संस्कारांचे शिल्पकार प्रा. पी. डी. पाटील सर....!


संस्कारांचे शिल्पकार प्रा. पी. डी. पाटील सर....!


सेवा म्हणजे समर्पण, शिक्षण म्हणजे संस्कार, आणि शिक्षक म्हणजे खरा मार्गदर्शक.या तिन्ही गुणांचा समतोल साधलेलं, प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी व्यक्तिमत्त्व म्हणजेच सेवानिवृत्त प्रा. पी. डी. पाटील सर.

एरंडोल सारख्या ग्रामीण भागात शिक्षणाचा दीप प्रज्वलित करणारे पाटील सर हे केवळ अध्यापक नव्हते, तर शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवनाचे शिल्पकार होते. सर्वसामान्य पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत त्यांनी स्वप्नं जागवली. त्यांच्या मनातील न्यूनगंड दूर करत आत्मविश्वास निर्माण केला.

"केवळ अभ्यास शिकवणं हे शिक्षण नाही, तर जीवन शिकवणं हेच खरं शिक्षण आहे," ही शिकवण त्यांनी आपल्या कार्यातून सातत्याने दिली.

सरांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रेमळ हास्य, ममत्वाने भरलेली नजर आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंतःकरणापर्यंत पोहोचणारी समजूतदार दृष्टी."कोणता ही विद्यार्थी मागास नसतो, गरज असते योग्य मार्गदर्शनाची," ही त्यांची ठाम भूमिका होती.आणि ती त्यांनी कृतीतून सतत सिद्ध केली.

स्वाध्याय परिवारातून आलेले सर आत्मज्ञान, विचारशीलता आणि शिस्त यांचा सुरेख संगम होते. मात्र ही शिस्त त्यांनी विद्यार्थ्यांवर लादली नाही, तर स्वतःच्या वागणुकीतून, प्रेमाने शिकवली."मी तुमच्यासोबत आहे," हा विश्वास विद्यार्थ्यांना नेहमी त्यांच्या वागणुकीतून जाणवत राहिला.

मुलगा असो वा मुलगी, गरीब असो वा श्रीमंत  प्रत्येक विद्यार्थ्याकडे त्यांनी समान प्रेमाने पाहिलं, आणि सगळ्यांना मायेच्या दोरीने घट्ट बांधलं.

वर्गातलं त्यांचं शिकवणं जितकं प्रभावी, तितकंच वर्गाबाहेरचं त्यांचं मार्गदर्शन ही प्रेरणादायी होतं.
एका क्षणात विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर शिरून, त्यांच्या भीती, न्यूनगंड, गोंधळ दूर करत त्यांना नवी दिशा देण्याचं विलक्षण कौशल्य त्यांच्या ठायी होतं.

अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलं आणि जीवनात यशाचे नवे टप्पे गाठले.ते शिक्षक होते, पण त्याहून ही अधिक मित्र, सल्लागार, आणि अनेकांसाठी वडिलधारी व्यक्तीमत्त्व.
त्यांनी 'शाळा, कॉलेज, गुण, परीक्षा' या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांमध्ये एक उत्तम माणूस घडवला.

आज पाटील सर सेवानिवृत्त झाले असले, तरी त्यांच्या शिकवणीचा, मार्गदर्शनाचा आणि प्रेमाचा गंध अजून ही विद्यार्थ्यांच्या हृदयात तसाच दरवळतो.त्यांनी दिलेले संस्कार, शिकवलेल्या गोष्टी आणि दिलेल्या आधाराचं मोल आयुष्यभर पुरेल असं आहे.

आज त्या अद्वितीय व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस आहे.
या खास दिवशी,प्रा. पी. डी. पाटील सरांना मनःपूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आयुष्यभर विद्यार्थ्यांवर प्रेम करण्याची ऊर्जा देत राहो, हीच प्रार्थना.तुमचं मार्गदर्शन, तुमचं प्रेम आणि तुमचं आशिर्वाद आम्हा सर्वांना सदैव लाभो ही सदिच्छा.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !