आरोग्याची ज्योत… माणुसकीच्या स्पर्शाने प्रज्वलित !
आरोग्याची ज्योत… माणुसकीच्या स्पर्शाने प्रज्वलित
कधीकधी जीवनात दु:ख इतकं गडद होतं, की एखादी आशेची किरकोळ झुळूकही एखाद्याचं संपूर्ण आकाश उजळवून टाकते. गरिबी, आजारपण, असहायता आणि एकटेपणाच्या झळा सोसणाऱ्या अनेक चेहऱ्यांना अशीच एक झुळूक लाभली. प्रकाश शंकर घुले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत शस्त्रक्रिया व महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून.
आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन या नावामध्येच समाजभान दडलेलं आहे.“आरोग्य म्हणजेच खरे धन” ही भावना फाउंडेशनने केवळ शब्दांत नाही, तर कृतीतून जगासमोर ठेवली.
समाजातील जे दुर्बल, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. जे आजारपणाशी संघर्ष करत होते पण उपचारांची दारे त्यांच्यासाठी बंद होती. अशा लोकांसाठी या शिबिराने जीवनाची नवी दारं खुली केली.
या आरोग्य शिबिरात उपचार हे उद्दिष्ट होतंच, पण त्याहूनही मोठं होतं एक माणूस म्हणून दुसऱ्याच्या दुःखाशी जोडून घेणं. रुग्णांच्या डोळ्यांतली असहायता समजून घेत, त्यांच्या वेदनांना फक्त औषध नव्हे तर आपुलकीचा स्पर्श देण्याचा हा प्रयत्न होता.
शस्त्रक्रिया मोफत होत्या, पण त्या फक्त शरीराच्या जखमा भरून काढणाऱ्या नव्हत्या त्या मनाच्या खोल जखमा भरून टाकणाऱ्या होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेत हातभार लावणारी माणसं म्हणजेच खऱ्या अर्थाने समाजासाठी झिजणारी दीपस्तंभ होती.टायगर ग्रुपचे अध्यक्ष श्री तानाजीभाऊ जाधव, त्यांच्या उपस्थितीने शिबिराला बळकटी दिली. आत्मविश्वासाने भरलेला त्यांचा चेहरा, समाजासाठी असलेली त्यांची बांधिलकी, उपस्थित प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरली.
शिवभक्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री अनिकेत घुले यांची साधी पण प्रभावी उपस्थिती ही या शिबिरातील संवेदनशीलतेची दुसरी बाजू होती. समाजातल्या गरिबांबद्दलची त्यांची आपुलकी कृतीतून स्पष्ट जाणवत होती.
पण या सर्व योजनेच्या केंद्रस्थानी होते, आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील.
त्यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे समर्पण, सेवा आणि श्रद्धेचा संगम. त्यांच्या संकल्पामुळे हे शिवधनुष्य उचललं गेलं, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो गरजू रुग्णांना नवसंजीवनी मिळाली. त्यांचं एक वाक्य मनात कोरलं जातं.“आपल्या कार्यातून जर एखाद्या रुग्णाला पुन्हा हसण्याचं कारण मिळालं, तर त्यापेक्षा मोठं यश काहीच नाही.”
या शिबिरात अशा हसण्याची कित्येक कारणं निर्माण झाली.एका वृद्ध आजीने डोळ्यात पाणी आणून म्हटलं “आता आयुष्य थोडं हसू लागलंय.”एका तरुणाला पुन्हा नोकरीवर जाण्याची आशा निर्माण झाली.एका लहान मुलीच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून तिच्या आईच्या डोळ्यांतून कृतज्ञतेचे अश्रू ओघळले.हे होते केवळ उपचार नव्हते, हे होते माणुसकीच्या स्पर्शाने दिलेले नवजीवन.
समाजात अशी कार्ये आठवण करून देतात की,
माणूस माणसासाठीच जगतो,आणि जेव्हा कोणीतरी दुःखात असलेल्या हातात आपला हात देतो, तेव्हा फक्त शरीर नाही, तर हृदय ही बरे होतं.
आज एक शिबिर संपलं, पण अनेक आयुष्यांमध्ये आशेचा नवा अंकुर फुटला.जिथं आजार आणि गरिबीचा अंधार होता, तिथं आता आरोग्याची आणि माणुसकीची नवी ज्योत प्रज्वलित झाली आहे.
आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनच्या या उपक्रमाला अंतःकरणापासून सलाम.त्यांच्या कार्यामुळे समाजात एक नवचैतन्य जागवले गेले आहे.जे फक्त उपचार देत नाही, तर जगण्याला अर्थ देतं.
ही ज्योत अशीच तेवत राहो, अंधारात आशेचं प्रकाशपथ बनून…!
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा