ओळखीचा खरा अर्थ....!
ओळखीचा खरा अर्थ....!
बूट घासून मिळवलेली ओळख आणि बूट चाटून मिळवलेली ओळख या दोघांमधील फरक केवळ वरवर दिसणारा नसतो. हा फरक असतो मनाचा, मूल्यांचा आणि आत्मिक शांततेचा. एकीकडे अशी ओळख असते जी माणूस आपल्या कष्टाने, प्रामाणिकपणाने, अपार मेहनतीने आणि तडजोड न करता मिळवतो. तर दुसरीकडे अशी ओळख असते, जी माणूस स्वतःच्या आत्मसन्मानाची बोली लावून, वाकून, झुकून, दुसऱ्याच्या मर्जीने आणि चापलुसीच्या बदल्यात मिळवतो.
बूट घासणं म्हणजे प्रत्येक दिवशी संघर्ष करणं. वाट अडथळ्यांनी भरलेली असते, पण त्या प्रत्येक अडथळ्याशी दोन हात करत तो माणूस पुढे सरकत असतो. ही ओळख लवकर मिळत नाही. तिला वेळ लागतो, कधी कधी अपमान, नकार आणि उपेक्षा ही झेलावी लागते. पण अशी ओळख मिळाल्यावर ती संपूर्ण आयुष्यभर माणसासोबत राहते. ही ओळख केवळ नावापुरती नसते, ती त्याच्या नजरेत, त्याच्या बोलण्यात आणि त्याच्या वागण्यात स्पष्ट जाणवते. ही ओळख कुणाच्या कृपेवर आधारलेली नसते, तर ती स्वतःच्या कर्तृत्वावर उभी केली असते.
आज मात्र परिस्थिती थोडी वेगळी आहे. आजच्या काळात बूट चाटून मिळवलेली ओळख ही जास्त प्रमाणात दिसून येते. हा मार्ग सोपा वाटतो. थोडसं झुकलं, थोडंसं खोटं बोललं, कुणाचं मन राखलं की संधी मिळते, पुढे जाता येतं. पण ही ओळख वरवर गोंडस दिसते, तरी ती टिकाऊ नसते. ती दुसऱ्याच्या मर्जीवर अवलंबून असते. आणि एकदा का ती मर्जी बदलली, की ही ओळख क्षणात हरवते. अशी ओळख थोड्या वेळासाठी झगमगते, पण अंतर्मनात समाधान सोडून रिकामेपणाचं ओझं ठेवते.
कधीकाळी मेहनती माणसाला आदर्श मानलं जात होतं. त्याच्या कष्टांना मान होता, त्याच्या मार्गाला प्रतिष्ठा होती. पण आज तो मागे पडतो आहे. कारण आज
वाकणाऱ्यांना, मुखवटे घालणाऱ्यांना पुढे नेलं जातं. हा बदल काळाच्या ओघात आला आहे की माणसाच्या मनोवृत्तीतील आहे, हे सांगणं कठीण आहे. पण एक गोष्ट नक्की आपण कोणता मार्ग निवडतो, हे आपल्या आत्म्याच्या आरशात स्पष्ट दिसतं.
काही जण झिजतात, झरतात, पण झुकत नाहीत. त्यांचा प्रवास संथ असतो, पण त्यांच्या पावलांचे ठसे काळाच्या वाळूत कोरलेले असतात. आणि काही जण वाकतात, पुढे जातात, पण एक क्षण येतो, जिथे त्यांचं नावच कुणाच्या आठवणीत राहत नाही.
म्हणून ही वेळ आहे स्वतःला विचारण्याची आपण कोणती ओळख शोधतो आहोत? घामाने मिळवलेली, की मुखवट्यांच्या आड लपलेली?समाज कितीही बदलला, तरी शेवटी जेव्हा आपण स्वतःकडे आरशात पाहतो, तेव्हा मन शांत आणि समाधानात असणं हाच खऱ्या आयुष्याचा अर्थ ठरतो.
ओळख अशी असावी की ती कोणाच्या सावलीत उभी राहणारी नसावी, तर स्वतःचं प्रकाश घेऊन जगासमोर उभी राहणारी असावी.कारण बूट घासला की, आत्मा शांत राहतो. पण बूट चाटला की, मनात एक अधुरेपण, एक हरवलेपण कायम राहतं.आणि शेवटी, कसली ही झगमग कायम राहात नाही. टिकून राहतो तोच जो झिजतो, पण कधीच झुकत नाही.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा