राग, गर्व आणि लोभ हे सुखशांतीचे खरे शत्रू...!


राग, गर्व आणि लोभ हे सुखशांतीचे खरे शत्रू...!

माणसाचं आयुष्य हे एक प्रवास आहे, ज्यात सुख-दुःख, हसू-आसू, चढ-उतार हे सगळं अपरिहार्य आहे. पण या प्रवासात काही गोष्टी अशा असतात, ज्या आपल्याला सतत मागे खेचतात, आपल्याला आपल्या माणसांपासून दूर नेतात आणि आपल्यातली शांतता हिरावून घेतात. अशाच तीन गोष्टी म्हणजे  राग, अहंकार आणि लोभ.

राग हा एक क्षणिक भावना असतो, पण त्याचे परिणाम कायमस्वरूपी असतात. जेव्हा राग डोकं गमावतो, तेव्हा बुद्धीही आपली साथ सोडते. आणि मग त्या रागाच्या भरात आपण असे काही बोलून जातो, जे शब्द ऐकणाऱ्याच्या मनात खोलवर जखमा करून जातात. आपण नंतर कितीही पश्चाताप केला, तरी ते शब्द परत घेता येत नाहीत. त्यामुळे नाती मोडतात, विश्वास हरवतो आणि हृदयातली जवळीक संपते. शांतपणे विचार केला असता, जी परिस्थिती सहज हाताळता आली असती, ती रागामुळे गोंधळात जाते.

अहंकार हा माणसाच्या प्रगतीतला मोठा अडथळा आहे. माणूस जसा जसा ज्ञान मिळवत जातो, तसतशी त्याचं आकलन, त्याची समज वाढावी अशी अपेक्षा असते. पण अनेकदा विद्वान व्यक्ती आपल्या ज्ञानाचा गर्व बाळगायला लागतो. जेव्हा माणूस "माझ्यासारखा दुसरा कोणी नाही" असं समजू लागतो, तेव्हा तिथेच त्याचा अधःपात सुरू होतो. कारण गर्व आल्यावर माणूस ऐकणं बंद करतो, शिकणं थांबवतो आणि दुसऱ्यांना कमी लेखायला लागतो. हेच त्याच्या पतनाचं कारण ठरतं.

लोभ हा असा एक विकार आहे, जो माणसाच्या मनाची शुद्धता हळूहळू हिरावून घेतो. थोडं अधिक मिळावं, अजून थोडं, थोडं अजून... ही संपतच न जाणारी लालसा माणसाला अंध करते. पैशासाठी, फायदे-सामानासाठी, मान-सन्मानासाठी तो आपली प्रामाणिकता, आपली इमानदारी विसरतो. एक दिवस असा येतो, की माणूस स्वतःलाच ओळखेनासा होतो. त्याच्या हातात भरपूर असतं, पण मनात समाधान नसतं. आणि अशा स्थितीत खरं सुख कधीच गवसत नाही.

या सगळ्या गोष्टी आपल्या रोजच्या जीवनाचा भाग आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी राग येतो, थोडा गर्व वाटतो, थोडा लोभही होतो.पण त्यांना ओळखून त्यावर नियंत्रण ठेवणं, हेच खरं शहाणपण आहे. जेव्हा आपण रागावर संयम ठेवतो, गर्वाच्या जागी नम्रता ठेवतो आणि लोभाऐवजी समाधान शोधतो  तेव्हाच आपल्या आयुष्यात खरी सुखशांती नांदते.

मन शांत असेल, तर आयुष्य ही सुंदर वाटतं. म्हणूनच, ही तीन भावनिक दोष राग, गर्व आणि लोभ टाळण्याचा प्रयत्न केला, तर आपण नुसतं स्वतःच नव्हे, तर आपलं संपूर्ण जगच बदलू शकतो.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !