चांगली वेळ नाही, चांगले माणसे शोधा.....!
चांगली वेळ नाही, चांगले माणसे शोधा.....!
चांगली वेळ येण्याची वाट बघणं, म्हणजे एक अशा आशेवर जगणं जिचं काहीच ठावं नसतं. आपल्याला असं वाटतं की, कधीतरी सगळं सुरळीत होईल, आयुष्य पूर्वपदावर येईल, सगळं हसतं-खेळतं होईल. पण तो "कधी तरी" नेमका कधी येतो, हे कोणालाच ठाऊक नसतं. आणि हे वाट बघणं कधी कधी इतकं एकटं करतं की, त्या शांततेच्या शोधात आपण आतून कोसळत जातो.
पण आयुष्यात काही माणसं अशी येतात, की त्यांचं अस्तित्वच एक प्रकारची चांगली वेळ घेऊन येतं. त्यांच्या शब्दांमध्ये असतो एक विश्रांतीचा थेंब, त्यांच्या स्पर्शात असते एक आधाराची ऊब, आणि त्यांच्या अस्तित्वात असतो एक अढळ विश्वास की "तू एकटा नाहीस."
चांगल्या माणसांबरोबर राहिलं की, आयुष्याचा संघर्ष ही हलका वाटतो. अंधारात त्यांचा हात धरला, की वाट सापडते. रडता नाही त्यांच्या कुशीत हास्य उमटतं. त्यांच्या अस्तित्वाने वेळेचं मोल बदलतं कारण त्यांच्या सहवासात वेळ थांबतो, पण दु:ख वाहून जातं.
कधी कधी आपण एखाद्या विशिष्ट क्षणाच्या शोधात असतो. एखाद्या चांगल्या दिवशी, एखाद्या संधीच्या वेळी, एखाद्या चमत्कारी क्षणाची वाट पाहत असतो. पण ती वेळ काही केल्या येत नाही. आणि मग आयुष्य जसं आहे.तसंच भासतं रखरखीत, थकलंलेलं.
पण जर अशा वेळी एखादं चांगलं मन, एक खंबीर खांदा, एक निस्वार्थ माणूस जवळ असेल. तर तीच वेळ बदलायला लागते. त्या माणसाच्या बोलण्यात आपल्याला दिशा मिळते, त्याच्या हास्यात ऊर्जा मिळते, आणि त्याच्या सोबतीने आयुष्य पुन्हा जगावंसं वाटतं.
आयुष्य म्हणजे फक्त घटनांचा क्रम नसतो, ते असतं माणसांनी भरलेलं. कोणाबरोबर तुम्ही वेळ घालवता, हेच ठरवतं की तो काळ "वाईट" होता की "स्मरणीय". म्हणूनच, वेळ सुधारेल अशी वाट बघण्यापेक्षा, अशा माणसांशी नातं जोडा. जे स्वतःच चांगली वेळ घेऊन येतात.
अशा माणसांचा सहवास हीच खरी दौलत आहे. ते दूर गेले, तरी त्यांची आठवण एक ऊबदार सावली सारखी सदैव जवळ असते.
म्हणून, आयुष्यात चांगल्या वेळेची नाही, तर चांगल्या माणसांची वाट बघा. कारण वेळ बदलणारी माणसे हीच खरी "चांगली वेळ" असते.
त्या माणसांच्या सहवासात, एक साधा क्षण ही सोन्यासारखा वाटतो आणि जीवनाचं खरं सौंदर्य, खरं सुख, खरं समाधान तेव्हाच उमगायला लागतं.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा