खान्देशची हिरकणी सौ. शोभाताई पाटील...!
खान्देशची हिरकणी सौ. शोभाताई पाटील...!
श्रम, प्रामाणिकपणा, सेवाभाव आणि अपार धैर्य यांच्या जोडीने उभी राहिलेली एक स्त्री सौ. शोभाताई उर्फ अनिताताई केवलदास पाटील. सदगुरू दूध उत्पादक सोसायटी, धानोरा येथे सचिव पदाची जबाबदारी त्यांनी अखंड २९ वर्षे समर्थपणे पार पाडली आणि आपल्या कार्यातून एक आदर्श निर्माण केला. आज त्यांच्या या प्रदीर्घ सेवेला, निःस्वार्थ समर्पणाला आणि उत्कृष्ट कार्यगुणनैपुण्याला जळगाव दूध फेडरेशन तसेच ना. गिरीशभाऊ महाजन आणि विकास परिवार यांच्याकडून “खान्देश हिरकणी” म्हणून गौरवण्यात आले. हा क्षण केवळ त्यांच्या कुटुंबासाठी नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी अभिमानाचा आहे.
शोभाताईंची वाटचाल सहज नव्हती. ग्रामीण भागातील महिला म्हणून अनेक अडचणींना तोंड देत, त्या प्रत्येक आव्हानावर मात करत आल्या. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केवळ दूध संकलन वा व्यवस्थापनच केले नाही, तर शेकडो शेतकरी कुटुंबांना आर्थिक स्थैर्य,आत्मसन्मान आणि विश्वास देणारे काम केलं. त्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये एकजूट, पारदर्शकता आणि
आत्मनिर्भरतेचं बीज पेरलं.
शासनाच्या योजना असोत, नवीन यंत्रणा असोत, वा तांत्रिक सुधारणा त्या नेहमीच पुढाकार घेऊन आपल्या सोसायटीला प्रगतीच्या मार्गावर नेत राहिल्या. त्यांची दृष्टी ही फक्त आजवर नव्हती, ती उद्याचा विचार करणारी होती. त्यामुळेच धानोरा दूध डेअरी ही आज खान्देशातील आदर्श म्हणून ओळखली जाते.
आज जेव्हा त्यांना "खान्देश हिरकणी" म्हणून सन्मानित करण्यात आलं, तेव्हा फक्त शोभाताईंचं नाही, तर संपूर्ण महिलाशक्तीचं, ग्रामीण भागातील कष्टकरी वर्गाचं आणि पारदर्शक व्यवस्थापनाचं कौतुक झालं.
शोभाताईंच्या या यशामागे त्यांच्या कुटुंबियांचा, विशेषतः त्यांच्या सहकार्यांचा, संचालक मंडळाचा आणि दूध उत्पादक सभासदांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी प्रत्येक पाऊल विश्वासाने आणि एकमेकांच्या साथीने टाकलं म्हणूनच ही वाटचाल इतकी यशस्वी ठरली.
अशा या संघर्षमयी, पण प्रेरणादायी प्रवासाला मनःपूर्वक सलाम!शोभाताई, आपल्यामुळे अनेक महिलांना आपलं स्वप्न जगण्याचं बळ मिळालं आहे.आपल्या कार्याचा प्रकाश अनेकांना वाट दाखवत राहो, आणि अशीच आपली ओळख “खान्देशची हिरकणी” म्हणून सदैव टिकून राहो.
आपल्याला, आपल्या परिवाराला आणि संचालक मंडळाला लाख लाख शुभेच्छा आणि मनःपूर्वक अभिनंदन!
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा