प्रेमाचा अधिकार.....!


प्रेमाचा अधिकार.....!

नात्यांमध्ये हक्क असावा, असं सगळ्यांनाच वाटतं ना?
कोणीतरी असावं, ज्याच्यासाठी आपण विशेष असतो.
जो आपल्यावर मनापासून विश्वास ठेवतो, आपल्यासाठी वेळ राखून ठेवतो, आपल्याकडे फक्त ‘आपल्या’ नजरेने पाहतो.असं कुणी तरी असावं, हे स्वप्न सगळ्यांच्या मनात असतंच.

पण हक्क सांगायचा असेल ना, तर त्याआधी त्या नात्यात खरं प्रेम असावं लागतं.आपलेपण हळूहळू रुजलेलं असायला हवं.कारण प्रेमाशिवाय सांगितलेला हक्क, तो फक्त एक प्रकारचा आग्रहच होतो .आणि आग्रह म्हणजे ओझं.ते ओझं कुणालाच नकोसं वाटतं, मग नातं टिकणार कसं?

कधी कधी आपण कुणावर मनापासून प्रेम करतो,
पण नकळत त्याच प्रेमात हक्क मिसळायला लागतो.
"मी असं म्हणालो, तरी तिनं तसं का केलं?" "माझं काहीच महत्त्व नाही का त्याच्यासाठी?"हे सगळं विचार येऊ लागतात आणि त्या विचारांमधून अपेक्षा तयार होतात.अपेक्षा वाढल्या की नात्याची नाजूक वीण सैल होऊ लागते.

समोरच्या माणसाच्या मनात जर आपल्यासाठी आपलेपणाचं स्थान नसेल,तर आपला हक्क त्याच्यासाठी एक बंधन वाटू लागतं.त्याच वेळी जर आपण प्रेमाच्या जागी अधिकाराची भाषा वापरू लागलो,
तर ते प्रेम न राहता तक्रारींचं ओझं होतं.

खरं सांगायचं तर, जिथे प्रेम असतं ना,तिथे हक्क सांगावा लागतच नाही.तो आपोआप मिळतो.
तो माणूस तुमच्यासाठी थांबतो, ऐकतो, समजून घेतो.
कधी कधी तर तुम्ही काही बोलण्याआधीच तो समजतो.
हे सगळं फक्त प्रेमामुळे शक्य होतं.खोल रुजलं असेल तर.

पण मग असंही वाटून जातं की,"मी इतकं प्रेम दिलं... तरीही तो/ती समजून घेत नाही."मग प्रश्न पडतो प्रेम दिलं खरं, पण त्यात आपलेपण पोहोचलं का?की त्या प्रेमामागे ही फक्त 'हक्काची अपेक्षा' लपलेली होती?

जिथे खरं प्रेम असतं,तिथे सांगावं लागत नाही की ‘हे माझं आहे’.ते आपोआप जाणवतं.समोरचा माणूस आपोआप ओढला जातो.तो तुमच्यासाठी असतो. काहीही न मागता, न सांगता.

हाच खरा हक्क असतो.शब्दांपलीकडचा.सगळ्या अपेक्षांपासून मोकळा.आणि अंतर वाढलं, तरी मनात कायमचा असणारा.

प्रेम असेल, तर अधिकार सांगावा लागत नाही.फक्त तुमचं असणं पुरेसं असतं.त्या असण्यात मोकळेपणा ही असतो, आधारही, आणि एक न दिसणारी पण खोल जाणवणारी शांतता ही.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !