जीवनाचा हिशोब व्याजासह परत मिळत...!
जीवनाचा हिशोब व्याजासह परत मिळत...!
मानवजीवन म्हणजे एक विलक्षण प्रवास. या प्रवासात आपण नात्यांची वीण बांधतो, अनुभवांचे धडे घेतो, चुका करतो, त्यातून शिकतो आणि पुढे वाटचाल करतो. या साऱ्या प्रवासात आपण अनेक गोष्टींचा हिशोब ठेवत असतो. वेळेचा, पैशाचा, नात्यांचा, व्यवहारांचा... मात्र एक हिशोब मात्र माणसाला पूर्णपणे लक्षात ठेवता येत नाही.तो म्हणजे कर्माचा हिशोब.
या जगात तात्काळ काहीच मिळत नाही. परंतु काळाच्या ओघात, योग्य वेळी आणि योग्य प्रकारे, आपल्याला सगळंच परत मिळतं. आणि ते सुद्धा सव्याज, म्हणजेच अधिक व्याजासह.
माणसाच्या प्रत्येक कृतीचा, प्रत्येक विचाराचा आणि भावना-आधारित निर्णयाचा निश्चित परिणाम असतो. काही परिणाम लगेच दिसून येतात, काही कालांतराने उलगडतात, तर काही आयुष्याच्या अशा टप्प्यावर उभे ठाकतात, जिथे आपण त्याची अपेक्षाच केलेली नसते.
या साऱ्या घडामोडी कोणीतरी पाहत असतं... आणि तो म्हणजे परमेश्वर.
कोणाला जाणीवपूर्वक दु:ख दिलं, त्रास दिला, त्यांच्या डोळ्यांत अश्रू आणले, त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण केले. तर हे दुःख फक्त त्या व्यक्तीपुरतं मर्यादित राहत नाही. त्या अश्रूंचं ओझं काळाच्या ओघात साचत राहतं आणि एका विशिष्ट क्षणी, ते आपल्या आयुष्यातच ओसंडून वाहायला लागतं. कधी एकटेपणाच्या स्वरूपात, कधी अपयशाच्या रुपात, तर कधी अंतर्मनात सलणाऱ्या न संपणाऱ्या बेचैनीच्या स्वरूपात.जो इतरांना त्रास देतो, तो स्वतः सुखी कधीच राहू शकत नाही. हा जीवनाचा कटू, पण अटळ आणि अचूक असा नियम आहे.
परंतु याच्या उलट जर आपण कोणाला प्रेम दिलं, आधार दिला, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं, किंवा कुठल्या ही अपेक्षेशिवाय मदतीचा हात पुढे केला. तर हे प्रेम, ही दयामाया, हे सहकार्य परत येतं. कधी अकल्पित संधीच्या रूपाने, कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या स्वरूपात, कधी आशीर्वाद बनून आठवणीत राहणारं, तर कधी आपल्या आयुष्यात अचानक प्रकाश बनून उगवणारं.प्रेम हे असं एक दान आहे की जितकं वाटाल, तितकंच ते वाढतं आणि ते परत येतंच...व्याजासह.
परमेश्वर सर्वकाही पाहतो. तो फक्त आपल्या कृती बघत नाही, तर आपल्या मनाचा ही ठाव घेतो. आपण कुठे खोटं हसतोय, कुठे खरं रडतोय, कुठे स्वार्थाने मदत करतोय आणि कुठे निःस्वार्थ भावनेने हे सगळं त्याच्यापासून लपून राहत नाही.
त्याची एक महत्त्वाची खासियत म्हणजे तो कधीच पक्षपात करत नाही. ना तो कुणाला विशेष सवलत देतो, ना कुणावर राग धरतो. तो ना श्रीमंतांचा, ना गरीबांचा. तो ना बलाढ्यांचा, ना दुर्बलांचा. तो फक्त आणि फक्त कर्मांचा आहे.ज्याने जे काही केलं आहे, त्याला त्याचे परिणाम भोगावेच लागतात ते ही व्याजासकट.म्हणूनच, जर आज तुमच्या कृतीमुळे कुणाचं भलं होत असेल, कुणाला थोडासा आधार मिळत असेल, एखाद्याच्या चेहऱ्यावर तुमच्यामुळे क्षणभर हास्य फुलत असेल. तर समजा, तुम्ही जीवनात खरी संपत्ती मिळवत आहात.
आणि जर तुमच्याच हातून एखाद्याला अपमानित केलं गेलं असेल, त्यांना दुःख दिलं गेलं असेल, त्यांच्या आयुष्याचा दिवा विझवण्याचं पाप केलं असेल. तर समजा, कुठेतरी तुमच्या जीवनात अंधार साचायला सुरुवात झाली आहे.तो अंधार केव्हा तुमच्यापर्यंत पोहोचेल, याचा अंदाज लागू शकत नाही. पण एक गोष्ट निश्चित... तो अंधार तुम्हाला चुकणार नाही.कारण, हे सत्य कधीच बदलत नाही."तुम्ही जे देता, ते सव्याज परत मिळतं."म्हणूनच आयुष्य जगताना शक्य तितक्या चांगल्या आठवणी मागे सोडा, चांगल्या कृतींचं बीज पेरा, प्रेमाची सावली इतरांवर पडा.कारण परमेश्वर आहेच की...तो पाहतोय... आणि योग्य वेळी, योग्य पद्धतीने, तो न्याय करतो.तो ही सव्याज.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा