होते.

म्हणूनच, आजचा क्षण तो सर्वात मौल्यवान आहे. तो आपल्या हातात आहे. मागच्या चुकांचं ओझं न करता, उद्याच्या भीतीने ग्रासून न जाता, आजच्या क्षणात देवाचे आभार मानणं म्हणजेच खऱ्या अर्थाने जीवन जगणं.

हीच वेळ आहे. जुनं सगळं बाजूला ठेवून, स्वतःला माफ करून, दुसऱ्यांना समजून घेऊन, नव्याने सुरुवात करण्याची.

मनात शांती असली, की कोणतंही वादळ मोठं वाटत नाही. आणि जेव्हा आपण नव्याने वाटचाल करतो, तेव्हा आयुष्यही आपल्याला नव्या शक्यतांनी भरलेलं एक सुंदर दार उघडून दाखवतं.

तर मग, आज… आत्ता… या क्षणी… एक खोल श्वास घेऊन मनाशी असं ठरवूया !

"जुने जाऊ द्या विसरून, नवे सूर आळवू या... जीवन पुन्हा एकदा खुलवू या."

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !