कधी टाळ्या… कधी टोचे….!


कधी टाळ्या… कधी टोचे….!

लोकं तुमचे कामांचे कौतुक करो किंवा टीका खरं पाहिलं तर, दोन्ही गोष्टी तुमच्याच फायद्याच्या असतात. कारण माणूस हा सतत शिकत असतो, घडत असतो. प्रत्येक अनुभव, प्रत्येक प्रतिक्रिया त्याला काही ना काही शिकवते. एखाद्याने दिलेलं कौतुक हे त्याच्या डोळ्यातून दिसलेली तुमची झलक असते. ज्यात तुमचं कष्ट, तुमचा प्रयत्न आणि तुमचं मनोबल ओळखलं जातं. अशा शब्दांनी मनाला उमेद मिळते, वाटचाल अधिक आत्मविश्वासाने करता येते.

पण फक्त कौतुकानेच माणूस प्रगल्भ होत नाही. टीका सुद्धा तितकीच महत्त्वाची असते. अनेक वेळा आपण काही चुकत असतो, पण आपल्याला ते जाणवत नाही. तेव्हा एखाद्याची खरीखुरी, जरा टोचणारी पण स्पष्ट टीका आपल्याला आरसा दाखवते. स्वतःच्या उणिवा समजायला लागतात. आणि माणूस उणीव लक्षात घेतल, की सुधारायला सुरुवात करतो. म्हणूनच टीका ही दुखवणारी असली, तरी ती आपल्या भल्याची असते.

आपल्याला ज्यांनी ओळख दिली, त्यांनी आपल्यावर प्रेम केलं, त्यांचं कौतुक आपल्याला उभं करतं. पण जे आपल्यावर टीका करतात, ते आपल्याला डोळस बनवतात. ते प्रश्न विचारतात, ज्याची उत्तरं शोधत आपण स्वतःमध्ये डोकावतो.

तुकाराम महाराजांनी म्हणूनच म्हटलं “निंदकाचे घर असावे शेजारी.” कारण निंदक जर दूर असेल, तर त्याच्या शब्दांपर्यंत पोहोचायला वेळ लागेल. पण तो शेजारी असेल, तर तो कायम तुम्हाला जागं ठेवेल. चुकलात तर लगेच सांगेल, झोपलात तर हलवेल, आणि जर तुम्ही समजूतदार असाल, तर त्याच्या टीकेमधली शिकवण लक्षात घेऊन तुम्ही स्वतःला अधिक परिपूर्ण बनवाल.

कौतुक हे जणू वाऱ्यावर तरंगणाऱ्या सुगंधासारखं असतं सौम्य, सुखद आणि प्रसन्न. पण टीका ही जमिनीवर पाय रोवून ठेवायला शिकवते.ती खडबडीत असते, पण खरी असते.

जीवनात या दोघांना ही समान महत्त्व दिलं, तर मन मोठं होतं.कौतुक अभिमान देतं, आणि टीका नम्रता शिकवते.
एक उभं करतं, दुसरं योग्य रस्त्यावर चालायला लावते.
म्हणून लोक काय म्हणाले, याला फारसा अर्थ नाही.
पण त्यांनी काय दाखवलं. हे समजून घेणं, आणि त्यातून स्वतःसाठी योग्य ते घेणं हीच खरी शहापण आहे.

जगाकडून फक्त कौतुक अपेक्षा न करता, टीकेचीही  तयारी ठेवा.कारण दोन्हीच्या संगमातूनच खरा विकास होतो,आणि तिथंच माणूस आपली खरी ओळख निर्माण करतो.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !