क्षणभंगुर जीवनातलं शाश्वत सत्य....!


क्षणभंगुर जीवनातलं शाश्वत सत्य....!


जीवन म्हणजे क्षणभंगुर प्रवाह…ते न थांबणारे आहे, न मागे फिरणारे.आपण मात्र किती वेळा भूतकाळाच्या ओझ्याखाली दबून जातो, किंवा भविष्याच्या काळजीने आतून पोखरले जातो.हे करताना आपण विसरतो की, आपल्याकडे खरी संपत्ती कोणती आहे. ती म्हणजे वर्तमान.

भूतकाळात काही सुंदर क्षण होते, काही दु:खद आठवणी होत्या. पण ते सर्व "झालेले" आहे.तिथे काही बदल शक्य नाही. आपण त्यातून शिकू शकतो, पण तिथे अडकून राहिलो, तर मनाला जखमाच
होतात.त्याचप्रमाणे, भविष्य अजून आलेलेच नाही.
ते आपल्याला माहितही नाही कसं असेल, तरी आपण ते सतत विचार करत बसतो, चिंता करत राहतो.या दोन्ही टोकांवर झुलताना, आपण आपल्या हाती असलेल्या एकमेव खऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. आपलं वर्तमान.

वर्तमान म्हणजे हा क्षण, ही श्वास, हे आपले आजचे हास्य, आजचा विचार, आजचा निर्णय.हा क्षण आपण आनंदाने, सकारात्मकतेने जपला, तर तो उद्याच्या चांगल्या भूतकाळात रुपांतरित होतो.किंवा याच क्षणात आपण चिंता केली, दुःख साचवलं, राग धरला, तर तो क्षण निघून जातो.पुन्हा न येण्यासाठी.

जीवन फारसं गुंतागुंतीचं नाही, आपणच त्याला अवघड बनवतो."हे झालं असतं तर..." किंवा "ते होईल का?" या विचारांमध्ये आपण आजचं जगणं विसरतो.म्हणूनच, वर्तमानाचा स्वीकार करा.जसं आहे, तसं प्रेमाने, संयमाने, सकारात्मकतेने.एखादं क्षण वाईट असेल, तर तो ही क्षण आहे. तो ही निघून जाईल.आणि चांगला क्षण असेल, तर तो पुरेपूर जगा.कारण तो ही कायम राहणार नाही.

आपले विचार हेच आपले जीवन घडवतात.दृष्टिकोन बदलला, की अनुभवही बदलतो.मन शांत असेल, तर जगणंही सुंदर वाटतं.जिथे आपण आहोत, तिथेच पूर्णपणे उपस्थित राहणं हेच खरं ध्यान, खरं आनंद, आणि खरं जीवन आहे.त्यामुळे,"जे आहे तेच खरं आहे.
जे नसेल, त्याचं दुःख करू नका.जे येईल, त्याची भीती बाळगू नका.आणि जे आहे, त्याला प्रेमाने जपा."
कारण जीवन हे आजचं आहे…आणि आजचं जीवनच आपलं खरं वर्तमान आहे.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !