माणुसकीच्या भावनेतून साकारलेली श्वान लसीकरण मोहीम....!
माणुसकीच्या भावनेतून साकारलेली श्वान लसीकरण मोहीम....!
२७ सप्टेंबर २०२५ ही केवळ एक तारीख नव्हे, तर माणुसकीच्या प्रेमाची आणि समाजाच्या सुरक्षित आरोग्यदृष्टीची साक्ष देणारा दिवस ठरला. सेवा पंधरवाडा आणि जागतिक रेबीज दिनाच्या औचित्याने तालुका पंचायत समिती, पशुसंवर्धन विभाग, धरणगाव येथे एक अत्यंत महत्त्वाची आणि हृदयाला भिडणारी श्वान दंश प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवण्यात आली.
ही मोहीम केवळ सरकारी योजना नव्हती. ही होती प्रेम, दया आणि जबाबदारीची मूर्त प्रतिमा.
लसीकरण मोहिमेद्वारे अनेक पाळीव तसेच भटक्या (stray) श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली. ही एक अशी कृती होती जिच्यामध्ये केवळ माणसांच्या आरोग्याचेच संरक्षण नव्हते, तर त्या मूक प्राण्यांच्या आयुष्याला दिलेली एक आश्वासक दिशा होती. या अभियानात शहरातील स्वयंसेवक श्वानप्रेमींनी आपले योगदान देऊन मोहिमेला खऱ्या अर्थाने सामाजिक आधार दिला.
श्वानप्रेमी श्रीमती अश्विनी पाटील मॅडम यांचे या मोहिमेसाठी योगदान अतुलनीय होते. त्यांच्या सहृदयतेमुळे आणि मनापासून केलेल्या सेवेमुळे भटक्या श्वानांचाही लसीकरणात समावेश होऊ शकला. यावेळी श्री. भगीरथ माळी सर आणि अन्य श्वानप्रेमी नागरिक ही उपस्थित राहून मोहिमेचे महत्त्व अधोरेखित करत होते.
या मोहिमेची शास्त्रीय व वैद्यकीय बाजू समर्थपणे सांभाळली ती डॉ. अशोक महाजन, सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन यांनी. त्यांनी रेबीज या गंभीर आजारा विषयी सविस्तर माहिती देत, माणसांचे जीवन वाचवण्यासाठी लसीकरणाचे अनन्यसाधारण महत्त्व विशद केले. "प्रत्येक लस दिलेला श्वान म्हणजे एका संभाव्य धोका टळलेले मानवी जीवन" ही त्यांची भावना होती. जी खऱ्या अर्थाने समाजाला जागवणारी होती.
या मोहिमेच्या यशस्वीतेमागे असंख्य अनामिक हात होते, पण त्यात काही हात खास उल्लेखनीय आहेत.
डॉ. डी.पी. गुंजरगे, श्री. नंदू गोतरणे, श्री. भूषण पाटील, श्री. सनी पाटील, श्री. समाधान पाटील आणि श्री. प्रेम पवार यांनी मनापासून परिश्रम घेतले. शहरातील गल्ल्यांपासून ते संकुचित भागांपर्यंत त्यांनी श्वानांपर्यंत पोहोचून लसीकरण केले. कोणतीही भीती, कोणताही संकोच न ठेवता त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि प्रामाणिकपणे निभावली.
आज आपण जेव्हा 'भटक्या श्वानां'बद्दल बोलतो, तेव्हा अनेकदा भीती, त्रास किंवा त्रासदायक अनुभवांची आठवण होते. पण या मोहिमेने समाजाला एक नवी दिशा दिली. जिथे भीतीपेक्षा प्रेम अधिक बलवत्तर ठरतं.
या उपक्रमामागे फक्त लसीकरण नव्हतं, तर एका सहअस्तित्वाची भावना होती. मानव आणि प्राणी यांच्यातील नात्याला नव्याने समजून घेण्याची एक सुंदर संधी.
रेबीज प्रतिबंध हे केवळ आरोग्यदृष्टीने आवश्यक नसून, समाजातील माणुसकी आणि दयाळूपणाच्या चाचणीचे ही प्रतीक आहे. धरणगावमध्ये राबवलेली ही लसीकरण मोहीम म्हणजे सामाजिक जबाबदारी, प्रेम, विज्ञान आणि समर्पण यांचा एक विलक्षण संगम होता.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा